Ahmednagar : मुळा धरणात आंदोलकांच्या उड्या – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
राहुरी : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मुळा धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचे आज आंदोलन झाले. तीन जणांनी धरणाच्या पाण्यात उड्या टाकल्या. त्यांना आपत्ती व्यवसस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. या वेळी पोलिसांनी तेरा आंदोलकांना ताब्यात घेतले.
मुळा धरण येथे आज (बुधवारी) स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष (उत्तर) रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनासाठी आक्रमक पवित्रा घेतला. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, मधुकर शिंदे, चारुदत्त खोंडे, नीरज बोकील यांनी आंदोलकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
या वेळी मोरे म्हणाले, की सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. दीपावली सणापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदत जमा करू, असे आश्वासन देण्यात आले; परंतु शासनाने फसवणूक केली. आजपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीक विम्याची रक्कम दिल्याचे सांगितले. ते हक्काचे आहे. त्यातही विमा कंपन्यांनी अत्यल्प रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.
खेवरे म्हणाले, की शिंदे-फडणवीस सरकार शेतकरी विरोधी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने डावलले आहे. त्यामुळे जलसमाधी आंदोलनावर शेतकरी ठाम आहेत.
आंदोलन सुरू असताना काही आंदोलकांनी थेट धरणातील पाण्याच्या दिशेने धाव घेतली. मोरे व खेवरे यांना अटकाव झाला. तरीही तीन जणांनी पाण्यात उड्या टाकल्या. स्थानिक पोहणारे तरुण, आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने त्यांना पाण्याबाहेर काढले. त्यामुळे, जीवितहानी टळली. आंदोलकांची धरपकड करून त्यांना राहुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
यांना झाली अटक
रवींद्र मोरे‌, रावसाहेब खेवरे, भागवत मुंगसे, राहुल चोथे, अब्दुलहमीद पटेल, विजय शिरसाठ, प्रशांत शिंदे, विशाल तारडे, कैलास शेळके, सुनील शेलार, मिनीनाथ पाचारणे, सुभाष चोथे, विठ्ठल सूर्यवंशी यांना अटक करून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयात हजर राहण्याच्या अटीवर त्यांना सोडण्यात आले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares