रवींद्रनाथ टागोरांनी पाचव्या जॉर्जच्या सन्मानार्थ 'जन गण मन…' लिहिले होते का? – BBC

Written by

फोटो स्रोत, Niyogi Books
रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर हे जगातील एकमेव कवी आहेत ज्यांनी दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिली. त्यांनी भारताचं 'जन गण मन' आणि बांगलादेशचे 'आमार सोनार बांग्ला' लिहिलं. त्याबरोबर श्रीलंकेच्या राष्ट्रगीतावरही त्याची छाप दिसून येते.
तसे श्रीलंकेचे राष्ट्रगीत आनंद समारकून यांनी 1939-40 मध्ये लिहिले होते, जेव्हा ते विश्व-भारतीमध्ये टागोरांचे शिष्य होते. 'जन गण मन' 1911 मध्ये लिहले होते आणि त्याच वर्षी काँग्रेसच्या 27 व्या अधिवेशनात पहिल्यांदा गायलेही गेले होते.
नित्यप्रिय घोष यांनी आपल्या 'रवींद्रनाथ टागोर अ पिक्टोरियल बायोग्राफी' या पुस्तकात लिहिले आहे, "जॉर्ज पंचम यांच्या दिल्ली दरबाराच्या निमित्ताने रवींद्रनाथ टागोर यांच्या एका मित्राने त्यांच्या सन्मानार्थ एक गाणे लिहिण्याची विनंती केली. ती विनंती नाकारून टागोरांनी एका इंग्रज सम्राटासाठी नव्हे तर सर्व सामान्य लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या शक्तीच्या सन्मानार्थ हे गाणे लिहिले होते."
ते लिहितात, "एंग्लो-इंडियन प्रेसने जन्माला घातलेल्या या अफवेला मोठा इतिहास आहे. हे गाणे सम्राट जॉर्ज पंचम याचे स्वागत गीत आहे."
ते लिहितात, "इंग्रजी कवयित्री एझरा पाउंडने तिच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात याची खिल्ली उडवली होती कि डब्ल्यू.बी. येट्सने ही अफवा खरी मानली होती. आजही जेव्हा लोक टागोरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तेव्हा या कथित स्वागत गीताचा उल्लेख करतात."
7 मे 1861 रोजी रवींद्रनाथ टागोरांचा जन्म झाला तेव्हा कोलकाता मध्ये लाईट नव्हती, पेट्रोल नव्हते, भूमिगत सांडपाणी व्यवस्था नव्हती आणि पिण्याच्या पाण्याचे नळही नव्हते. त्याच्या जन्माच्या चार वर्षे आधी इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाने एका घोषणापत्राद्वारे भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेतला होता.
फोटो स्रोत, Niyogi Books
रवींद्रनाथ टागोर यांचं तरुणपणातलं एक छायाचीत्र
टागोरांचे पूर्वज मूळचे जेसोरचे होते, जे आता बांगलादेशात आहे. आसपासचे लोक त्यांचा खूप आदर करत. त्यांना ठाकूर म्हणत. हे ठाकूर पुढे इंग्रजी भाषेत टागोर झाले.
टागोरांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या घरीच झाले. वयाच्या 17 व्या वर्षी ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनला गेले, परंतु पदवी न घेता ते भारतात परतले.
वयाच्या विसाव्या वर्षी रवींद्रनाथांची कीर्ती सर्वत्र पसरू लागली होती.
टागोर त्यांच्या 'जीवन स्मृती' या आत्मचरित्रामध्ये लिहितात, "रमेशचंद्र दत्त यांच्या मोठ्या मुलीच्या लग्न समारंभात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्याकडे पोहोचले, तेव्हा रमेशचंद्रांनी पुढे जाऊन त्यांना पुष्पहार घातला. त्याचवेळी मीही तेथे पोहोचलो. बंकिमचंद्र यांनी लगेचच त्याच्या गळ्यातला हार घालून माझ्या गळ्यात घातली आणि म्हणाले की मी यासाठी जास्त पात्र आहे."
फोटो स्रोत, Niyogi Books
रवींद्रनाथ टागोर यांचं तरुणपणातलं एक छायाचीत्र
"त्यानंतर त्यांनी रमेश दत्त यांना विचारले की त्यांनी माझे 'साध्य संगीत' हे पुस्तक वाचले आहे की नाही? दत्त नाही म्हणाले. तेव्हा बंकिमचंद्रांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. माझ्यासाठी यापेक्षा मोठे बक्षीस काय असू शकते."
वयाच्या 23 व्या वर्षी रवींद्रनाथांचा विवाह मृणालिनी या 10 वर्षांच्या खेड्यातील मुलीशी झाला. लग्नाच्या चार महिन्यांनंतर त्यांच्या कुटुंबात एक दुःखद घटना घडली. त्यांचे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ यांची पत्नी कादंबरीने वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या केली.
फोटो स्रोत, NIYOGI BOOKS
रवींद्रनाथ टागोर यांच्या पत्नी मृणालिनी
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
सुनील खिलनानी त्यांच्या 'इनकारनेशन्स इंडिया इन 50 लाइव्स' या पुस्तकात लिहितात, "काही दशकांनंतर, जेव्हा टागोरांनी वयाची ८० ओलांडली, तेव्हा त्यांना आठवले की ते आणि कादंबरी उन्हाळ्याच्या दुपारी कोलकात्यावरून आलेल्या नव्या साहित्य समीक्षा एकत्र बसून वाचत असत, तेव्हा कादंबरी त्यांना हळू हळू वारा घालत असे ."
कादंबरीचे त्यांच्याबद्दल इतके आकर्षण होते की टागोरांचे चरित्रकार अँड्र्यू रॉबिन्सन यांच्या मते, "टागोरांच्या लग्नाच्या चार महिन्यांनंतर तिने अफूचे अतिसेवन करून आत्महत्या केली."
सांगितलं जात कि कादंबरी यांनी आत्महत्येच्या वेळी एक चिठ्ठी ठेवली होती, जी कुटुंबप्रमुख देवेंद्रनाथ यांच्या सूचनेनुसार नष्ट करण्यात आली होती.
नित्याप्रिय घोष लिहितात, "आजपर्यंत कादंबरीच्या आत्महत्येबद्दल अंदाज लावले जातात, ती विक्षिप्त किंवा वेडी होती, तिचा नवरा तिच्याकडे दुर्लक्ष करत होता किंवा त्या अभिनेत्रीचा तिला हेवा वाटत होता, जिच्याबद्दल मानलं जात होत कि जी तिच्या नवऱ्याचे अंतरंग होती. किंवा तिला रवींद्रनाथांच्या लग्नामुळे ती खूप दुःखी झाली होती, कारण तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि अजून बरेच काही.."
रवींद्रनाथ टागोर यांनी १९०७ ते १९१० या काळात गीतांजलीच्या कविता लिहिल्या. सियालदह येथील पद्मा नदीच्या काठी त्यांनी गीतांजलीच्या कवितांचे इंग्रजीत भाषांतर केले.
27 मे 1912 रोजी जेव्हा ते इंग्लंडला गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवादही सोबत घेतला.
रवींद्रनाथ त्यांच्या 'माय लाइफ इन माय वर्ड्स' या आत्मचरित्रात लिहितात, "लंडनला पोहोचल्यानंतर मी या कविता इंग्रजी चित्रकार विल्यम रोथेनस्टाईन यांना दिल्या, ज्यांना मी 1911 मध्ये कलकत्ता येथे भेटलो होतो."
फोटो स्रोत, Getty Images
डब्ल्यूबी यीट्स
"रोथेनस्टाईनने त्या कविता प्रसिद्ध कवी डब्लू.बी. येट्स यांना वाचायला दिल्या. येट्सने त्या कविता एका संध्याकाळी आपल्या ओळखीच्या कवींमध्ये वाचल्या. त्यांनी हा कवितासंग्रह इंडियन सोसायटी ऑफ लंडनने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. येट्सने या कवितांची प्रस्तावना लिहिली.
"अशा प्रकारे लंडनमध्ये 1912 मध्ये गीतांजली पहिल्यांदा प्रकाशित झाली. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1913 रोजी शांतीनिकेतनमध्ये मला नोबेल पारितोषिक मिळाल्याची बातमी मिळाली."
सरोजिनी नायडू यांनी टागोरांच्या जन्मशताब्दी 1961 निमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणिकेत लिहिले आहे, "गीतांजली प्रकाशित झाली तेव्हा मी योगायोगाने इंग्लंडमध्ये होते. तिथे जेव्हा महान आयरिश कवी विल्यम बटलर येट्स यांनी गीतांजलीचा इंग्रजी अनुवाद वाचला तेव्हा ते वेडे झाले होते."
"1913 मध्ये जेव्हा टागोर अतिशय देखणी दाढी, लांबलचक केस आणि लांब झगा घालून इंग्लंडला आले, तेव्हा थंड पडलेल्या इंग्लंडमध्ये सूर्यासारखी जाण आली. मी असे दृश्य देखील पहिले, एका बसमध्ये एका बाजूला बसलेल्या पाच महिलांच्या हातात गीतांजली होती आणि ती त्या वाचत होत्या."
रॉयटर्सने साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाल्याची बातमी प्रसिद्ध केली आणि त्यांनतर कोलकात्त्यातील 'एम्पायर' या वृत्तपत्राने 14 नोव्हेंबर 1993 रोजी ती प्रकाशित केली.
फोटो स्रोत, Getty Images
सरोजनी नायडु
त्या बातमीने संपूर्ण भारतात आनंदाची लाट पसरली आणि बंगाली लोकांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
कोलकाता मधीलच आणखी एका वृत्तपत्र 'इंडियन डेली न्यूज'ने याबद्दल एक चांगली गोष्ट लिहिली, "टागोरांना साहित्यात नोबेल मिळाल्यानंतर, असे म्हणता येईल की त्यांचा कोणत्याही विद्यापीठाशी संबंध नव्हता आणि ते लॉर्ड मॅकॉले आणि ब्रिटिश सरकारच्या शिक्षण व्यवस्थेचे उत्पादन नाही."
13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरने जालियनवाला बाग येथे गोळीबार करण्याचे आदेश दिले. या घटनेत अधिकृतपणे ३७९ लोकांचा मृत्यू झाला होता.
यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी व्हाईसरॉय चेम्सफोर्ड यांना पत्र लिहून 1915 मध्ये ब्रिटीश सम्राटाने दिलेली 'नाइट' ही पदवी परत करणार असल्याची घोषणा केली.
या घोषणेना सामोरं कसा जायचं याची चेल्म्सफोर्डला कल्पना नव्हती. सम्राटाचा अपमान म्हणून टागोरांच्या प्रस्तावावर भारतातील ब्रिटीश वृत्तपत्रांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली, तर भाषिक वृत्तपत्रांचा दृष्टीकोन देखील त्यांच्याबद्दल फारसा आदरयुक्त नव्हता.
फोटो स्रोत, Getty Images
रवींद्रनाथ टागोर
नित्यप्रिय घोष लिहितात, "त्या वर्षी झालेल्या काँग्रेस अधिवेशनातही टागोरांच्या नाईटहूड परत करण्याकडे लक्ष दिले गेले नाही. या विषयावर चर्चाही झाली नाही किंवा अधिवेशनात यावर कोणताही ठराव आणला गेला नाही."
"काही वर्षांनंतर गांधींनी त्यांच्या 'यंग इंडिया' वृत्तपत्रातील 'द पोएट अँड द चरखा' या लेखात टागोरांना 'सर रवींद्रनाथ टागोर' लिहिले. नंतर टागोरांनी 'द मॉडर्न रिव्ह्यू'ला एक खुले पत्र लिहून म्हटले की, ते नाईटहूड पदवीचा आदर करतात. त्यामुळे जेव्हा नेते पुरेसा विरोध व्यक्त करण्यास असमर्थता व्यक्त करत होते तेव्हा त्यांनी ती पदवी परत करण्याबची घोषणा केली. त्यांच्यासाठी 'बाबू' किंवा 'श्रीयुत' किंवा 'सर' किंवा 'डॉक्टर' अगदी साहेब' लिहिलेलंही त्यांना नको होत.
टागोर हे देशाला देव म्हणून पूजले जाण्याचे विरोधक होते. आधुनिक राष्ट्रांनी केलेल्या गुन्ह्यांमुळेही ते काहीसे संतप्त होते, पण तरीही ज्या भूमीवर ते जन्माला आले त्या भूमीवरचे त्याचे प्रेम कोणापेक्षाही कमी नव्हते.
त्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रवाद यांच्यातला स्पष्ट फरक केला होता. ते आपल्या देशावर प्रेम करण्याबद्दल नक्कीच बोलले होते, परंतु त्यांनी इतर कोणत्याही देशाला शत्रू मानले नाही.
पहिल्या महायुद्धाने टागोरांना आक्रमक राष्ट्रवादाच्या विरोधात जोरदारपणे उभे केले आणि या विषयावरील त्यांच्या भाषणांमुळे अमेरिका, इटली आणि हंगेरीमधील त्यांच्या मित्रांनाही त्यांनी विरोधी बनवलं.
फोटो स्रोत, Niyogi Books
शांति निकेतनमध्ये एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्यासोबत रवींद्रनाथ टागोर
वसाहतवादाला त्यांचा नेहमीच विरोध होता. ज्या वेळी त्यांचे अनेक सहकारी स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्या वेळी टागोर विचार स्वातंत्र्याबद्दल बोलत होते.
जाधवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापिक सुप्रिया चौधरी म्हणतात, "लोक मानसिक गुलामगिरीतून मुक्त होत नाहीत तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला काही अर्थ नाही हे टागोरांना दाखवायचे होते."
टागोर यांची एक कविता देशातील अभ्यासक्रमात आहे,
मन जहां डर से परे है
और सिर जहां ऊंचा है
ज्ञान जहां मुक्त है
और जहां दुनिया को
संकीर्ण घरेलू दीवारों से
छोटे-छोटे टुकड़ो में नहीं बांटा गया है….
1901 मध्ये लिहिलेली ही कविता देशाच्या स्वातंत्र्याच्या आवाहनाने संपते. टागोरांच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
टागोरांच्या आणखी एका गाण्याने संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले
जोदि तोर डाक शुने केयो ना आशे,
तोबे एकला चौलो रे..
1924 मध्ये रवींद्रनाथ टागोर अर्जेंटिना येथे गेले होते, तेव्हा तिथे ते दोन महिने व्हिक्टोरिया ओकॅम्पोचे पाहुणे होते. त्यांनी आपल्या एका मित्राच्या घरी राहण्याची सोय केली होती.
फोटो स्रोत, Getty Images
टागोरांनी या काळात 22 कविता लिहिल्या. हे थोडं असामान्य होतं. टागोरांनी एकदा अजित चक्रवर्तींना सांगितले होते की, जेव्हा ते पाश्चात्य कपडे घालतात तेव्हा सरस्वती त्यांना सोडून जाते. परदेशी कपड्यांमध्ये त्यांना मातृभाषेत लिहिता येत नाही. ओकॅम्पो टागोर यांचे अनेक पातळीवरून गेले.
त्यांनी नंतर त्यांच्या 'टागोर ऑन द बॅक्स ऑफ रिव्हर प्लेट' या पुस्तकात लिहिले, "थोडं-थोडं करून त्याने लहान जनावरांना पाळीव केलं. कधी उग्र तर कधी शांत, त्याच्या दरवाज्याबाहेर कुत्र्यासारखं जे कधीच झोपत नाही"
ओकॅम्पो यांना लिहिलेल्या पत्रात टागोर यांनी त्यांच्या पाहुणचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लिहिले, "माझी बाजारातील किंमत जास्त आहे आणि माझे वैयक्तिक मूल्य मागे राहिले आहे. हे वैयक्तिक मूल्य
शोधण्याची इच्छा माझा पाठलाग करत आली आहे. हे केवळ कोणत्यातरी स्त्रीच्या प्रेमाने मिळवता येईल आणि मी बर्‍याच दिवसांपासून आशा करतोय की मी त्यासाठी पात्र आहे."
नित्यप्रिय घोष लिहितात, "कवीच्या सुखसोयी आणि सोयीची पुरेपूर काळजी घेणाऱ्या ओकॅम्पोने, कवीच्या केबिनमध्ये सोफा ठेवण्यासाठी जहाजाच्या कॅप्टनला केबिनचा दरवाजा काढायला लावला होता, ज्याच्या मधून तो अर्जेंटिनाहून युरोपला येणार होते. हा सोफा नंतर शांतीनिकेतनमध्ये आणण्यात आला आणि कवीने शेवटच्या दिवसांपर्यंत त्याचा वापर केला.
टागोरांना मुसोलिनी यांना एकदा, अल्बर्ट आइनस्टाईन आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांना अनेक वेळा भेटण्याची संधी मिळाली.
फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला बर्नार्ड शॉ याची टागोरांबद्दलची धारणा चांगली नव्हती असे दिसते. 1919 मध्ये त्यांनी त्यांच्या एका नाटकातील कवी पात्राचे नाव 'स्टूपेंद्रनाथ बेगोर' असे दिले होते.
टागोरांचे पुत्र रतींद्रनाथ यांनी 'ऑन द एजेस ऑफ टाईम'मध्ये शॉसोबतच्या भेटीचा संदर्भ देत लिहिले, "एका संध्याकाळी आम्हा सर्वांना सिंक्लेअरने आयोजित केलेल्या जेवणासाठी आमंत्रित केले होते."
"बाबा बर्नार्ड शॉच्या शेजारी बसले होते. सगळ्यांना आश्चर्य वाटले की शॉ अगदी शांतपणे बसले होते. त्यामुळे बाबांना सर्व बोलावे लागत होते. त्यांच्याशी आमची पुढची भेट क्वीन्स हॉलमध्ये होती. मैफिलीच्या शेवटी, जेव्हा आम्ही हॉलमधून बाहेर पडत होतो. अचानक कोणीतरी बाबांचा हात धरला आणि त्यांच्याकडे वळून म्हणाला, "तुम्हाला माझी आठवण आहे का? मी बर्नार्ड शॉ आहे."
या दोन भेटींनंतर शॉ यांच्या मनामध्ये टागोरांबद्दल मैत्रीभाव निर्माण झाला. त्यानंतर अनेक वर्षे दोघांमध्ये पत्रांची देवाणघेवाण होत राहिली.
टागोर आणि गांधी यांचा जन्म एकाच दशकात झाला. टागोर 1861 मध्ये आणि गांधी 1869 मध्ये.
टागोरांनीच गांधींना 'महात्मा' हे नाव दिले. गांधीही टागोरांना नेहमी 'गुरुदेव' म्हणत. अनेक मुद्द्यांवर मतभेद असूनही दोघांमध्ये एकमेकांबद्दल खूप आदर होता.
फोटो स्रोत, Niyogi Books
विक्टोरिया ओकॅंपो यांच्यासह रवींद्रनाथ टागोर
टागोरांनी 1921 मध्ये गांधींच्या खिलाफत आंदोलनाचा तीव्र निषेध केला होता. देशातील प्रत्येकाने सूत सूत कातण्यास सुरुवात केली तर वर्षभरात देशात स्वराज्य स्थापन होईल. महात्मा गांधींच्या या विधानाची टागोरांनी खिल्ली उडवली होती.
एकदा गांधींनी जेव्हा बिहारच्या भूकंपाला अस्पृश्यतेच्या पापी लोकांसाठी दैवी शिक्षा म्हणून संबोधले होते, तेव्हा टागोरांनी एक जाहीर विधान जारी केले होते की "गांधी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीकडे दैवी नाराजीची अभिव्यक्ती म्हणून पाहत आहेत हे दुर्दैवी आहे. विशेषतः जेव्हा बहुसंख्य भारतीय त्यांचा दृष्टिकोन कोणत्याही प्रश्नाशिवाय स्वीकारतात."
केवळ त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीतच नव्हे, तर त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विश्वासांमध्येही गांधी आणि टागोर हे दोन वेगवेगळे ध्रुव होते, पण तरीही गांधींनी टागोरांचे म्हणणे आदराने ऐकणे कधीच थांबवले नाही.
टागोरांचा विश्व भारती आणि देशाच्या सीमांच्या पलीकडे 'मानवतावाद' आणि 'आंतरराष्ट्रवाद' वर विश्वास असल्याने दोघांमधील मतभेद वाढतच गेले.
ऑक्टोबर 1937 मध्ये, जेव्हा टागोर वैद्यकीय तपासणीसाठी कलकत्त्याच्या बाहेरील प्रशांत महालनोबिस यांच्या घरी थांबले आणि तेथून शरतचंद्र बोस यांच्या घरी गेले, तेव्हा गांधी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कारमधून निघाले होते.
पण वाटेत गांधी कारमध्येच बेशुद्ध पडले. टागोरांना याची वार्ता कळल्यावर ते गांधींना पाहण्यासाठी अस्वस्थ झाले.
गांधींना शरतच्या घराच्या वरच्या मजल्यावर गांधींना ठेवण्यात आले होते. त्यांना तेथे नेण्यासाठी ४९ वर्षीय जवाहरलाल नेहरू, ४० वर्षीय सुभाष बोस, ४८ वर्षीय शरद आणि ४५ वर्षीय महादेव देसाई यांनी टागोरांना खुर्चीवर बसवले आणि उचलून गांधींना भेटण्यासाठी उचलले.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ७ ऑगस्ट १९४१ रोजी दीर्घ आजाराने अखेरचा श्वास घेतला.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares