रेडियम : अंधारात चमकणारी ती गोष्ट ज्यामुळे अनेक मुलींना आला भयावह मृत्यू – BBC

Written by

ग्रेस फ्रेअर अंधारात तिचं नाक साफ करायची तेव्हा तिच्या हातातला रुमाल चमकायचा. तिच्या ध्यानीमनी हे कधी आलं नसेल की अंधारात चमकणाऱ्या रूमालामुळं तिचं आयुष्य अंधकारमय होईल.
ग्रेस 1917 मध्ये एका कारखान्यात कामाला लागली. त्या कारखान्यात एकूण 70 मुली कामाला होत्या. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेत जे कारखाने सुरू झाले त्यातला हा एक कारखाना होता.
या कारखान्यात लष्करातील सैनिकांसाठी अंधारात चमकणारी घड्याळं बनवली जायची. म्हणजे घड्याळाच्या डायलमध्ये जे आकडे असतात ते रंगवले की ते अंधारात सुद्धा चमकायचे आणि हेच काम त्या कारखान्यात चालायचं.
संशोधक अर्लेन बालकान्स्की यांच्या मते, 6 एप्रिल 1917 रोजी अमेरिका पहिल्या महायुद्धात सामील झाली. या युद्धात अमेरिकेन सैनिकांना चमकणाऱ्या डायलची घड्याळं आणि चमकणाऱ्या लष्करी उपकरणांच्या पॅनेलची गरज असायची. आणि हे रंग देण्याचं काम म्हणजे एकप्रकारे देशभक्ती केल्यासारखंच होतं, त्यामुळे शेकडो अमेरिकन मुली या कामासाठी उत्साहित होत्या.
अंधारात चमकणारा हा रंग काही साधासुधा नव्हता. तर फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी आणि पॉल क्युरी यांनी 1989 मध्ये शोधलेला रेडियम नावाचा घटक होता.
कॅन्सरच्या इलाजात रेडियम यशस्वी ठरला असल्याने तो चमत्कारिक घटक असल्याचं मानलं जाऊ लागलं. त्यानंतर टूथपेस्टपासून सौंदर्यप्रसाधनं, विविध व्यावसायिक उत्पादनात हे रेडियम वापरलं जाऊ लागलं.
या घड्याळाची डायल बनवताना रेडियम पावडरमध्ये डिंक आणि पाणी मिसळून एक पेंट बनवला जायचा. त्यानंतर उंटाच्या केसांपासून बनवलेल्या ब्रशने तो पेंट डायलच्या आकड्यांवर लावला जायचा. थोडं काम केलं की ब्रश खराब व्हायचा आणि कारखान्यात काम करणाऱ्या मुलींना रंगकाम करताना अडचण यायची.
"यावर करखान्यातले सुपरवायजर आम्हाला सांगायचे की, ब्रश ओठात धरून त्याची टीप नीट करा आणि मग रंगकाम करा. मला आठवतंय की, मी एक डायल पेंट करताना जवळपास सहावेळा ब्रश ओठांपर्यंत न्यायचे. त्या पेंटला कसल्याही प्रकारचा वास आणि चव नव्हती," पण तो पेंट शरीरासाठी हानिकारक आहे हे सुद्धा माहीत नसल्याचं ग्रेस सांगते. यापासून कोणताच धोका नाहीये असं मुलींना वाटायचं.
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये तर असं लिहिलंय की, या डायल रंगवणाऱ्या मुलींना 'घोस्ट गर्ल्स' म्हटलं जायचं. कारण रंगकाम करताना रोज त्यांच्या अंगावर रेडियम पडायचं, ज्यामुळे त्यांचे कपडे, केस, अंग अंधारात चमकायचे.
तिथं काम करणाऱ्या बऱ्याच मुली चांगले कपडे घालून यायच्या जेणेकरून काम झाल्यावर जेव्हा त्या बाहेर फिरायला जातील तेव्हा त्यांचे कपडे आणि अंग चमकतील.
त्यातल्या काही स्त्रिया तर हे पेंट त्यांच्या दातांवर लावायच्या जेणेकरून त्या हसतील तेव्हा त्यांचे दात चमकतील. काहीजणी हे पेंट त्यांच्या नखांवर लावून त्यांच्या बॉयफ्रेंडना सरप्राईज द्यायच्या.
पण हे रेडियम शरीरासाठी घातक नाहीये ना, असं जेव्हा त्या त्यांच्या मॅनेजरला विचारायच्या तेव्हा मॅनेजरही काळजी करण्याचं कारण नाही असं सांगायचा. पण मॅनेजर जे सांगायचा ते खरं नव्हतं.
या 'रेडियम गर्ल्स'ना लवकरच शारीरिक हानीची प्रचिती यायला लागली. या रेडियमचं पहिलं सावज ठरली होती अमेलिया (मॉली) मॅगिया नामक स्त्री. ती ऑरेंज, न्यू जर्सीच्या रेडियम ल्युमिनस मटेरियल कॉर्पोरेशनसाठी घड्याळं पेंट करायची.
तिच्यात पहिलं लक्षण दिसलं ते म्हणजे दातदुखीचं. या सततच्या दातदुखीमुळे तिचे सगळे दात काढावे लागले. आता त्या दातांच्या ठिकाणी पू, रक्त, अल्सर अशा गोष्टी दिसू लागल्या.
अमेलियाला तोंडाचा असा एक आजार झाला होता ज्याबद्दल कोणालाच काही सांगता येत नव्हतं. शेवटी तिचा खालचा जबडा कापावा लागला. पण तरीही तो संसर्ग तिच्या शरीरात पसरला आणि 12 सप्टेंबर 1922 रोजी अतिरक्तस्रावामुळे तिचं निधन झालं.
तिला नेमकं काय झालं होतं हे डॉक्टरांनाही समजलं नव्हतं. त्यामुळे रेडियम सुरक्षित आहे असं लोकांना वाटतंच राहिलं. आणि एकामागून एक अशा अनेक मुली या रेडियमच्या जीवघेण्या विळख्यात सापडू लागल्या.
1920 च्या दरम्यान ग्रेसला बँकेत नोकरी लागली त्यामुळे तिने कारखान्याची नोकरी सोडली. पण दोन वर्ष सरली आणि तिचेही दात पडू लागले. तिच्या जबड्यात एक फोड उठला. तिच्या हसऱ्या बदामी डोळ्यात आता दुःख दिसायला लागलं होतं. जुलै 1925 मध्ये तिला डॉक्टरांनी सांगितलं की, तिच्या आधीच्या कामामुळे तिला हा त्रास होत असेल.
या वाढत्या समस्येवर समाधान शोधण्यासाठी यूएस रेडियमने फिजियोलॉजीचे प्राध्यापक सेसिल ड्रिंकर यांची नियुक्ती केली. ड्रिंकर यांना त्यांच्या अभ्यासात असं आढळलं की, कारखान्यात काम करणाऱ्या बऱ्याच महिलांना असं इन्फेक्शन झालं आहे. सर्वांच्याच रक्तात दोष असून या लोकांमध्ये ऍडव्हान्स रेडियम नेक्रोसिसची लक्षण दिसून येतायत.
ड्रिंकर यांनी जून 1924 मध्ये यूएस रेडियमला आपला रिपोर्ट सबमिट केला. त्यांनी कामगारांच्या संरक्षणासाठी या काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची शिफारस केली होती. पण यूएस रेडियमचे अध्यक्ष आर्थर रोडर यांनी ही शिफारस नाकारली आणि म्हणाले की, ते यासाठी फॅक्टस सादर करतील. पण तसं कधी घडलंच नाही.
शेवटी हॅरिसन मार्टलँड या पॅथॉलॉजिस्टने 1925 मध्ये समस्येचं मूळ शोधूनच काढलं. घड्याळं रंगवणाऱ्या स्त्रियांना रेडियममुळे विषबाधा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर रेडियम उद्योगाने मार्टलँडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
ग्रेस फ्रेअरने तिच्या या अवस्थेसाठी खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण वकील शोधण्यासाठी तिला दोन वर्षं लागली.
शेवटी 18 मे 1927 रोजी तिने रेमंड बॅरी या तरुण वकिलामार्फत न्यूजर्सी न्यायालयात खटला दाखल केला. आणि हा खटला यूएस रेडियम कॉर्पोरेशनविरुद्ध करण्यात आला होता.
या खटल्यात पक्षकार म्हणून चार स्त्रिया उभ्या करण्यात आल्या. एडना हसमन, कॅथरीन शॉब आणि अमेलिया मॅगीयाच्या दोन बहिणी, क्वेटा मॅकडोनाल्ड आणि अल्बिना लारेस या चार जणींना रेडियममुळे गंभीर त्रास सुरू झाले होते. यातल्या प्रत्येकीने वैद्यकीय खर्च आणि आजारपणामुळे झालेल्या नुकसानीसाठी 2.5 लाख डॉलर्सची मागणी केली होती.
16 ऑक्टोबर 1927 रोजी तिच्या बहिणींच्या विनंतीनुसार अमेलियाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये, तिची हाडं खूप चमकदार दिसल्याचं म्हटलं होतं. अमेलिया रहस्यमयी अशा नेक्रोसिसमुळे मरण पावली होती. आणि आता तिच्या बहिणीही या असाध्य रोगाला बळी पडल्या होत्या.
या पाच महिलांच्या खटल्याच्या बातम्या जगभरातील वृत्तपत्रात छापून येऊ लागल्या. त्यांना आता 'रेडियम गर्ल्स' असं संबोधलं जात होतं. पण कोर्टात शपथ घेण्यासाठी हात उचलण्याची ताकद सुद्धा त्यांच्यात राहिली नव्हती.
न्यूयॉर्क लेजर वृत्तपत्राने एक बातमी छापली होती. त्यात म्हटलं होतं की, फ्रेअर आणि इतर महिला कोर्टात धाडसाने हसतमुख राहण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र तिथं उपस्थित असलेला त्यांचा मित्रपरिवार आणि इतर लोक त्यांची अवस्था बघून अक्षरशः रडले.
ग्रेसबद्दल ज्या गोष्टी या लेखात नमूद केल्यात त्या सगळ्या तिने कोर्टात दिलेल्या निवेदनाचा एक भाग आहेत.
एप्रिलपर्यंत तर अशी परिस्थिती ओढवली की, कोर्टात सुनावणीला हजर राहण्यासाठी या महिलांच्या अंगात त्राणचं उरलं नव्हतं.
न्यूयॉर्क जर्नलच्या म्हणण्यानुसार, रेडियमचा शोध लावणाऱ्या फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी जेव्हा या केसबद्दल वाचलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, "फ्रेंच रेडियम कामगार पेंट ब्रशऐवजी कापूस वापरतात."
क्युरी पुढं म्हणाल्या की, "कोणतीही मदत करायला मला आनंदच होईल, पण एकदा का हा पदार्थ शरीरात गेला की, तो बाहेर काढण्यासाठी कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही."
25 एप्रिल 1928 रोजी जी सुनावणी पार पडली त्यात हा खटला सप्टेंबरपर्यंत पुढं ढकलण्यात आला होता. पण या स्त्रियांच्या बाजूने लढणाऱ्या बॅरीने सांगितलं की, पुढची सुनावणी होईपर्यंत कदाचित या स्त्रिया जगणार नाहीत. पण कोर्टाने त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. कोर्टाच्या या निर्णयावर वृत्तपत्रांनी जोरदार टीका केली.
न्यूयॉर्क वर्ल्डचे संपादक वॉल्टर लिपमॅन यांनी 10 मे 1928 च्या संपादकीयमध्ये म्हटलंय की खटला पुढे ढकलणं हा मोठा अन्याय आहे… स्त्रिया मरतायत आणि अशा प्रकारे विलंब करणं अजिबात मान्य नाही. जर आज कोणता निर्णय जलद गतीने घेण्याची गरज असेल तर तो या पाच आजारी महिलांच्या केसबाबतीत असेल. ज्या सुखाने मरण्यासाठी लढतायत."
शेवटी जून 1928 च्या सुरुवातीला सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली.
पण एका न्यायाधीशाने यात मध्यस्थी करायचं ठरवलं आणि हा मुद्दा कोर्टाच्या बाहेर सोडवला जावा यासाठी त्या पाच स्त्रियांना गाठलं. सुनावणीच्या आधी काही दिवस असं ठरलं की, या पाच रेडियम गर्ल्सना प्रत्येकी 10 हजार डॉलर तसंच वर्षाला 600 डॉलर द्यायचे. आणि त्यांचा सर्व मेडिकल खर्च कंपनी करणार असल्याचं ठरलं.
बॅरी पेपर्सनुसार, "पण वकील असलेला बॅरी नाखूष होता. त्याच्या मते कंपनीला याचा मोठा फायदा मिळतोय. त्याने मध्यस्थी करणाऱ्या डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज विलियम क्लार्क यांच्यावरही संशय व्यक्त केला."
त्याच म्हणणं होतं की, "ते खूप आदरणीय व्यक्ती आहेत आणि सामाजिक प्रश्नांमध्ये त्यांना खरंच रस आहे. पण ते एक असे व्यक्ती आहेत ज्याचं संपूर्ण आयुष्य कॉर्पोरेटच्या दरबारात गेल्याचं दिसतं."
जज क्लार्क हे यूएस रेडियम कॉर्पोरेशनमध्ये स्टॉकहोल्डर असल्याची माहिती बॅरीला मिळाली होती.
शेवटी पाचही रेडियम गर्ल्सला थोड्याफार प्रमाणात नुकसानभरपाई देऊन मुद्दा निकाली काढण्यात आला होता. पुढे वर्ष-सहा महिन्यात त्या पाचही महिला जीवानिशी गेल्या.
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, रेडियम पेंटचे मूळ संशोधक ऑस्ट्रियन डॉक्टर सबाइन ए वॉन सुचोकी यांचं निधन होण्यापूर्वी ते म्हटले होते की, त्यांनी लावलेला शोध जीवघेणा असू शकत नाही.
पण त्यानंतर एक असा खटला दाखल झाला ज्यात या शोधाला जीवघेणा ठरवण्यात आलं.
कॅथरीन वुल्फ डोनोह्यू नामक स्त्रीने ओटावाच्या रेडियम डायल कंपनीविरुद्ध खटला दाखल केला होता. तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचे फोटो वृत्तपत्रात छापून आले होते.
1938 मध्ये इलिनोवाय इंडस्ट्रियल कमीशनसमोर सुनावणी पार पडली आणि ओटावाच्या रेडियम गर्लने हा खटला जिंकला होता.
यावर रेडियम डायल कंपनीने पुढच्या कोर्टात अपील केली होती. मात्र अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कंपनीच्या अंतिम अपीलावर सुनावणी करण्यास नकार दिला आणि खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला. ती तारीख होती 23 ऑक्टोबर 1939 ची.
आता निर्णय तर आला पण रेडियममुळे झालेली हानी भरून निघणार नव्हती.
डोनोह्यूच्या या केसवर बोलताना मॅरियन केनिकने तिच्या एका महिला नातेवाईकाचा संदर्भ दिला होता. ती सांगते की, लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसादिवशी तिचा मृत्यू झाला होता. दफनविधी पूर्वी तिच्या मृतदेहाला लग्नाचे कपडे चढवण्यात आले. पण ते सैल होत होते कारण त्या रोगाने तिचा मृतदेह कृश झाला होता.
अर्लेन बाल्कान्स्कीने लिहितात की, खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच कॅथरीन वुल्फ डोनोह्यू मरण पावली होती. पण तिचा हा खटला महिलांसाठी व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य निर्धारणासाठीचं कारण बनला.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares