पिंपरी : महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये पोलिस विभागाशी संबंधित तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अल्पसूचना, स्थगन प्रस्ताव, आदी माध्यमातून चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर महासंचालक कार्यालयाकडून सर्व घटकप्रमुखाला अधिवेशन काळात ‘अलर्ट’ राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, घटक प्रमुखांनी प्रभारी अधिकार्यांना आपापल्या हद्दीत गंभीर घटना किंवा गुन्हे घडणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यास सांगितले आहे. एकंदरीतच हिवाळी अधिवेशनाचा पोलिस दलाने धसका घेतल्याचे चित्र आहे.
या मुद्द्यांवर होते चर्चा
विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विशेष करून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांवर प्रश्न उपस्थित केले जातात. तसेच, अनुसूचित जाती व जमातीवरील अत्याचार, जातपंचायती (वाळीत टाकणे) मोठे दरोडे, जुगार, अवैध दारू धंदे, फसवणूक, रॅकेट, शेतकरी आत्महत्या, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, मोठे आंदोलन, नक्षलवाद, दहशतवाद, दंगल, मॉबलीचिंग या अनुषंगाने घडलेल्या घटनांवर चर्चा होते. यावर विचारलेल्या प्रश्नांवर संबंधित मंत्र्यांना उत्तरे द्यावी लागतात.
अधिवेशन काळात हद्दीत गंभीर घटना घडल्यास वरिष्ठ अधिकार्यांनी स्वतः भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबधित घटनेची माहिती विनाविलंब राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, राज्य पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्थ) यांना दूरध्वनीवरून कळवावी. याबाबत तत्काळ मेलवर अहवाल पाठवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
एखाद्या पोलिसाच्या गैर वर्तणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मालिन होते. समाजात बदनामी झाल्याने अधिवेशनातही याबाबत चर्चा होते. त्यामुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या पोलिसांचे कान टोचण्याबाबत सुचित केले आहे.
ताब्यातील आरोपीवर लक्ष ठेवा. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा कोठडीत मृत्यू अथवा हलगर्जीपणामुळे आरोपी पळून गेल्यास पोलिसांना मोठ्या कारवाईस तोंड द्यावे लागते. तसेच, समाजामध्ये याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. त्यामुळे आरोपीची जबाबदारी निश्चित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचार्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यास महासंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महासंचालक कार्यालयाकडून आलेल्या सूचना प्रभारी अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, अधिवेशनासाठी लागणारी अद्यावत माहिती तयार करण्यात आली आहे.
– पद्माकर घनवट, सहायक आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

Article Tags:
news