११० कारखान्यांकडून एकरकमी एफआरपीला कोलदंडा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
राज्यातील ११० कारखान्यांकडून
एकरकमी एफआरपीला कोलदंडा

एक हजार २७७ कोटी थकले; निर्णय अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ९ : तुकड्यातील एफआरपीला कडाडून विरोध झाल्यावर शासनाने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा जीआर काढला नसल्याने राज्यातील ११० साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीला तिलांजली दिली; तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडी सरकाने दोन तुकड्यांत एफआरपी कायदा केल्यावर राज्यभरातून याला जोरदार विरोध झाला. हा बेकायदेशीर कायदा नागपूर अधिवेशनात मांडून त्यात एकरकमी एफआरपीचा बदल करण्याची मागणी करण्यात आली. तत्पूर्वी, याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता.
शासनावर दबाव टाकण्यात संघटना यशस्वी झाल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, साखर आयुक्तांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीत दोन टप्प्यांतील एफआरपीऐवजी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे एकरकमी एफआरपी मिळेल, अशी अशा शेतकऱ्यांत निर्माण झाली होती. मात्र, राज्यातील ११० साखर कारखान्यांनी एकरकमीला तिलांजली दिली आहे. शासनाने निर्णय घेतला असला तरी याबाबतचा आदेश काढणे गरजेचे होते. आदेशच काढला नसल्याने कारखान्यांनी एफआरपीला कोलदंडा दिला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक जादाची रक्कम मिळावी, मागील वर्षाच्या हिशेबाचे ऑडिट ताबडतोब करून घ्यावे, काटामारीतील होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी संगणकीकृत ऑनलाइन वजनकाटे याच्यासंदर्भात सरकारने तत्काळ धोरण जाहीर करावे. तसेच, केंद्र सरकारने साखरेची किंमत तीन हजार ५०० रुपये क्विंटल करावी, इथेनॉलच्या खरेदीची किंमत प्रतिलिटर पाच रुपयांनी वाढवावी, केंद्र सरकारने ऊसदर नियंत्रण अध्यादेश १९६६ मध्ये दुरुस्ती करून एफआरपी ठरविण्याचे सूत्र नव्याने तयार करावे आदी मागण्यांसाठी येणाऱ्या काळात आंदोलन होण्याची शक्यता आहे.
….
दृष्टिक्षेपात राज्यातील एफआरपी (३० नोव्हेंबर २०२२ अखेर)
* साखर कारखाने- १६४
* झालेले गाळप- ११६ लाख टन
* एफआरपीची रक्कम- ३६६७ कोटी
* आदा केली एफआरपी- २४४९ कोटी
* थकीत एफआरपी- १२७७ कोटी
* १०० टक्के एफआरपी अदा- ५४ कारखाने
….
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांची आघाडी
एकरकमी एफआरपीची मागणी आणि त्यावरून राज्यात खास करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. मात्र, कारखानदारांनीही उग्र आंदोलनाची वाट न पाहता एकरकमी एफआरपीची घोषणा करीत शेतकऱ्यांना लाभ दिला आहे.
….
‘एकरकमी एफआरपीच्या मुद्द्यावरून मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, साखर आयुक्त यांच्या उपस्थितीत एकरकमीचा निर्णय झाला. मात्र, याबाबतचा आदेश जारी केला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली नाही. भविष्यात त्यावरील व्याजाच्या मागणीसाठी आंदोलन छेडू.’
– राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
….
एकरकमी एफआरपीचा पायंडा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पाडला आहे. केवळ घोषणाच केली नाही, तर एकरकमी एफआरपी अदाही केली आहे.
– माधवराव घाटगे, संचालक, इंडियन शुगर मिल असोसिएशन
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares