काश्मीर : हिंदू राजाने महमूद गजनीच्या सैन्याला धूळ चारली होती तेव्हा… – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
भारताप्रमाणेच काश्मीरमध्ये इस्लामच्या आगमनाची कथा इतिहासाआधी दंतकथांच्या रूपात दिसून येते. ख्वाजा मोहम्मद आजम दिदामरी नावाच्या एका सूफी लेखकाने 1747 साली फारसीमध्ये 'वाकयात-ए-काश्मीर' हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकातल्या कथा पुराणकथांप्रमाणे लिहिण्यात आल्या होत्या.
यात लिहिलं आहे की जलदेव नावाचा राक्षस हा संपूर्ण प्रदेश पाण्यात बुडवून ठेवतो. या कथेतला नायक 'काशिफ' आहे. हा मारिची नावाच्या व्यक्तीचा मुलगा असल्याचं सांगण्यात आलं आहे. काशिफ महादेवाची तपश्चर्या करतो. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवाचे सेवक ब्रह्मा आणि विष्णू जलदेवाचा पराभव करून या प्रदेशाला काशिफ-सिर असं नाव देतात. जाणकारांच्या मते काशिफची ही कथा खरंतर कश्यप ऋषींची कथा आहे. या कथेत ढवळाढवळ करून कळत-नकळत ती मुस्लीम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
'वाकयात-ए-काश्मीर' लिहिणाऱ्या आजम यांचे पुत्र बदी-उद-दिन या दंतकथेला आणखी एक पाऊल पुढे नेतात. त्यांनी तर ही कथा थेट आदमच्या कथेशी जोडली.
त्यांच्या मते काश्मीरमध्ये सुरुवातीपासून 1100 वर्षांपर्यंत मुस्लिमांची सत्ता होती. हे राज्य हरिनंद नावाच्या हिंदू राजाने जिंकलं. ते सांगतात काश्मिरी लोकांना प्रार्थना करणं स्वतः हजरत मूसा यांनी शिकवलं. त्यांच्या मते मूसाचा मृत्यूही काश्मीरमध्येच झाला आणि त्यांची कबरही तिथंच आहे.
खरंतर बदी-उद-दिन यांनी हे सर्व कदाचित शेख नुरूद्दीन वली (यांना नुंद ऋषीदेखील म्हटलं जातं) यांच्या 'नूरनाम' या काश्मिरी भाषेत लिहिलेल्या काश्मीरच्या इतिहासावर आधारित लिहिलं. असं असलं तरी इतिहासतज्ज्ञांनी चेरामन पेरुमल यांच्या कथांप्रमाणे या कथांनाही महत्त्व दिलेलं नाही.
एक प्रसिद्ध काश्मिरी इतिहासकार होऊन गेले आहेत. त्यांचं नाव पृथ्वीनाथ कौल बामजई. असं म्हणतात की त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान शेख अब्दुल्लाह यांनी त्यांना काश्मीरचा सविस्तर इतिहास लिहिण्याची विनंती केली होती.
1962 साली त्यांचं 'A History of Kashmir' हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाची प्रस्तावना स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली होती. तीन खंडात लिहिलेल्या 'Culture and Political History of Kashmir' या प्रदेशाचा इतिहास जाणून घेण्यासाठीचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जाऊ शकतो.
फोटो स्रोत, Getty Images
बामजई सांगतात मोहम्मद बिन-कासिम सिंधवर विजय मिळवल्यानंतर काश्मीरच्या दिशेने आले होते. मात्र, त्यांना विशेष यश आलं नाही. त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचं दीर्घकालीन शासनही स्थापित होऊ शकलं नाही. काश्मीरला पोहोचणं भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम होतं. त्यामुळे अरबही तिथं पोहोचू शकले नाहीत.
काश्मीरमधल्या हिंदू राजांचा अरबांशी पहिला संबंध आला तो कार्कोट राजवंशाच्या काळात. म्हणजे 625 ते 885 च्या दरम्यान. मध्य आशिया आणि अफगाणिस्तानच्या मोहिमांदरम्यान या वंशाच्या चंद्रपीड आणि ललितादित्य यासारख्या प्रमुख राजांचा सामना अरबांशी झाला आणि तेव्हाच त्यांना इस्लाम या नव्या धर्माची ओळखही झाली.
अरबांपासून त्यांना इतका धोका असल्याचं वाटलं की राजा ललितादित्य यांनी चीनच्या राजाकडे दूत पाठवून मदत मागितली होती आणि अरबांविरोधात एक लष्करी आघाडी उभारण्याची विनंती केली होती.
फोटो स्रोत, Getty Images
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
काश्मीरच्या दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे तिथे परकीय घुसखोरी करणं सोप नव्हतं. शिवाय काश्मीरचे राजेही आपल्या सीमा पूर्णपणे बंद ठेवायचे आणि बाहेरच्या कुणालाच संपर्कदेखील करू द्यायचे नाही.
1017 साली भारतात येणारे अल-बरेुनी लिहितात – 'काश्मिरी राजे आपल्या राज्याच्या नैसर्गिक संसाधनांबाबतीत खूप चिंतीत असतात. त्यामुळेच काश्मीरपर्यंत येणाऱ्या प्रत्येक प्रवेश मार्ग आणि रस्त्यांवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी ते खूप काळजी घ्यायचे.'
"यामुळेच त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यापार करणंही अवघड आहे. ते ज्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, अशा हिंदूंनाही ते आपल्या राज्यात शिरू देत नाहीत."
या अल-बेरुनी यांचा काळ हा महमूद गजनी याचा काळही आहे. गजनीने भारतावर केलेले अनेक आक्रमणं आपल्याला माहिती आहेत. गजनीपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वी काबूलमध्ये लल्लिया नावाच्या एका ब्राह्मण मंत्र्याने आपली राजशाही स्थापित केली होती. याला इतिहासतज्ज्ञ 'हिंदूशाही' असंही म्हणतात. त्यांनी काश्मीरच्या हिंदू राजांसोबत गहीरे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध स्थापित केले होते.
गजनीने उत्तर भारतावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेच साम्राज्य त्याच्या निशाण्यावर होतं. त्याकाळी काबूलचा राजा होता जयपाल. जयपालने काश्मीरच्या राजाला मदत मागितली. मदत मिळालीसुद्धा. मात्र, तो गजनीकडून पराभूत झाला. पराभूत झाल्यानंतरही जयपाल यांचा मुलगा आनंदपाल आणि नातू त्रिलोचनपाल यांनी गजनीविरोधात युद्ध सुरूच ठेवलं.
त्रिलोचनपाल याला काश्मीरचे तत्कालीन राजे संग्रामराजा (1003-1028) यांच्याकडून मदतही मिळाली. मात्र, त्याला आपलं साम्राज्य टिकवता आलं नाही. बाराव्या शतकात 'राजतरंगिणी' नावाने काश्मीरचा इतिहास लिहिणारे कल्हण या महान साम्राज्याच्या पतनावर दुःख व्यक्त करतात.
यानंतर गजनीने आजच्या हिमाचलचा भाग असलेला कांगडा भागही जिंकला. मात्र, काश्मीरचं स्वतंत्र हिंदू साम्राज्य त्याला खटकत होतं. 1015 साली त्याने पहिल्यांदा तोसा-मैदान दर्राच्या मार्गाने काश्मीरवर हल्ला चढवला. मात्र, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि काश्मिरींनी केलेल्या जोरदार विरोधामुळे त्याला खूप अपमानपूर्वक माघारी परतावं लागलं.
भारतात लढलेल्या एखाद्या लढाईत माघार घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. परत जाताना त्याचं सैन्य वाटही चुकलं आणि खोऱ्यात आलेल्या पुरात फसलं. अपमान तर झालाच. शिवाय नुकसानही खूप झालं.
सहा वर्षांनंतर 1021 साली आपल्या अपमानाचा सूड उगारण्यासाठी आणि आपला सन्मान परत मिळवण्यासाठी गजनीने पुन्हा एकदा त्याच मार्गाने काश्मीरवर हल्ला चढवला. जवळपास महिनाभर त्याने खूप प्रयत्न केले. मात्र, लौहकोटची तटबंदी तो भेदू शकला नाही. खोऱ्यात बर्फवृष्टी सुरू होणार होती आणि गजनीला वाटू लागलं यावेळी त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही वाईट होणार आहे.
काश्मीर अजेय असल्याचं त्याला कळून चुकलं होतं. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा अपमानित होऊन गजनी परतला. यानंतर त्याने काश्मीरचा विचार करणंही सोडून दिलं.
फोटो स्रोत, Getty Images
उत्पाल वंशाचे राजे हर्षदेव म्हणजेच हर्ष यांनी 1089 ते 1111 (काही विद्वानांच्या मते 1038 ते 1089) पर्यंत काश्मीरवर राज्य केलं. त्यांच्याबद्दल बोललं जातं की त्यांच्यावर इस्लाम धर्माचा इतका प्रभाव पडला की त्यांनी स्वतः मूर्तीपूजा सोडली. इतकंच नाही तर काश्मीरमधल्या मूर्ती, हिंदू मंदिरं आणि बौद्ध मंदिरंही उद्ध्वस्त केली.
या कामासाठी त्यांनी 'देवोत्पतन नायक' या नावाचं एक पदही निर्माण केलं होतं. हर्ष यांनी त्यांच्या सैन्यात तुरुष्क (तुर्क) सेनापतीही नियुक्त केले होते. 'राजतरंगिणी'चे लेखक कल्हण त्यांच्या समकालीन होते. कल्हण यांचे वडील चंपक हर्ष यांच्या दरबारात महामंत्री होते, असंही म्हटलं जातं. कल्हण यांनी मूर्तीभंजक हर्ष यांना 'तुरुष्क' म्हणत हिणवलं आहे.
1277 च्या आसपास व्हेनिसहून आलेले मार्को पोलो यांनी काश्मीरमध्ये मुस्लीम असल्याचं सांगितलं आहे. इतिहासकारांचं मत आहे की त्या काळात काश्मीरच्या बाह्य भागात आणि सिंधू नदीच्या आसपास वसलेले दराद जमातीचे लोक मोठ्या संख्येने धर्म-परिवर्तन करून इस्लाम धर्म स्वीकारत होते.
काश्मीरमध्ये इस्लामचा प्रचार वेगाने सुरू होता. मोठ्या संख्येने लोक धर्मांतरण करत होते. याचं कारण म्हणजे तिथली जनता स्थानिक राजे आणि सामंत यांच्यातल्या भांडणात भरडली जात होती. विशेषतः शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने कोंडी होत होती.
एक म्हणजे शेतकऱ्याला आपल्या जमिनीतून काहीही मिळत नव्हतं आणि दुसरीकडे दुष्काळ, भूकंप, पूर, वणवा यासारख्या नैसर्गिक आपत्तीने तो हवालदिल झाला होता.
याच दरम्यान त्यांचा संपर्क मुस्लीम सैनिक आणि सूफी धर्मप्रचारकांशी झाला. इस्लाम एक असा नवा विचार होता जो त्यांच्या मनात नवी आशा आणि विश्वास जागृत करत होता. इस्लाम त्यांना शतकानुशतकं चालत आलेल्या शोषणकारी कर्मकांडांपासून मुक्तीही देत होता. त्यामुळे इस्लामचा प्रसार हातोहात झाला.
फोटो स्रोत, Getty Images
काश्मीरमध्ये सुरू असलेल्या इस्लाम प्रसारामध्ये आश्चर्यकारक वळण तेव्हा आलं जेव्हा काश्मीरला आपला पहिला मुस्लीम शासक मिळाला. हा मुस्लीम शासक वास्तविक एक तिबेटी बौद्ध होते आणि त्याची राणी हिंदू होती.
1318 ते 1338च्या दरम्यानची 20 वर्ष काश्मीरमध्ये बरीच उलथापालथ झाली. यादरम्यान, युद्ध, षडयंत्र, विद्रोह, हिंसाचार उफाळला. मात्र, यापूर्वीची 20 वर्षं म्हणजे 1301 ते 1320 या राजा सहदेव यांच्या शासनकाळात काश्मीरच्या जनेतवर सूफी धर्मप्रचारकांचा मोठा प्रभाव पडला आणि मोठ्या संख्येने लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. आता त्यांना आपला पहिला मुस्लीम शासकही मिळणार होता.
बामजई यांच्यासह अनेक इतिहासकारांनी या महत्त्वाच्या प्रकरणाचं सविस्तर वर्णन केलं आहे. या कथेच्या केंद्रस्थानी तुर्कस्थानातून आलेला एक सूफी धर्मप्रचारक आहे. त्यांचं नाव होतं बुलबुल शाह. इतिहासकारांनी अनेक वेगवेगळ्या नावांनी त्यांचं वर्णन केलं आहे. त्यातली काही नावं आहेत – सैय्यद शरफ-उद-दीन, सैय्यद अब्दुर्रहमान. बामजई यांनी एका ठिकाणी यांचं नाव बिलाल शाह असल्याचंही म्हटलं आहे.
बुलबुल शाह सुराहवर्दी मताचे सूफी खलिफा शाह नियामतुल्लाह वली फारसी यांचे शिष्य होते. बुलबुल शाह यांनी अनेक देशांचा दौरा केला होता. ते बगदादमध्ये बराच काळ राहिले होते. यांचं वैयक्तिक जीवन आणि संवादाची पद्धत काश्मिरी लोकांना भावली होती. राजा सहदेव यांच्या कार्यकाळात ते पहिल्यांदा काश्मीरमध्ये आले.
सहदेव एक कमकुवत शासक होते आणि खरंतर त्यांच्या नावाखाली त्यांचे पंतप्रधान आणि सेनापती रामचंद्र हेच राज्य चालवत होते. रामचंद्र यांची देखणी आणि हुशार मुलगी कोटादेखील या कामात मदत करायची.
याच दरम्यान तिबेटहून पळून आलेला एक राजकुमार रिंचन किंवा रिनचेन (पूर्ण नाव लाचेन रिग्याल बू रिनचेन) शंभरएक सशस्त्र सैनिकांसह काश्मीरमध्ये दाखल झाला. रिंचनचे वडील तिबेटी राजघराणं आणि भूटिया जमात यांच्यात झालेल्या गृहयुद्धात ठार झाले होते. मात्र, रिंचेन जोजिला दऱ्याच्या मार्गाने काश्मीरकडे पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. रामचंद्र यांनी रिंचन यांना शरण दिली.
त्याचवेळी स्वात खोऱ्यात शाह मीर नावाचा एक मुस्लीम सेनापतीदेखील आपलं कुटुंब आणि आप्तेष्टांसोबत काश्मीरमध्ये पोचले. त्यांना एका फकिराने सांगितलं होतं की ते एक दिवस सिंहासनावर बसतील. ते आपलं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काश्मीरमध्ये दाखल झाले होते. रामचंद्र आणि सहदेव यांनी त्यांनाही शरण दिली. अशाप्रकारे आता रामचंद्र, कोटा, रिंचन आणि शाह मिल मिळून काश्मीरचा कारभार बघू लागले.
फोटो स्रोत, Getty Images
याचदरम्यान मध्य आशियातले एक तातर सम्राट दुलचू यांनी झेलम खोऱ्याच्या मार्गाने काश्मीरवर हल्ला चढवला. या आक्रमणाला उत्तर देण्याऐवजी राजा सहदेव किश्तवाडला पळून गेले. दुलचूने तब्बल 8 महिने काश्मीरमध्ये धुमाकूळ घातला. रसद संपल्याने ते भारताच्या मैदानी भागाकडे निघाले. मात्र, बर्फाच्या वादळात अडकून ते आणि त्यांच्यासह त्यांचे हजारो सैनिक मारले गेले.
आता कारभाराची सूत्र रामचंद्रने हाती घेतली. दुलचूने काश्मीरला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. रामचंद्र राजा होतोय, हे बघून रिंचनचीही महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी संधी साधून बंडाळी केली. त्यांच्या माणसांनी रामचंद्र यांची हत्या केली. आता स्वतः रिंचन काश्मीरच्या गादीवर बसला. कोटापुढे कुठलाच पर्याय नव्हता. तिनेही अखेर मनाविरुद्ध रिंचनशी लग्न केलं. रिंचनने कोटाचा भाऊ म्हणजेच रामचंद्र यांचा मुलगा रावणचंद्र यालाही दरबारात प्रमुख पद देत त्याला सेनापती नियुक्त केलं.
रिंचन अजूनही स्वतःला लामाच मानायचे. मात्र, त्याने हिंदू धर्म स्वीकारावा, असं कोटाला वाटायचं. काश्मिरी जनतेकडून स्वीकृती मिळणं, हे आव्हानदेखील त्याच्यापुढे होतं. एकवेळ अशीही आली की त्याने हिंदू धर्म स्वीकारण्याची तयारी दाखवली.
मात्र, हे इतकं सोपं नव्हतं. असं म्हणतात की त्यावेळचे काश्मिरी शैव गुरू ब्राह्मण देवस्वामी यांनी त्यांना हिंदू धर्मात सामिल करून घेण्यास नकार दिला. यामागे कमीत कमी तीन कारणं सांगितली जातात.
– पहिलं हे की रिंचन तिबेटी बौद्ध होते.
– दुसरं हे की त्यांनी स्वतःचे सासरे आणि हिंदू राजा रामचंद्र यांचा खून केला होता.
– आणि तिसरं हे की त्यांना हिंदू धर्मात स्वीकारलं तर त्यांना उच्चवर्णात सामावून घ्यावं लागेल.
अखेर नाईलाजास्तव त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. अनेक विद्वानांच्या मते काश्मीरमधली जनता मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारत असल्याने रिंचन यांची राजकीय सुरक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही इस्लाम धर्म स्वीकारण्यामागची कारणं होती.
खरं कारण काहीही असलं तरी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर बुलबुल शाह यांनी रिंचनला 'सदर-उद-दीन' ही नाव दिलं. अशाप्रकारे ते काश्मीरचे पहिले मुस्लीम शासक बनले. सदर-उद-दीनचा अर्थ होतो धर्माचा (इस्लामचा) प्रमुख.
बुलबुल शाह यांनी काही दिवसताच रावणचंद्र यांनाही इस्लाम धर्माची दिक्षा दिली. दरबारातल्या अनेकांनी बुलबुल शाह यांच्या प्रभावाखाली येऊन इस्लाम धर्म स्वीकारला. रिंचन यांच्या सोबत आलेल्या बौद्धांनीही धर्मांतर केलं. अशाप्रकारे बुलबुल शाह इस्लामला काश्मीरचा राजकीय धर्म बनवण्याच्या आपल्या मोहिमेत यशस्वी झाले.
श्रीनगरच्या पाचव्या पुलाखाली काश्मीरमधली पहिली मशीदही रिंचननेच बांधली. त्या ठिकाणाला आजही बुलबुल लांकर म्हटलं जातं. 1327 साली बुलबुल शाह यांचं निधन झालं. तेव्हा त्यांचं पार्थिव याच मशिदीजवळ पुरण्यात आलं. बुलबुल शाह यांना 'बुलबुल-ए-काश्मीर' असंही म्हणतात.
लवकरच रिंचन यांचंही निधन झालं. मात्र, यानंतर काश्मीरने इस्लामी साम्राज्याचं एक पूर्ण कालखंड अनुभवला. मात्र, इतकं सगळं होऊनही काश्मिरी जनतेमध्ये 'इस्लामियत' सारखी कुठलीच गोष्ट कधी दिसली नाही. त्यांची वेगळी कहाणी लिहिता येईल.
फोटो स्रोत, Getty Images
महाराजा हरि सिंह
भारतीय इतिहासाला हिंदू विरुद्ध मुस्लीम या दृष्टिकोनातून दाखवला जाणारा नॅरेटिव्ह खोटा आहे. अगदी त्याच प्रमाणे इस्लाम ही काश्मिरीचा एक्सक्लुझिव्ह आणि अनिवार्य घटक असल्याचं सांगणं, ही सुद्धा एक प्रकारची फसवणूकच आहे. याच पद्धतीने उर्वरित भारतातदेखील काश्मिरीप्रती असलेला आणि प्रसार केला जाणारा धर्मोन्वादी पूर्वग्रह आधारहिन आहे.
नुकतंच काश्मीरवर लिहिण्यात आलेलं बहुचर्चित पुस्तक 'कश्मीरनामा'चे लेखक अशोक कुमार यांनी या पुस्तकात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते लिहितात, "काश्मीरचा मानस बौद्ध, काश्मीर शैव आणि सूफी परंपरेच्या समन्वयातून निर्माण झाला आहे आणि याचा प्रभाव तिथल्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर स्पष्ट दिसतो."
मात्र, ते हे स्वीकार करतात की एकीकडे काश्मीरमध्ये दोन्ही समाजाच्या अंतर्विरोधावर पडदा टाकून काश्मिरीयतचा आभासी देखावा मांडणं किंवा दुसरीकडे याला हिंदू-मुस्लीम संघर्षाच्या एकाच रंगात बघणं, हे दोन्ही अतिरेकी पैलू घातक आहेत.
पांडेय लिहितात, "बौद्ध, शैव आणि सूफी इस्लाम यांच्या मिश्रणातून जी एक विशिष्ट काश्मिरी संस्कृती तयार झाली आहे ती समजून घेण्यासाठी अत्यंत उदार आणि गहन दृष्टीकोनाची गरज आहे."
हा उदार आणि गहन दृष्टीकोन तयार करण्यात सध्या आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत, हे वास्तव आहे. आणि यामुळेच इतिहासाची पानं चाळणं आणि ती दाखवणं कधीकधी खूप आवश्यक ठरतं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares