बोलून बातमी शोधा
कासा, ता. २० (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील महत्त्वाच्या सारणी ते उर्से-ऐना या रस्त्याची दुरवस्था झाली असून तो दुरुस्त करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करीत आहेत. हा मार्ग शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण व अन्य प्रवासी यांच्यासाठी धोकादायक बनला आहे. जिल्हा प्रशासन याकडे निधीअभावी दुर्लक्ष करीत आहे.
डहाणू तालुक्यातील सारणी ते उर्से-ऐना या एकूण साडेपंधरा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर १६ गावे आणि २० हून अधिक आदीवासी पाडे आहेत. येथील लोकसख्या वीस हजाराच्या आसपास आहे. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे या मार्गावरील एसटी सुविधा मागील १० वर्षांपासून बंद अवस्थेत जाहे. या रस्त्यावर असलेल्या लहान मोऱ्या व पूल मोठे खड्डे पडून धोकादायक बनले आहेत. यामुळे अनेक गंभीर अपघात या मार्गावर होत आहेत. या रस्त्याची रुंदी जेमतेम तीन मीटर असल्याने व बाजूची झाडेझुडपे वाढल्याने एका वेळेस दोन वाहने जाताना एकमेकास धडकत आहेत.
रस्त्यावर मोठे चढउतार असून तीव्र वळण व रस्त्यावर आलेल्या फांद्यांमुळे नेहमी अपघात होत आहेत. या रस्त्याचे दायित्व पालघर जिल्हा परिषदेकडे असून रस्त्याच्या दुरुस्ती कामी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे; तरीदेखील रस्त्याची स्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तकारी, पाठपुरावा करूनदेखील अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही; तरी या मार्गाची तातडीने दुरुस्तीसह डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या रस्त्यासाठी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा यांच्याकडेदेखील पाठपुरावा करण्यात आला आहे.
————————————–
अनेक वर्षांपासून सारणी ते उर्से-ऐना या रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे हा रस्ता खूपच खराब झाला आहे. रस्त्यामधील दोन मोऱ्या तर खड्डेयुक्त असून तेथे नेहमी अपघात होत असतात. यासाठी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी. नाहीतर आंदोलन करावे लागेल.
– सतेंद्र मातेरा, सामाजिक कार्यकर्ते
——————————-
सारणी-उर्से हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत केला जाणार आहे. या बाबतीत एस्टिमेंट प्रक्रिया सुरू आहे. डहाणू तालुक्यात तीस किलोमीटर रस्ता केला जाणार आहे. त्यामध्ये सारणी ते उर्से-एना या रस्त्याचे काम होणार आहे; पण रस्ताकाम कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही.
– किसन घाडगे, अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना, पालघर
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news