राम शेवाळकर नसताना… – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
मंगळवार २० डिसेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:35 AM2018-03-01T00:35:53+5:302018-03-01T00:35:53+5:30
आपल्या आयुष्यात काही माणसांची उणीव सतत जाणवत असते. त्या माणसांच्या स्मृतींचा आधारच मग पाठीराख्यासारखा आपल्यासोबत असतो. राम शेवाळकर अशाच सहृदयी आधारांपैकी एक़ उद्या दि. २ मार्चला त्यांची जयंती आहे. नानासाहेब वक्ते म्हणून ख्यातकीर्त आणि लेखक म्हणून मान्यताप्राप्त होते. वाङ्मय चळवळीचे नेतृत्व करणारे म्हणून अनेकांना ते आधारस्तंभासारखे वाटले. शेकडो तरुणांचे ते पालक होते व आर्थिक स्थिती अनुकूल नसतानादेखील दानशूर म्हणून ते ज्ञात होते. आपत्तीप्रसंगी आणि आनंदाच्या क्षणी, दु:खात व सुखात, अडचणीत वा वैभवात अशा साºया स्थितीतही आपल्या मनाचा तोल त्यांनी कधी ढळू दिला नाही. त्यांच्या तोंडून कुणाबद्दल अपशब्द निघाले नाहीत. नावडत्या गोष्टींशीही त्यांनी जुळवून घेतले. कॉ. सुदामकाका त्यांच्या परिवारातले आणि संघाचे सुदर्शनही त्यांना जवळचे. काही माणसांचे मोठेपण अनेकांच्या द्वेषावर उभे असते. तो द्वेष मग जातीतून, धर्मातून, स्वत:बद्दलच्या अवास्तव प्रतिष्ठेतून येत असतो. नानासाहेबांनी या रोगाचा संसर्ग स्वत:ला होऊ दिला नाही. शेवाळकर जाऊन आज नऊ वर्षे होताहेत. पण त्यांचे नसणे अनेकांना पोरकेपणाची जाणीव सतत करून देत असते.
नानासाहेब हयात असेपर्यंत आताच्या थोर साहित्यिकांचे वैगुण्य लपून होते. आता ते बटबटीतपणे दिसून येते. नानासाहेबांना सामान्य माणसांचा कंटाळा आला नाही. सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांनी कुणाचा पाणउतारा केला नाही. माणसांना भेटावे, त्यांच्याविषयी चांगलेच बोलावे, हा त्यांचा स्वभाव होता. ओळख-पाळख नसताना कुठल्याही नवोदिताच्या पुस्तकाला नानासाहेब प्रस्तावना द्यायचे. ती तशी देत असताना ती साहित्यकृती दर्जेदार आहे की नाही याचा विचारही ते करीत नसत. ‘आपल्या कौतुकाच्या चार शब्दांनी या नवोदित साहित्यिकाला प्रोत्साहन मिळत असेल तर त्यात काय चुकले,’ असा प्रश्न ते अगदी विनयाने विचारीत. त्यांच्या शब्दांमध्ये माणूस जागवण्याचे सामर्थ्य होते. नानासाहेबांनी अनेक सामाजिक संस्था उभ्या केल्या. विदर्भ साहित्य संघाला खेड्यापाड्यांत पोहोचविण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आज चौथ्या माळ्यापुरते बंदिस्त झालेल्या विदर्भ साहित्य संघाची दयनीय अवस्था पाहून नानासाहेब अस्वस्थ होत असतील. नवोदितांना प्रोत्साहन देणारे, सामाजिक कार्यांना मदत करणारे साहित्यिक आता कुठे दिसत नाहीत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त चार-दोन माणसे जिवंत आहेत, पण तीही तुसडी आणि अहंकाराच्या कोषात राहणारी. त्यांना भेटायला कुणी धजावत नाही. चुकून गेलेच तर उच्चकोटीच्या अहंकाराच्या ज्वाळांचे चटके बसल्याशिवाय राहत नाही. नानासाहेब क्षणोक्षणी आठवतात ते यासाठी. नानासाहेबांच्या वक्तृत्वाला कीर्तनी वळण होेते. त्यामुळे त्यांचे निरुपण सुक्षिशित-अशिक्षित साºयांनाच आवडायचे. भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्या प्रभुत्वाचे रितेपणही ठळकपणे जाणवते…
नानासाहेब विद्यापीठ होते. ते आज नसताना नव्या पिढीला दिशा दाखवणारा कुणी मार्गदर्शक नाही. त्या पात्रतेचेही कुणी सभोवताल दिसत नाही. नानासाहेब गेल्यानंतर समाज मोठ्या आशेने पाहायचा त्या साºयाच थोरामोठ्यांना आत्मग्लानी आली आहे. माणसांना केवळ प्रतिभावंत म्हणून मोठे होता येते. पण, याशिवायही ज्यांना मोठेपण लाभते त्यांचे मुळात माणूसपणच मोठे असते. निंदा-नालस्ती, निषेध वाट्याला येऊनही साºयांबद्दल ममत्व बाळगणारा हा आधारवड आज नाही, ही गोष्ट आपण सार्वजनिक जीवनात खूप काही गमावले असल्याचे सांगणारी आहे…
– गजानन जानभोर (gajanan.janbhor@lokmat.com)
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares