जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? 2021ची थीम काय आहे? – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images / sarayut Thaneerat
5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन – World Environment Day म्हणून साजरा केला जातो.
1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.
जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, "आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे."
पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.
दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक थीम ठरवली जाते आणि एक देश त्यासाठी 'होस्ट' अथवा यजमान असतो.
2021 वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं.
वर्षानुवर्षं आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत, आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय.
फोटो स्रोत, United Nations
जगभरातमध्ये दर तीन सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढं जंगल नष्ट होतंय. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50 टक्के प्रवाळ (Corals) नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90 टक्के प्रवाळं नष्ट होण्याचा अंदाज आहे.
पर्यावरणाची ही हानी रोखत, पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न, ही यावर्षीची थीम आहे. 2021पासून पुढचं दशक युनायटेड नेशन्स (संयुक्त राष्ट्रं) परिसंस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठीचं दशक म्हणून साजरं करणार आहे.
जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या परिसंस्था – इकोसिस्टीम (Ecosystem) चं नुकसान रोखत, ते थांबवून ही हानी भरून काढण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानव जातीलाही होईल, गरीबी कमी होईल, हवामान बदल (Climate Change) कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत, असं युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर म्हटलंय.
पाकिस्तानकडे यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद आहे. दरवर्षी एका देशाकडे या दिनाचं यजमानपद असतं आणि या देशात अधिकृत कार्यक्रम पार पडतात.
जगभरात विविध व्यक्ती, संस्था, उद्योग यांनी पर्यावरणाच्या हितासाठी काही उपक्रम राबवावेत, आपल्या कार्यपद्धतीत पर्यावरणस्नेही वा पर्यावरणपूरक बदल घडवून आणावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं.
#GenerationRestoration हा हॅशटॅग यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनासाठी ठरवण्यात आलाय.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामद्वारे आयोजित करण्यात येणारे कार्यक्रमही त्यांच्या वेबसाईटवर पाहता येतील.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares