शैलेश मुसळे
Updated on: Dec 21, 2022 | 7:47 PM
सागर सुरवसे, सोलापूर : राज्यात गर्भलिंग निदान चाचणीला बंदी असली तरी अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण झालेत. सोलापुरातील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. त्यामुळे सोलापुरातील अविवाहित तरुणांनी नवरी द्या या मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
एकीकडे सोलापूर मध्ये दोन जुळ्या बहिणींनी एकाच नवरदेवाशी विवाह केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे आज चाळीसहून अधिक तरुणांनी आम्हाला लग्नासाठी बायको मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विशेष म्हणजे हा मोर्चा केवळ माणसे जमवून न करता एखाद्या नवरदेवाची विवाहाची मिरवणूक असावी अशा पद्धतीने मुंडवळ्या बांधत, डीजे वाजवत घोड्यावरून मिरवणूक काढत हा मोर्चा काढण्यात आला होता.
राज्यात एक हजार मुलांमागे 920 मुली आहेत. त्यामुळे अनेक मुलांची लग्न होत नाहीत. विशेषत: ज्या मुलांना नोकरी नाही, जे शेतकरी-कामगार आहेत अशांना मुलीच मिळत नाहीत. त्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. आमचं शिक्षण झालेलं आहे मात्र बेरोजगारीमुळे आम्हाला नोकरी नाही, त्यामुळे मुलगी नाकारली जाते. मात्र या सर्व समस्यांच्या मुळाशी सरकार आहे म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढला आहे. असं एका तरुणाने म्हटलं आहे.
राज्यामध्ये गर्भलिंग निदान कायदा अस्तित्वात आहे. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आज मुलगी न मिळणे ही सामाजिक समस्या बनली आहे. विशेषतः शेतकरी मुलांना मुलगी देत नाही. त्यामुळे आजच्या या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला होता.
वास्तविक प्रथमदर्शनी हा मोर्चा विनोद वाटत असला तरी या माध्यमातून मांडली जाणारी समस्या ही तितकीच गंभीर आहे. एकीकडे नागरी समस्या कमी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेक प्रयत्न केले जातात मात्र दुसरीकडे सामाजिक प्रश्न आ वासून उभे आहेत हेच या मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682