'स्वाईन फ्लू' म्हणजे काय? तो कसा पसरतो? लक्षणं आणि उपचार काय? – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात यावर्षी जुलै महिन्यापर्यंत स्वाईन फ्लूचे 239 रुग्ण आढळून आलेत, तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यामुळेच 'स्वाईन फ्लू' म्हणजे काय? कसा पसरतो, लक्षणं आणि उपचार काय आहेत हे आपण जाणून घेऊया.
'स्वाईन फ्लू' श्वसननलिकेत (Respiratory) होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा 'टाईप-A' च्या 'H1N1' विषाणूमुळे हा आजार होतो. 'स्वाईन फ्लू' हा सामान्य 'फ्लू' सारखा असल्याने याची लक्षणं सामान्य तापासारखीच आहेत.
खोकला, सर्दी किंवा स्वाईन फ्लूने संक्रमित व्यक्तीने स्पर्ष केलेल्या वस्तूंना हात लावल्यानेही संसर्ग पसरण्याची शक्यता असते. नाक, डोळे आणि तोंडावाटे हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो.
'स्वाईन फ्लू' म्हणजे काय? कसा पसरतो?
'स्वाईन फ्लू' श्वसननलिकेत (Respiratory) होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा 'टाईप-A' च्या 'H1N1' विषाणूमुळे हा आजार होतो. तज्ज्ञ सांगतात, 'H1N1' विषाणू नाक, घसा आणि फुफ्फुसातील पेशींना संक्रमित करतो.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, H1N1 विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर 1 ते 7 दिवसांच्या कालावधित रुग्ण स्वाईन फ्लू संक्रमित होतो. लक्षणं दिसू लागल्यानंतर पुढील सात दिवस रुग्ण हा आजार दुसऱ्यांमध्ये पसरवू शकतो. लहान मुलं दीर्घकाळ स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरवू शकतात.
इन्फ्लूएन्झा विषाणूचे विविध प्रकार आहेत. कमी-जास्त प्रमाणात हे विषाणू गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात. संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. हेमलता अरोरा सांगतात, "उद्रेकापासूनच स्वाईन फ्लूसाठी कारणीभूत इन्फ्लुएन्झा विषाणू खूप जास्त संसर्गजन्य राहिलाय. सध्या असलेला विषाणूचा प्रकार जास्त संसर्गजन्य नसला तरी यामुळे होणारा आजार गंभीर स्वरूपाचा आहे."
स्वाईन फ्लू पासून कसा बचाव कराल?
'स्वाईन फ्लू' ची लागण झालेल्या व्यक्तीचा खोकला, शिंक किंवा या व्यक्तीने स्पर्श केलेल्या गोष्टीच्या संपर्कात आल्याने डोळे, नाक किंवा तोंडावाटे 'स्वाईन फ्लू' पसरतो.
स्वाईन फ्लूची सर्वप्रथम लागण डुकरांना झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर हा आजार प्राण्यांपासून माणसापर्यंत पोहोचला.
'स्वाईन फ्लू' चा उद्रेक दक्षिण अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये 2009 साली झाला होता. त्यानंतर हा आजार हळूहळू जगभरात पसरला. जागतिक आरोग्य संघटनेने 2009 मध्ये 'स्वाईन फ्लू'ला महामारी म्हणून घोषित केलं.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार 'स्वाईन फ्लू' हा सामान्य 'फ्लू' सारखा असल्याने याची लक्षणं सामान्य तापासारखीच आहेत.
स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना न्यूमोनिया, बॅक्टेरिअल न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधुमेह, हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूची लागण झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.
संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस म्हणाल्या, "स्वाईन फ्लूची लक्षणं सौम्य असतील तर औषध दिली जातात. अॅन्टी व्हायरल औषध आजार गंभीर होऊ नयेत यासाठी दिली जातात." फुफ्फुसात संसर्ग झालेल्या आणि श्वास घेण्यास अडथळा असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं जातं."
फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांच्या माहितीनुसार रुग्णांना श्वास घेण्यात अडथळा, छातीत खूप जास्त दुखत असेल, स्नायू दुखत असतील तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. गर्भवती महिला, 5 वर्षांखालील लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्यास गुंतागुत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
देशात आणि महाराष्ट्रात कोव्हिड-19 पूर्णत: संपलेला नाही. तज्ज्ञ म्हणतात कोरोना आणि स्वाईन फ्लूची लक्षणं एखसारखीच आहेत. डॉ. अनिल पाचणेकर पुढे म्हणाले, "पावसाळ्यामुळे फ्लूने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढलीये. स्वाईन फ्लूमुळे आजारी लोकांची संख्याही वाढतेय. घरात एका व्यक्तीला आजार झाला की घरातील सर्वांना हा आजार होत असल्याचं दिसून आलंय."
'स्वाईन फ्लू' हा सामान्य फ्लूसारखाच असल्याने संसर्ग पसरू नये यासाठी कोणत्या गोष्टी करू नयेत याची माहिती मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी जाहीर केली आहे.
भारतातील डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) माहितीनुसार, माणसांमध्ये आढळून येणाऱ्या 'फ्लू' व्हायरस विरोधात लस उपलब्ध आहे. ही लस घेतल्यामुळे 'फ्लू' पासून संरक्षण मिळू शकतं. पण, ही लस 'स्वाईन फ्लू' पासून संरक्षणं देऊ शकत नाही.
मुंबईतील जनरल फिजिशिअन डॉ. अनिल पाचणेकर सांगतात, "फ्लू विरोधी लस घेतल्यामुळे 'फ्लू' होण्याचा धोका कमी होतो. 'स्वाईन फ्लू' देखील इन्फुएन्झा प्रकारचाच विषाणू आहे. लसीकरणामुळे एकाखा व्यक्ती या विषाणूशी संपर्कात आला तरी, संसर्ग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो."
सहा महिन्यापुढील बाळापासून ते 50 वर्षांवरील व्यक्तीने फ्लू विरोधातील लस घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्याचसोबत मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार, गर्भवती महिला आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांनी फ्लूविरोधी लस घेतली पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे.
डॉ. अरोरा पुढे सांगतात, "दरवर्षी इन्फ्लुएन्झाचा नवीन प्रकार उदयास येतो. फ्लू विरोधातील लस निर्मिती करताना या प्रकारांचा वापर केला जातो." स्वाईन फ्लूने ग्रस्त रुग्णांना टॅमीफ्लू आणि रेलेन्जा नावाची व्हायरसविरोधी औषध उपचार सुरू असताना दिली जातात. जेणेकरून व्हायरसचा आजार गंभीर होणार नाही.
महाराष्ट्राचे साथ-नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत स्वाईन फ्लूचे 239 रुग्ण आढळून आलेत, तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आता स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 66 आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. 2020 मध्ये 44, तर 2021 मध्ये 64 स्वाईन फ्लू रुग्णांनी नोंद करण्यात आली होती. मुंबईतील वाढते आकडे पाहाता मुंबई महापालिकेने लोकांसाठी सूचना जारी केलीये.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, "स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढतेय. सामान्य औषधोपचाराने हा आजार बरा होतो. पण गर्भवती महिला, सहव्याधी असलेले हायरिस्क रुग्ण, लहान मुलांना जास्त त्रास होत असेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं आणि रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे."
जगभरात स्वाईन फ्लूची साथ 2009 पसरल्यानंतर भारतात मोठी साथ आली होती. देशभरात 2000 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील स्वाईन फ्लूची पहिली सर्वात मोठी साथ पुण्यात पहायला मिळाली होती.
2015 मध्ये भारतात स्वाईन फ्लूची साथ राजस्थानातून सुरू झाली होती. यात 1900 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर 2017, 2019 ला पुन्हा स्वाईन फ्लूचा उद्रेक झालेला पहायला मिळाला. तज्ज्ञ सांगतात, दर दोन वर्षांनी साधारणत: स्वाईन फ्लूचा उद्रेक पहायला मिळतो.
डॉ. पाचणेकर पुढे सांगतात, कोरोनाकाळात लोकांनी मास्क घातलं. फ्लूविरोधी लस मोठ्याप्रमाणावर लोकांनी घेतली होती. त्यामुळे 2021 मध्ये स्वाईन फ्लूचं प्रमाण कमी पहायला मिळालं. याता लसीकरण कमी झालंय. त्यामुळे स्वाईन फ्लूचं प्रमाण पुन्हा वाढलंय.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares