तारफा : आदिवासींची ओळख, संस्कृती ! – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
जंगल संपत्तीतून तयार केलेल्या वाद्यांच्या साथीनं अनेक आदिवासी नृत्यं तयार झाली. त्यांमध्ये ‘तारफा’ नृत्याचा प्रथम क्रमांक लागतो. गावात शांतता नांदावी, सुख-शांती लाभावी, चांगलं पीक यावं म्हणून, तसंच मुलांच्या बारशाला हा तारफा वाजवला जातो. ‘तारफा’च्या धूनवर जुन्या काळापासून ते आजतागायत स्त्री-पुरुष हातात हात घालून, गोफ धरून एका तालात आणि सुरात नाचतात. सण, उत्सव, आनंदाच्या काळात हे वाद्य वाजवून नृत्य केलं जातं. पावित्र्य, आनंद, सहकार्य, एकमेकांची साथ आणि मनोरंजन मूल्यं आदी सर्व या नृत्यात दिसून येतं. प्रथम धरतीमातेला वंदन करून, स्त्री-पुरुष हातात हात घालून पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजे पृथ्वीच्या परिवलनानुसार नाचाचा फेर धरला जातो. अशा प्रकारे प्राचीन काळापासून आदिवासी समाजातील एकजूट आजही दिसून येते.
‘‘शे कडो वर्षांपूर्वीपासून आदिवासींचं वास्तव्य जंगलातच राहिलं आहे. आदिवासी हा निसर्गपूजक. त्या काळात जंगलातील साधनसामग्रीच्या माध्यमातून विविध वाद्यं त्यांनी बनवली. झाडाच्या पानातून आवाज निर्माण करणं, लाकडापासून चक्री तयार करणं, अशी ध्वनी निर्माण करणारी वाद्यं ते बनवतात. जंगलात असताना अथवा शेतीची कामं करताना एकमेकांना साद घालण्यासाठी त्यांचा वापर होत असे. आपलं जंगलातील वास्तव्य दुसऱ्याला कळावं म्हणून कालांतराने पुढे मोठ्या आवाजाची वाद्यं बनविली गेली, त्यांतच महत्त्वाचं आणि आजही आदिवासी संस्कृतीची ओळख असलेलं वाद्य म्हणजे ‘तारफा’ आहे.’’
पूर्वी आदिवासींना कुठलंही करमणुकीचं साधन नव्हतं, त्यामुळे वाद्यांचा आवाज हाच करमणुकीचा आधार होता. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी शेतातील पिकावर कीड पडली अथवा गावात रोगराई पसरली, की त्या काळात भगतमंडळी गावाबाहेर आठ दिवस वास्तव्य करत. निसर्गदेवता अंगात (वारं येणं) संचारण्यासाठी ‘तारफा’ वाजविला जात होता. तारफा प्रथम ‘नागपंचमी’ला वाजविला जात होता. नागपंचमीपासून देवदिवाळीपर्यंत तारफा वाद्य व त्यावर नाच केला जात असे, त्यानंतर तारफा वाजवला जात नसे. आदिवासी समाजातील ‘भाया’ भगत (विधी करणारा) आदिवासी बोलीभाषेत ‘खटपट्या’ हेच तारफा वाजवत होते; मात्र त्यानंतर सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम; तर आता राजकीय पक्षांची सभा, संमेलन, मंत्री, मोठ्या व्यक्तींच्या स्वागतासाठीही तारफा व नृत्याविष्कार केला जात आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, डहाणू, विक्रमगड, तलासरी आदी भागांत आजही तारफा नृत्याचे फेर धरले जातात. एका तारफा संघात पाचहून अधिक १० ते १५ जणांचा सहभाग असतो. गाव किंवा वाडीत तारफा नृत्याचे संघ असतात. जव्हार तालुक्यातील वाळवंडा हे हजाराच्या आसपास आदिवासी लोकसंख्या असलेलं गाव. पारंपरिक भाताची शेती करणं हे येथील ग्रामस्थांचं उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन. शिवाय, गावात शेतमजूरही मोठ्या प्रमाणात. बहुतांश हातावर पोट असलेल्या लोकांच्या या गावात तारफा नृत्याचे फेरही धरले जातात. आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक रवी बुधर यांची गावात भेट झाली, शिवाय तारफा नृत्य करणाऱ्यांशीही बोलणं झालं.
‘‘पूर्वी तारफा बनवणाराच ते वाजवत असे. अलीकडच्या काळात तारफा बनविण्याचं साहित्य दुर्मीळ होत चाललं आहे. तसंच तासन् तास तारफा वाजवण्याचं कसब असलेले तारफाकार कमी होऊ लागले आहेत. रेकॉर्डिंग केलेल्या तारफाच्या धूनवर नाच करण्याची प्रथा प्रचलित होऊ लागली आहे. तसंच नृत्यातील पावित्र्य आणि शुद्धभाव लोप पावत चालला आहे. काही तरुण तारफा वाद्य आणि नाच शिकण्याचा अल्प प्रयत्न करत असल्याची खंत संशोधक रवी बुधर यांनी व्यक्त केली.’’
जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथील ८५ वर्षीय भिकल्या धिंडा तारफाकला आजही जोपासतात. ते स्वतः तारफा बनवतात, तसंच याही वयात तासन् तास तारफा वाजवण्याची क्षमता ठेवत आहेत. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण मराठी पत्रकार संघाचा २०२१चा कला पुरस्कार, २०२२ चा विश्वास फाउंडेशनचा आदिवासीभूषण पुरस्कार, तसंच ११ ऑगस्टला राजभवन इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संगीत नाटक अकादमीचा ‘अमृत पुरस्कार’ही त्यांना नुकताच जाहीर झाला आहे. ‘भिकल्या धिंडा यांनी ही कला वयाच्या १० व्या वर्षापासून पणजोबा, आजोबा आणि वडिलांकडून अवगत केली आहे. त्यांच्याकडे सात फूट उंचीचा तारफा आहे. तो तारफा त्यांच्याव्यतिरिक्त जुनाजाणता तारफाकारच वाजवू शकेल, इतका तो दुर्मीळ रचनेचा आहे. या तारफ्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटरपर्यंत जातो, असं धिंडा यांचं म्हणणं आहे. आदिवासींची कला आणि संस्कृती जोपासणाऱ्या कलाकाराला अजूनपर्यंत कुठलीही सरकारी मदत मिळत नाही. आर्थिक मदत मिळाली तर नव्या पिढीलाही तारफा शिकवणं शक्य होईल, असं भिकल्या धिंडा यांनी सांगितलं.
ढोल नाच, तूर नाच, मादोळ, गवरी नाच, संबळ (साकड) नाच, मोर नाच, कांबड नाच, पेरणं, थाळी नाच, मोरघा नाच, काठा नाच, तसंच नंदुरबार भागात आणि गुजरात राज्यात पावरी नृत्य केलं जातं; मात्र आजतागायत आदिवासींची प्राचीन संस्कृती म्हणून ‘तारफा’ नृत्याकडेच पाहिलं जातं. ‘तारफा’ वाद्य मोठा लांब आकाराचा दुधी भोपळा, बांबूच्या दोन पोकळ काड्या, ताड अथवा माडाची झावळी एकत्र करून बनविलेलं असतं. यामध्ये फुंकर मारल्यानंतर हवा इतरत्र कुठूनही बाहेर पडू नये म्हणून कोतीच्या मधाच्या मेणाने त्याला सीलबंद करून परिपूर्ण तारफा वाद्य तयार होतं. तारफासह जंगलातील उपलब्ध साधनसामग्रीतून आदिवासी बांधवांनी अनेक वाद्यं बनवली.

कोण धरतं तारफाचे फेर?
आदिवासी समाजातील वारली, कोकणा, ठाकूर समाजबांधव प्राधान्याने तारफा वाजवतात आणि त्यावर नृत्य करतात. जंगलातील सुख-दुःखाच्या घटना, वाघदेवता, निसर्गदेवता, धनतरी, चंद्र, सूर्य, तारे, कनसरी, तसंच आनंदाची घटना, दुःखद प्रसंग यासाठी तारफाच्या विशिष्ट लयीत गाणी वाजवली जातात. समूह कष्ट, इतरांकडून मिळणारं सहकार्य तारफाच्या ध्वनीतून वाजवलं जातं. झाडांना येणारा बहर, प्राणी-पक्ष्यांचे आवाज, मोराच्या नाचाची धून तारफातून वाजवली जाते.
व्यापारीकरण झालं नाही, हे विशेष
मुळातच तारफा हे वाद्य आदिवासी समाजाने निर्माण केलं आहे. राजे-महाराजांच्या काळात विक्रमगड तालुक्यातील कारेलपाडा येथील जेठ्या रिंजड या तारफाकाराचा तारफा वाजवल्यानंतर विजयादशमीला सुरुवात होत असल्याचा इतिहास असल्याचं जाणकार सांगतात; मात्र अलीकडच्या काळात इतरही नृत्य कलाकार तारफा वाजवणं शिकू लागले आहेत. सण, सर्वच उत्सवांत तारफाची धून वाजतेच. तारफाकार आणि त्यावर नृत्य करणारे सर्व शेतकरी आणि शेतमजूर असतात. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह असतो. ही सर्व मंडळी गाव-पाड्यांत आणि शेतावरच राहणारी. त्यांनी ‘तारफा’चं अजूनही व्यापारीकरण होऊ दिलेलं नाही हे विशेष. आपली कला आणि संस्कृती जतन करत ती नव्या पिढीला कळावी म्हणून नाममात्र मानधन (मोबदला) घेऊन ते आपली कला सादर करतात.
तारफा वाजवणं सुदृढतेचं लक्षण
मोठा श्वास रोखून तारफा वाजवला जातो. तारफा वाजवण्यासाठी श्वास रोखून धरण्याची प्रथम शारीरिक क्षमता निर्माण करावी लागते. त्यामुळे माणसाच्या श्वसनक्षमतेत वाढ होते. यातून प्राणायाम होतो. शरीरात रोगप्रतिकारशक्तीही वाढते. त्यामुळे माणसाचं शरीर सुदृढ होतं. परिणामी तारफा वाद्य हे व्यायामाचं मोठं साधन झालं आहे. ज्याच्यामध्ये श्वसनक्षमता असेल, तोच हे वाद्य तासन् तास वाजवू शकतो.
तारफाचे संघ तयार झाले…
सण, उत्सवकाळात वाजवलं जाणारं तारफा आणि त्यावरील नृत्य आदिवासींच्या उत्पन्नाच्या साधनांपैकी एक आहे. आदिवासी भागात तारफाकार वाद्य तयार करून त्याची विक्री करत आहेत, त्यामुळे त्याचा कुटुंबाला आर्थिक आधार झाला असून, आदिवासी संस्कृती जतन करण्याचं समाधानही त्यांना मिळू लागलं आहे. त्यानंतरच्या काळात ‘तारफा नाच’ संघ ठिकठिकाणी तयार झाले आहेत. जव्हार तालुक्यातील साखरशेत, करढण, विक्रमगडमधील सारशी, डोल्हारी बुद्रुक, मोखाड्यातील घोसाळी आणि डहाणू तालुक्यातील शेनसरी या गावांमध्ये हे संघ नावारूपास आले आहेत. नाममात्र मोबदला घेऊन हे संघ विविध कार्यक्रमांत पारंपरिक कला सादर करतात. दिल्लीत २६ जानेवारी, १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात, शिवाय इतर राज्यांतील विविध कार्यक्रमांत अनेकदा पालघर जिल्ह्यातील तारफा संघांचं ‘तारफा नृत्य’ सादर झालं आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares