Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चलाच का साजरा करतात? – BBC

Written by

फोटो स्रोत, Google
गूगलनं महिला दिनानिमित्त होमपेजवर डूडल प्रसिद्ध केलंय…
आज जगभर महिला दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने गुगलने आजचं डुडल महिलांना समर्पित केलं आहे. एका 3D अनिमेशन व्हीडिओच्या माध्यमातून हे डुडल तयार करण्यात आलं आहे. विविध क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीवर या डुडलद्वारे नजर टाकण्यात आलीय.
जगभरात गेली कित्येक वर्ष लोक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात. मात्र, या सगळ्याची सुरुवात कशी झाली?
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.
याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या – चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा.
या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला.
हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करण्याची कल्पना कशी सुचली?
ही कल्पनासुद्धा एका स्त्रीचीच होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
फोटो स्रोत, TOPICAL PRESS AGENCY
सर्वप्रथम 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. मात्र, तांत्रिकदृष्ट्या यावर्षी आपण 109वा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत.
1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीमसह साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी या जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.
पहिल्या जागतिक महिला दिनाची थीम होती 'Celebrating the Past, Planing for the Future' (भूतकाळाचा आनंद, भविष्यासाठी योजना).
8 मार्च रोजीच महिला दिन का साजरा करतात, हा प्रश्न तर तुम्हालाही पडला असेल. खरंतर क्लारा जेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केलेली नव्हती.
फोटो स्रोत, AFP
1917 साली युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी 'ब्रेड आणि पीस' (भाकरी आणि शांतता) अशी मागणी केली. महिलांनी केलेल्या कामबंद आंदोलनाने सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. ज्या दिवशी महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं ती तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार हा दिवस 8 मार्च होता आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो. जागतिक पुरूष दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा करतात. 1990 सालापासून आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी अजून त्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही.
फोटो स्रोत, EPA/ANDY RAIN
60 हून जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. पुरुषांचं आरोग्य, जेंडर रिलेशन, लैंगिक समानता आणि सकारात्मकतेला चालना देणं, हा यामागचा उद्देश आहे.
2019 च्या जागतिक पुरुष दिनाची थीम होती 'Making a Diffrence for Men & Boys'.
अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी सरकारी सुट्टी असते. रशिया आणि इतर काही देशांमध्ये या दिवसाच्या आसपास फुलांचे दर वधारतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला स्त्री-पुरुष एकमेकांना फुलं देतात.
फोटो स्रोत, Getty Images
चीनमध्ये अनेक कार्यालयांमध्ये महिलांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची रजा मिळते. तर अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना 'Women's History Month' म्हणून साजरा करतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares