चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ब्रम्हपुरी मतदारसंघांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी हिंस्त्रप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटना दररोज घडत आहेत. यामध्ये शेतमजूर व सामान्य नागरिकांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. वन विभाग प्रशासनाने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न बघता तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज शनिवारी (दि.१७) सावली येथे वनाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत दिले.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव वन्यजीव संघर्षावर आमदार विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात वाघांची संख्या किती? असा प्रश्न उपस्थित करताच वनाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. वाघांची वाढती संख्या व दैनंदिन होणारे हल्ले यामध्ये जात असलेल्या बळींबाबत चिंता व्यक्त करीत वडेट्टीवारांनी वनाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. दिवसागणिक वाढत असलेल्या वाघांच्या संख्येत भर पडत असताना वनविभाग अनभिज्ञ कसे? असा सवाल केला. या क्षेत्रातील जनता यांच्या जीवाचे रक्षण करणे लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य असून जिल्ह्यातील संपूर्ण वाघांची मोजणी करून आरक्षित क्षेत्र मर्यादेपेक्षा अधिक वाघांचे स्थलांतर करावे व वन व्याप्त क्षेत्राला जाळीचे कंपाऊंड, गावात पर्यंत सोलर लाईट बसविणे, गावातील वीस तरुणांना कामावर घेऊन एक चमु गठीत करून रात्रपाळी गस्त सुरू करणे, तसेच गावातील गुराखी, शेतकरी, शेतमजुर यांना स्वसंरक्षणासाठी काठी, मुखवटे आदिसह वनातून शेतीकडे जाणारी पायवाट मार्ग रुंद व परिसरातील गवत, झुडपे कापून सफाई करण्याचे निर्देश माजी मंत्री वडेट्टीवार यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.
वनालगत गावखेड्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करावी व वन्य प्राण्यांकडून होत असलेली शेतपिकांची नासधुस झालेल्या शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. वनविभागाने तातडीने हिंस्त्रप्राण्यांपासून संरक्षण करण्याकरीता उपाययोजना कराव्यात. याकडे दुर्लक्ष करून जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा वन्यप्राण्यांच्या हल्यात बळी गेलेल्या मृतदेहाला घेऊन वनविभागाच्या कार्यालयात आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा आ. विजय वडेट्टीवार यांनी वनाधिकाऱ्यांना दिला.
यावेळी मुख्य वनसंरक्षक लोणकर, विभागीय वनाधिकारी खाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष संदिप गड्डमवार, माजी जि. प. सभापती दिनेश चिटनुरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विरुटकर, नायब तहसीलदार कांबळे, माजी प. स. सभापती विजय कोरेवार, सावलीच्या नगराध्यक्षा लता लाकडे, सावली काँग्रेस तालुका अध्यक्ष नितिन गोहणे, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, युवक अध्यक्ष आशिष मनबत्तुलवार व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा

Article Tags:
news