कोरोना व्हायरस : कोरोनाचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत? – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागेल.
हे सगळं कधी संपणार? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार? या प्रश्नांनी तुम्हा – आम्हालाच नव्हे तर जगातल्या प्रत्येकाला ग्रासून टाकलंय. पण या संकटातून बाहेर पडायचं असेल तर पुढच्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील.
सध्या देशात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण कामकाज बंद ठेवणं, संपूर्ण शहर अशी बंदिस्त ठेवणं दीर्घकाळ परवडणारं नाही, हे स्पष्टच आहे. यामुळे प्रचंड मोठं आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतच आहे.
त्यामुळे सरकारांना आता एक्झिट स्ट्रॅटजीचा विचार करावा लागणार आहे.
भारतात अनेक केंद्रीय तसंच राज्य सरकारमधले नेते आता स्पष्ट संकेत देत आहेत की अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कामकाज सुरू करावं लागणार आहे. हे एक प्रचंड मोठं वैज्ञानिक आणि सामाजिक आव्हान असणार आहे.
या संकटातून बाहेर पडण्याचे तीन मार्ग असू शकतात-
मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग आणि बाधितांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हे प्रामुख्याने करण्याची गरज आहेच. शिवाय, कंटेनेमेंट झोन्समध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे, याची दक्षता प्रशासनाला घेणं आवश्यक आहे.
लस महत्त्वाची आहे कारण हा कोरोना व्हायरस अत्यंत तेजीने पसरतो आहे आणि जगभरात लाखो लोकांना आतापर्यंत हा रोग झाला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात 1,077 जणांना ही लस इंजेक्शनद्वारे टोचण्यात आली. ही लस टोचल्यानंतर या लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आणि पांढऱ्या पेशींची निर्मिती होत असल्याचं स्पष्ट झालं. हे निकाल खूप आशादायी आहेत.
मात्र, हेच निर्णय अंतिम नाहीत. हीच लस परिणामकारक आहे हे म्हणणं सध्या धाडसाचं ठरेल. सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात मोठ्या प्रमाणात मानवी चाचण्यांना सुरुवात झाली आहे.
भारतीय बनावटीची कोव्हिड-19 विरोधातील लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीसोबत यासाठी करार केला आहे.
क्लिनिकल ट्रायलच्या यशानंतर कोरोनाविरोधातील ही लस देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला लोकांसाठी उपलब्ध करून देण्याचा आयसीएमआरचा विचार आहे.
लाखोंचा मृत्यूसुद्धा झाल आहे. त्यामुळे जर ही लस मिळाली तर लोकांच्या रोगप्रतिकार यंत्रणेला एखाद्या परकीय शक्तीविरोधात लढण्यास मदत मिळेल, जेणेकरून ते आजारी पडणार नाही.
सध्या जगात ज्या 80 टीम्स कोरोना व्हायरसवर लस तयार करण्याचा प्रयत्न करतायत, त्यातल्या चार गटांनी याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. त्याविषयी तुम्ही सविस्तर इथे वाचू शकता.
फोटो स्रोत, PTI
पण सगळंकाही सुरळीत पार पडलं तरी लस यायला 2021 उजाडेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. कोरोना विषाणू जगभरात ज्या वेगाने पसरतोय ते पाहत हा कालावधी फार मोठा आहे. त्यामुळे "लशीची वाट पाहणं याला 'स्ट्रॅटेजी' म्हणता येणार नाही, ही स्ट्रॅटेजी नाही," असं एडिंबर्ग विद्यापीठातले संसर्गजन्य आजारांचा अभ्यास करणारे प्राध्यापक मार्क वुलहाऊस सांगतात.
लॉकडाऊनमुळे जर संसर्गाचं प्रमाण कमी झालं तर निर्बंध उठवता येतील. आणि या प्रकरणांचं प्रमाण वाढलं तर मग पुन्हा निर्बंध लादता येतील. पण हे सगळं अनिश्चित आहे.
पण याचा दुसरा परिणाम म्हणजे अनेक लोकांमध्ये या व्हायरसचं संक्रमण झाल्याने कदाचित समाजामध्ये याविषयीची रोग-प्रतिकारक्षमता निर्माण होईल. याला 'हर्ड इम्युनिटी' (Herd Immunity) म्हणतात.
फोटो स्रोत, ANI
अनेक लोकांमध्ये या व्हायरसचं संक्रमण झाल्याने कदाचित समाजामध्ये याविषयीची रोग-प्रतिकारक्षमता निर्माण होईल.
"आपण हे संक्रमण आता समाजातल्या एका गटापर्यंत वा देशाच्या भागापर्यंतच थांबवण्याचा प्रयत्न करतोय. समजा जर आपण हे दोन वा जास्त वर्षं करत राहिलो, तर मग देशातल्या पुरेशा प्रमाणातल्या लोकसंख्येमध्ये हा संसर्ग होऊन गेलेला असेल आणि परिणामी यामुळे काही प्रमाणात रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल," असंही प्रा. वुलहाऊस सांगतात.
पण ही रोग प्रतिकारशक्ती टिकेल का, याविषयी मात्र शंका आहेत.
"तिसरा पर्याय म्हणजे आपल्या वागण्यामध्ये वा सवयींमध्ये काही कायमचे बदल घडतील ज्यामुळे संक्रमणाचं प्रमाण कमी होईल," प्रा. वुलहाऊस सांगतात. जसं की आपण गर्दीची ठिकाणं टाळू लागू, अनोळखी लोकांपासून शारीरिक अंतर राखून राहू आणि शिंकता-खोकताना पुरेशी काळजी घेऊ.
याशिवाय, पुन्हा इतकी मोठी लाट येऊ नये म्हणून पेशंट्सच्या अधिक चाचण्या वा आयसोलेशनचा पर्याय अवलंबला जाईल.
याच लढ्यात आणखी एक पद्धत जी ब्रिटनने विकसीत केली आहे, ती म्हणजे Shielding Policy किंवा ढालीचं धोरण. ज्यांना कोरोनापासून जिवाचा धोका आहे, अशा लोकांभोवती सुरक्षेची ढाल उभी करायची आणि बाकीच्यांनी कामाला लागायचं.
कोरोना व्हायरसला देशभर थोपवण्याचे प्रयत्न करत बसण्यापेक्षा फक्त त्याच लोकांचं संरक्षण करायचं ज्यांना सगळ्यांत जास्त धोका आहे. याला इंग्रजीत Shielding असं म्हणतात. Shield म्हणजे ढाल.
• 60 वर्षांपेक्षा ज्यांचं वय जास्त आहे
• ज्यांचं अवयव प्रत्यारोपण झालंय
• कॅन्सरसाठी किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेणारे
• प्रतिकारशक्ती कमी करणारी औषध घेणारे
• गरोदर स्त्रिया ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत
• सिस्टिक फायब्रोसिस, सिव्हियर अस्थमा किंवा श्वसनाशी संबंधित गंभीर आजार असणारे
जास्त वय आणि वरच्या पैकी कोणताही आजार असणाऱ्यांसाठी कोव्हिड जीवघेणा ठरू शकतो. मग तरुणांनीही महिनोन् महिने घरात बसून राहायची गरज आहे का, असा प्रश्न आता जगभरच्या तज्ज्ञांना पडलाय.
एडिनबरा विद्यापीठाचे प्रा. मार्क वुलहाऊस सांगतात की, "80 टक्के लोकांसाठी कोरोना हा त्रासदायक व्हायरस आहे, पण जीवघेणा नाही. ते सगळे कामावर गेले तर आणि त्यांच्यात फैलाव झाला तरी आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही. त्यामुळे सगळा देश बंद करण्याची गरज नाही. पण मग ढालीचं धोरण अतिशय कडक पद्धतीने पाळावं लागेल."
फोटो स्रोत, ANI
ज्यांना कोरोनापासून जिवाचा धोका आहे, अशा लोकांभोवती सुरक्षेची ढाल उभी करायची आणि बाकीच्यांनी कामाला लागायचं. हेच ढालीचं धोरण.
ब्रिटनमध्ये वयोवृद्ध आणि आजारी लोकांसाठी ढालीचं धोरण 12 आठवड्यांसाठी आहे. म्हणजे 12 आठवडे त्यांनी कोणत्याही कारणासाठी – अगदी महत्त्वाच्या गोष्टी विकत घेण्यासाठीसुद्धा – घराबाहेर पाऊलही ठेवायचं नाही. या वयोवृद्ध आणि आजारी लोकांना जे जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी जातील, त्यांची आधी कोरोनासाठी चाचणी घेण्यात येईल.
या धोरणाअंतर्गत जर तुमच्या घरात वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्ती असेल आणि तुम्ही घराबाहेर जात असाल तर शक्यतो तुम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहावं. शक्य असल्यास वेगळं बाथरूम वापरावं. टॉवेल्स वेगळे असावेत. भांडी वेगळी असावीत. एकमेकांच्या शक्यतो समोरासमोर येऊ नये. घरात हवा खेळती असावी. खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
कोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी बेसिक रिप्रॉडक्शन नंबर, म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा अतिशय महत्त्वाचा आहे. याला याला म्हटलं जातंय R0 (उच्चार – आर नॉट – 0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)
एलिसा ग्रॅनाटो
जगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत. शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत.
पुनरुत्पादन प्रमाण म्हणजेच रिप्रॉडक्शन नंबर 1 पेक्षा जास्त असेल तर संसर्गाच्या केसेस घातांकात वाढतात, म्हणजे समजा क्रेडिट कार्डचं बिल भरलं नाही तर जसा आकडा झपाट्याने मोठा होतो, अगदी तसंच.
पण हाच आकडा जर समजा लहान असेल तर मग या रोगाचा प्रसार मग काही काळाने मंदावतो आणि थांबतो, कारण नवीन लोकांना लागण होत नसल्याने साथ आटोक्यात येते. याविषयी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा –
सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे हा आकडा बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचं सांगितलं जातंय, पण जर लॉकडाऊन शिथील करण्यात आला तर संसर्गाचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares