याला म्हणतात जुगाड; जळगाव जिल्ह्यातील शेतकरी शास्त्रज्ञांवर भारी! | Jalgaon Live News – Jalgaon Live News

Written by

Home / कृषी / याला म्हणतात जुगाड; जळगाव जिल्ह्यातील शेतकरी शास्त्रज्ञांवर भारी!
जळगाव लाईव्ह न्यूज | १९ डिसेंबर २०२२ | वन्य व भटक्या प्राण्यांपासून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी मेतकुटीला आले आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. पिकांचे रक्षण करण्यासाठी शेताला विद्यूत तारेचे कंपाऊंड करणे खूप खर्चिक असल्याने अनेक शेतकर्‍यांना ते परवडत नाही. शिवाय रात्रभर शेतात पहारा देणेही कठीणच असते. या समस्येवर काही शेतकर्‍यांनी भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. या जुगाडामुळे त्यांना रात्रभर शेतातही थांबावे लागत नाही व जास्त खर्च ही करावा लागत नाही.
रात्रीच्या वेळी नीलगाय, रानडुक्कर, हरणांचे कळप पिकांचे नुकसान करत असतात. पिकांची नासाडी टाळण्यासाठी शेतकर्‍यांना रात्रभर शेतात पहारा घालण्याची वेळ येते. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. या उक्तीनुसार काही शेतकर्‍यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. यात शेतकर्‍यांनी गाणे वाजविण्यासाठी किंवा घोषणा देण्यासाठी वापरण्यात येणार्‍या स्पिकर विकत घेतले. त्यात कर्कशपणे भुंकणार्‍या कुत्र्यांचा आवाज रेकॉर्ड करुन रात्रीच्या वेळी सुरु करुन शेतात ठेवून दिले. यामुळे वन्य प्राण्यांना वाटते की येथे खूप कुत्रे आहेत आणि ते त्यांच्यावर हल्ला करु शकतात, या भीतीने वन्य प्राणी शेताजवळ फिरकत नाहीत.
बाजारात अनेक छोटे स्पिकर्स कमी किंमतीत उपलब्ध आहेत. त्यांचा आवाज देखील खूप मोठा असतो. या शिवाय पोर्टेबल लाऊडस्पिकर्स देखील सहज उपलब्ध होतात. त्यामध्ये मेमरीकार्डच्या मदतीने कोणतेही गाणे किंवा अन्य रेकॉर्डींग वाजविण्याची सोय असते. याच तंत्रज्ञानाचा वापर पिकांच्या रक्षणासाठी करण्याचा फंड खरच अफलातूनच म्हणावा लागेल. काही शेतकरी स्वत:च्या ओरडण्याचा किंवा बोलण्याचा आवाज रेकॉर्ड करुन ठेवू लागले आहे. यामुळे चोरांपासून देखील सरंक्षण होत असल्याचे काही शेतकर्‍यांनी सांगितले.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares