कॉ.पानसरेंच्या विचारांची पेरणी – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
‘कॉ.गोविंद पानसरे : समग्र वाङ्मय’ हा पहिला खंड पानसरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध झाला होता. आता डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे संपादित दुसरा खंड हा लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. 
 
“महात्मा गांधींचा खून ज्या कारणांसाठी करण्यात आला त्याच कारणांसाठी त्यांचा खोटा गौरव केला जातोय. खुन्यांचा वैचारिक वारसा मिरवणारे ‘हिंदुत्वनिष्ठ’ जेव्हा महात्मा गांधींचा गौरव करतात तेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट असते. खून करून जे साधायचे होते तेच आता खोटा गौरव करून साधू पाहताहेत. खून विचारसरणीमुळे आणि विचारसरणीसाठी केला. आता खोटा, दिखाऊ भ्रामक गौरवसुद्धा म. गांधींची उरलीसुरली विचारसरणी मारण्यासाठी करताहेत.

महात्मा गांधींना त्यांचा खून करून १९४८ मध्ये ज्यांनी संपवले तेच आता ५० वर्षांनंतर ‘गांधीवाद’ संपवण्याचा एक मार्ग गांधींचा फोटो लावून, त्यांचे ‘स्मरण’ करून त्यांच्या विचारसरणीविरुद्ध प्रचार करायचा हा आहे… गांधींना साक्षी ठेवून ‘काळाबाजार’ करून गल्ला गोळा करणारे आणि परधर्मद्वेष पसरवून परधर्मीयांचे खून करणे हाच स्वधर्मप्रेमाचा सर्वश्रेष्ठ पुरावा आहे, असे सांगून धार्मिक दंगे घडवणारे, ‘गांधी फोटोभक्त’ किंवा ‘गांधी नामस्मरण’ करणारे सारखेच आहेत” इति कॉ. गोविंद पानसरे.

विचारवंत हा कालदर्शी कसा असतो याचा प्रत्यय उपरोक्त विचारातून येतो. कॉ.पानसरे यांचे वरील विचार हे १९९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘महात्मा गांधी आणि त्यांचा वारसा…’ या लेखातील आहेत. आपल्या देशात विचारवंतांच्या हत्यांना आपल्या राज्यातून प्रारंभ झाला. महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून आहे; पण याच राज्यात दाभोळकरांच्या हत्येनंतर पानसरेंची हत्या झाली. हे काही आजच घडत आहे, असे नाही. मध्ययुगातही पुरोगामी संत तुकारामांचे वैकुंठागमन (?) झाल्याचे बोलले जाते. यामुळे पुरोगामी ओळख असणाऱ्या महाराष्ट्राविषयी पानसरे लिहितात, “महाराष्ट्र पुरोगामी नाही. तो पुरोगामी आहे, असे म्हणू नये… महाराष्ट्र पुरोगामी बनवायचा आहे. बदलायचा आहे. जे बदलायचे आहे ते नीट समजले पाहिजे. नाही तर बदलणे अवघड होते. ‘महाराष्ट्र पुरोगामी आहे’ असे समजले, तर मग महाराष्ट्राला पुरोगामी बनवायचे आहे हा हेतूच उरत नाही. कारण तो पुरोगामी आहेच या चुकीच्या समजावर आधारून आपण कार्य करत राहू.” हे आणि या प्रकारचे परखड विचारवास्तव कॉ.पानसरेंनी वारंवार मांडले. ते सर्व विचार विखूरलेले होते, त्याचे संकलन करून पानसरेंचे समग्र साहित्य दोन खंडांत प्रसिद्ध झाले आहे. त्यातील पहिला खंड हा त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये त्यांच्या ‘शिवाजी कोण होता’, ‘राजर्षी शाहू : वसा आणि वारसा’, व ‘मार्क्सवाद म्हणजे काय?’ या पुस्तिकांसह काही लेखांचा अंतर्भाव केलेला होता. त्याचे संपादन डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. सुनीलकुमार लवटे व डॉ. रणधीर शिंदे यांनी केले होते, तर डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे संपादित दुसरा खंड हा लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. कॉ. पानसरे चळवळीतील तळमळीचा कार्यकर्ता, कामगारांचा पुढारी, निष्णांत कायदेपंडित आणि समाज, संस्कृतीची जाण असणारा विचारवंत असल्याने त्यांचे सृजन चौफेर होते. त्यांच्या वैवि‍ध्यपूर्ण विचार वा लेखनाची मांडणी करताना संपादकांनी ग्रंथाचे ‘समाजवाद आणि लोकशाही’, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार चळवळ’, ‘जात आणि वर्ग’ ‘जागतिकीकरण आणि सामाजिक न्याय’, ‘शिक्षण’, ‘इतिहास आकलन’, ‘संकीर्ण’ व ‘अध्यक्षीय भाषणे’ असे आठ विभाग केले आहेत. 

पानसरे हे राजर्षी शाहूंच्या कर्मभूमीतील असल्याने साहजिकच त्यांच्यावर राजर्षींच्या विचारांचा प्रभाव असणे शक्य आहे. यासोबतच ‘भारतीय संविधान’ व छत्रपती शिवरायांवरही त्यांची प्रचंड निष्ठा होती. याचे कारण संविधान हा देशातील सर्वोच्च मूल्यग्रंथ आणि याच संविधानात असलेली स्वातंत्र्य, समता व न्याय ही तत्त्वे रयतेचा राजा छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात अंमलात आणलेली होती, त्यामुळे आजच्या वैविध्यतेत एकता असलेल्या लोकशाही प्रणालीसाठी मूल्यभान निर्माण करणारा शिवाजी पानसरेंनी सामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवला. पानसरेंच्या विचारविश्वाच्या केंद्रस्थानी शाहूंचा सा‍माजिक न्याय आणि संविधान मूल्ये ही असलेली दिसतात. करिता त्यांनी कामगार, शेती, शेतकरी, स्वातंत्र्य चळवळ व वाङ्मय इ. प्रश्नांसंदर्भात सातत्याने मांडणी केली. तद्वतच आपल्या लोकशाहीतील आर्थिक व सामाजिक विषमतेसंदर्भात चिंतन मांडले. आणि स्थळ, काळ आणि सापेक्षता याचे भान ठेवून लोकशाहीची प्रस्थापना केली पाहिजे, असेही वारंवार सांगितले. हे त्यांचे विवेचन ‘लोकशाही व समाजवाद’ या ग्रंथाच्या पहिल्या भागात येते. तर त्यांनी कम्युनिस्ट पक्षात राहून वेळोवळी  कम्युनिस्ट पक्षाच्या वाटचालीची, ध्येयधोरणांची व कार्यप्रणालीची चिकित्सा केली होती. त्याविषयीचे रंजक विवेचन ग्रंथाच्या दुसऱ्या भागात आले आहे.

आपल्या देशातील पुरोगामी वा समविचारी चळवळींनी एकमेकांशी कदापिही जोडून घेतले नाही, त्यामुळे झालेल्या अतोनात नुकसानाची मांडणी करताना ‘पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जात व वर्ग या दोन्हींविरुद्ध सारख्याच ताकदीने संघर्ष केला पाहिजे. कारण केवळ वर्गीय लढे लढले तर जात कायम राहते आणि केवळ जातीय लढे लढवले तर वर्ग कायम राहतो’ अशी कायम भूमिका घेतली होती. पुढे नव्वदोत्तर काळातील जागतिकीकरण हा पानसरेंच्या चिंतनाचा विषय ग्रंथाच्या चौथ्या भागात येतो. सेझ, आरक्षण, शेती, शेतकरी, कामगार व गरीब या सर्व घटकांचा जागतिकीकरणाशी असलेली संबंध ते लक्षात घेतात. याच काळात ग्लोबलायझेशनच्या नावाखाली शिक्षणात बाजारीकरण आले. परिणामी गल्लीबोळांमध्ये, बांधाबांधांवर ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘वर्ल्ड’, ‘युनिव्हर्सल’, ‘सीबीएसई’, ‘आयसीएसई’ नाव धारण करणाऱ्या शाळांचे पेव निर्माण झाले. यामुळे शिक्षणात गरीब-श्रीमंत अशी दरी वाढली. या वाढलेल्या दरीविषयी आणि तिच्या होणाऱ्या परिणामांविषयी ते चिंता व्यक्त करतात. ही सर्व मांडणी एका शिक्षणतज्ज्ञाला लाजवेल अशी आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या व साहित्याविषयीसुद्धा मूलगामी चिंतन मांडतात. कॉ. पानसरेंच्या    विचारव्यूहांमध्ये लोकशाही, समाजवाद, भांडवलशाही, कम्युनिस्ट पक्ष, कामगार चळवळ, जात व वर्गव्यवस्था, सामाजिक न्याय, जागतिकीकरण, शिक्षणव्यवस्था, इतिहास, महापुरुष, नागरी व्यवस्था, दहशतवाद आणि साहित्य इ. पैलूंचा अंतर्भाव होतो. त्यांच्या विचारांचे ‘शत्रू-मित्र विवेक हे एक प्रधान सूत्र आहे. ती जाणीव बहुजन समाजात येणे ही काळाची गरज आहे. ते उत्तम वक्ते होते. पण भाषणांच्या पलीकडे जाऊन त्यांनी चळवळीला दिशा देण्यासाठी जाणीवपूर्वक लेखनप्रयास केला. “आपले लिखाण जास्तीत जास्त निर्दोष आणि सत्यावर आधारलेले असावे, त्यात कोणतीही चूक असू नये याबाबत ते फार जागरूक होते. सुगम आणि सुलभ भाषा, बिनतोड युक्तिवाद, आपला मुद्दा पटवून सांगण्यासाठी दिलेली चपखल उदाहरणे आणि नर्म विनोद ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये संपादकद्वयांनी अधोरेखित केली आहेत, त्याची अनुभती लेख वाचताना येतेच. शिवाय प्रस्तुत ग्रंथाला संपादकांची असलेली प्रस्तावना ही पानसरेंच्या ५१ लेखांचा अर्क आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणतो त्याप्रमाणे “Man can be destroyed, but not defeated.” अर्थात मनुष्य नष्ट होऊ शकतो पण पराभूत होऊ शकत नाही. या हेमिंग्वेच्या विधानाचा वर्तमान दशकात सातत्याने प्रत्यय येतो आहे. नव्हे तो येतही राहील. सॉक्रेटिस, संत तुकाराम व्यक्ती म्हणून संपले; पण त्यांचे विचार जगभर अजरामर झाले. तद्वतच दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यावंतांनी त्यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला; पण ते विचार अधिक प्रभावीरीत्या समाजमनात रूजत चालले आहे. तद्वतच ‘कॉ. गोविंद पानसरे : समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ पानसरेंच्या विचारांची समाजमानसात चिरंतन पेरणी करतो.

> कॉ.गोविंद पानसरे : समग्र वाङ्मय (खंड २)
>  संपादक : डॉ.अशोक चौसाळकर, डॉ.रणधीर शिंदे
> लोकवाङ्मय गृह, मुंबई.
> पृष्ठे : ४००, किंमत : ४०० रू.
लेखकाचा संपर्क – ७५८८१६५२२१
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares