थायरॉइड म्हणजे काय? त्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
थायरॉइड… भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण आहेत.
थायरॉइडची एक समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या 1/3 व्यक्तींना, त्यांना हा आजार झाल्याची कल्पनाच नाही. हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या 3 महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या 44.3% महिलांमध्ये आढळते.
थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते.
"या ग्रंथीमधून काही संप्रेरके स्त्रवतात. मेंदू, हृदय, स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात. थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते. म्हणजे, थायरॉइड शरीरासाठी एक प्रकारे बॅटरीसारखे काम करते. या ग्रंथीमधून स्त्रवणारी संप्रेरके प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात स्त्रवली तर थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात", असे आंध्रप्रदेशमधील गुंटुर येथील प्रसिद्ध एंडोक्रिनोलॉडिस्ट डॉ. बेल्लम भरानी यांनी सांगितले.
फोटो स्रोत, Getty Images
थायरॉइड ग्रंथी शरीरासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांची निर्मिती करू शकली नाही तर त्याला हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात. एखाद्या खेळण्यातील बॅटरी संपल्यावर त्या खेळण्याची जी स्थिती असते, हायपोथायरॉइडिझम त्याच प्रकारचा आजार असतो. शरीराच्या इष्टतम कार्यक्षमतेपेक्षा कमी क्षमतेने शरीराचे कार्य सुरू असते. अशा रुग्णांना थकवा लवकर येतो.
पण थायरॉइड ग्रंथी अति-क्रियाशील असली तर हायपर थायरॉइडिझम होतो. अति प्रमाणात कॅफिनचे सेवन केले तर व्यक्तीची जी परिस्थिती होईल, तशीच परिस्थिती हायपर थायरॉइडिझमच्या रुग्णांची होते.
तिसरा प्रकार म्हणजे थायरॉइड ग्रंथीला सूज येणे. याला गलगंड(गॉयटर) म्हणतात. हा आजार औषधांनी बरा झाला नाही तर शस्त्रक्रिया करावी लागते.
हायपोथायरॉइडची लक्षणे : वजन वाढणे, चेहरा, पाय यांना सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे, पाळीमध्ये बदल होणे (महिलांसाठी), केस गळणे, गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे.
हायपर-थायरॉइडची लक्षणे : "यात शरीराच्या आवश्यकतेपेक्षा थायरॉइड संप्रेरके जास्त प्रमाणात स्त्रवली जातात. परिणामी, आहार सामान्य असूनही वजन कमी होते, अतिसार होतो, चिंतातूरता निर्माण होते, हात व पाय थरथरतात, उष्णतेचा खूप त्रास होणे, स्वभावात तीव्र चढ-उतार, स्लीप अॅप्निया (झोपेत श्वसन बंद होणे), हृदयाच्या ठोक्यांची गती कमी-अधिक होणे, दृष्टी धुसर होणे, मेंटल फॉग (विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे) इत्यादी लक्षणे दिसू शकतात.", असे डॉ. भरानी म्हणाले.
फोटो स्रोत, Getty Images
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
थायरॉइडमधील बिघाड ओळखण्यासाठी विशेष लक्षणे नाहीत. स्पॅनिश सोसायटी ऑफ एंडोक्रिनोलॉजीचे डॉ. फ्रान्सिस्को झेव्हिअर सॅन्टामारिया यांनी बीबीसीला सांगितले की, हीच खरी समस्या आहे. उदा. एखाद्या व्यक्तीला हायपोथायरॉइडिझम झाला असेल तर त्याला गंभीर स्वरुपाचे मानसिक नैराश्य आले आहे, असा समज होऊ शकतो.
हायपो-थायरॉइडिझम बहुतेक व्यक्तींमध्ये अस्तित्वात असतो. अनेकांसाठी या आजारावरील उपचार उशीरा सुरू होतात. थायरॉइडचा आजार असलेल्यापैकी 10% व्यक्तींना हायपो-थायरॉइडिझम झालेला असतो. पण त्यांच्यापैकी निम्म्या व्यक्तींना याची कल्पनाच नसते. पुरुष आणि महिलांमध्ये थायरॉइडच्या आजाराची लक्षणे सारखी असली तरी महिलांमध्ये हा आजाराचे निदान लवकर होते. सुमारे ८०% महिलांना थायरॉइडचा आजार असू शकतो.", असे डॉ. सॅन्टामारिया म्हणाले.
"सामान्यपणे थायरॉइडचा आजार असलेले 80% ते 90% रुग्ण उपचारांनंतर पूर्ण बरे होतात. पण काहींच्या बाबतीत, आजार पूर्णपणे बरा होत नाही. काही रुग्णांच्या बाबतीत गुंतागुंत निर्माण होते. हायपो-थायरॉइडिझमच्या बाबतीत ऑटो-इम्युन सिस्टिम (शरीरातील सुदृढ ऊतींवर आक्रमण करणारी शरीरातील प्रतिकारयंत्रणा) राहते. उपचार घेतल्यानंतरही इतर अवयवांवर ऑटो-इम्युनिटीचे परिणाम दिसून येतात.", असे डॉ. सॅन्टामारिया यांनी सांगितले.
टी3-टी4-टीएसएच – काय दर्शवतात?
डॉ. भरानी पुढे म्हणाले की, डायबेटिसची पातळी कमी करता येऊ शकते, पण थायरॉइडच्या पातळीवर निश्चित उपचार करता येत नाहीत. हायपो-थायरॉइडिझम म्हणजे टी3, टी4 ची पातळी कमी होते. त्याच वेळी, थायरॉइडला चालना देणाऱ्या संप्रेरकाची पातळी पाढते. त्याचप्रमाणे हायपर थायरॉइडिझमध्ये टी3, टी4 पातळी वाढते. सामान्य प्रकरणांमध्येही टीएसच पातळी खाली जाते.
स्टार हेल्थ इन्श्युरन्स कंपनीच्या प्रमानकांनुसार आंतरराष्ट्रीय प्रमानकांनुसार एक लिटर रक्तामध्ये थायरॉइड युनिट्सची रेंज ०.5 मिली ते 5 मिली इतकी असावी. थायरॉइड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित सुरू आहे की नाही हे टीएसएच पातळीवरून समजते. पण हे प्रमाण मुले, प्रौढ व्यक्ती आणि गरोदर महिलांमध्ये वेगवेगळे असते. याचा अर्थ हे प्रमाण वेगवेगळे असते आणि वयानुसार बदलते.
डॉ. भरानी म्हणाले, अलिकडे असेही म्हणतात की, कुटुंबातील एका सदस्याला थायरॉइडचा आजार असेल तर त्या कुटुंबातील मुलांनाही तो आजार होण्याची शक्यता असते. दुर्दैवाने, या आजाराला रोखण्यासाठी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना अस्तित्वात नाहीत. आजार झाल्यावरच उपचार घेता येतात.
हायपर-थायरॉइडिझम म्हणजे जेव्हा शरीरात संप्रेरके आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात स्त्रवतात; तेव्हा हृदयाच्या ठोक्यांमध्ये चढ-उतार होतो. परिणामी, हृदयविकार उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे जर हायपो-थायरॉइडिझमचे निदान वेळेवर झाले नाही तर काही वेळा मेंदूचे आझार होऊ शकतात. त्याचप्रमाणे सोडियमची पातळी खालवून रुग्ण कोमात जाऊ शकतो. विशेषतः मुलांच्या जन्मानंतर या समस्येचे निदान झाले नाही तर त्यांची मानसिक वाढ खुंटू शकते. त्यांचा बुद्ध्यांक कमी होऊ शकतो. हा आजार उपचार करून सहज बरा करता येऊ शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण मुलांच्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही ही समस्या निर्माण होऊ सकते आणि त्यांची वाढ खुंटू शकते.
या दोन प्रकारच्या समस्यांचे वेळेवर निदान झाले नाही तर जीवाला धोका पोहोचू शकतो.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares