शेंडे सरांसाठी लेख – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कृषिप्रधान भारतास खंडप्राय देशात अनेक संधी
स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारत हा कृषिप्रधान देश आहे. एकेकाळी करोडो लोक अन्नधान्याअभावी उपाशी झोपत होते आणि भूकबळी होत होते. मधल्या काळात झालेल्या कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीमुळे आज सव्वाशे कोटी लोकांची अन्नाची गरज भागवून भारत निर्यात करणारा देश बनला आहे. जगभरात दुष्काळ, अतिवृष्टी, उद्योगाकडे अवाजवी लक्ष यामुळे शेत मालाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या भारत या खंडप्राय देशात अनेक संधी उभ्या राहणार आहेत. या संधी उचलण्यासाठी काळाची पावले ओळखून यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाटेने जावे लागणार हे निश्चित.
-संतोष शेंडकर, सोमेश्वरनगर

आज राष्ट्रीय किसान दिन. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिवस. ते भारताचे कृषिमंत्रीदेखील होते. पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी १९७९ जो अर्थसंकल्प मांडला होता त्यामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य देत अनेक नव्या गोष्टींची सुरवात केली होती. सावकारी विरोधी विधेयक, जमीनदारी निर्मूलन विधेयक त्यांच्याच काळात मांडले गेले होते. त्यामुळे ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. शेतीला नवी दिशा मिळावी, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी या उद्देशाने हा दिवस राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो.
देशाला शेतीक्षेत्रानेच तारले
जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत अभूतपूर्व मंदी निर्माण झाली होती. अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असताना मनमोहनसिंग या अर्थतज्ञाच्या साक्षीने भारत मात्र टिकून उभा राहिला. याचे कारण भारत ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. मागील दोन वर्ष कोरोनाकाळातही देशाची आर्थिक घडी मोडून पडण्याची शक्यता असताना शेतीक्षेत्रानेच देशाला तारले.
भारतीची भूक भागविली
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंनी उद्योग आणि शेती या दोन क्षेत्रांकडे अधिकचे लक्ष दिले. त्यातही शेतीला प्राधान्य देताना त्यांनी नियोजन आयोगात विशेष समावेश केला. ''शेती कमकुवत झाली तर उद्योगही कमकुवत होतील'' हा त्यांचा विचार भविष्यवेधी दृष्टिकोन प्रकट करतो. भारत भुकेला आणि तहानलेला होता. १९६० नंतर शेतीने आधुनिक रूप घेतले. पारंपरिक शेतीला फाटा देत संकरीकरणाची कास धरली. तेव्हाच्या तंत्रज्ञानात, बी-बियाण्यात बदल झाले, बैलांची जागा ट्रॅक्टरने तर मोटेची जागा इंजिनाने आणि त्यानंतर इलेक्ट्रीक वीजपंपाचे घेतली. शेती झपाट्याने सुधारत गेली. परिणामी भूकबळी असणारा देश टप्प्याटप्प्याने स्वयंपूर्ण झाला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या काळात कृषिक्षेत्राने त्यापुढे भरारी घेतली. सव्वाशे कोटी लोकांचे पोट भरून शेतकरी अन्नधान्य निर्यात करू लागला.
समस्यांबरोबर संधीही तितक्याच
आज पुन्हा शेतीक्षेत्र बदलाच्या, संक्रमणाच्या उंबरठ्यावर आहे. शेतीक्षेत्रात आज अनेक समस्या आहेत. अतिवृष्टी, नापिकी, दुष्काळ, गारपीट, वादळे, वाढते भांडवल यामुळे शेतकरी अडचणीत आहे. स्वातंत्र्याच्या नंतर भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात साठ टक्के शेतकऱ्यांचा ५२ टक्के वाटा होता. आज त्यामध्ये घसरण झाली आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या ५२ टक्के लोकसंख्येचा सकल राष्ट्रीय उत्पन्नात १५ ते २० टक्के वाटा उरला आहे. परंतु संकट हिच संधी समजून भविष्याची पेरणी करण्याच्या संधीही या परिस्थितीत आहेत. सगळे जग आधुनिक वाटा चोखाळत आहे. युरोप, अमेरिकेत हेलिकॉप्टरने औषध फवारणी चालते आणि एसी वाहनातून शेतमालाची वाहतूक होते. अल्प संख्य शेतकरी बहुसंख्य लोकांना अन्न पुरवत आहेत. परंतु भारतासारख्या खंडप्राय देशात आधुनिकीकरणाचे युग आता कुठे सुरू झाले आहे.
तरुणांमुळे आधुनिक ज्ञानाचा प्रसार
देशात उत्तरेकडील, पूर्वेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आधुनिकतेचे स्वागत करणारे आणि ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक साक्षरता असणारे राज्य आहे. पुरोगामी विचारांचा वारसा असल्याने विज्ञानाधिष्ठित विचार करणारी पिढ्या राज्यात आहेत. त्यामुळे
राज्यातील शेतीमध्ये आता पारंपरिक शेतकऱ्यांची जागा नवे सुशिक्षित, पदवीधर तरुण घेत आहेत. गावोगावी बीएस्सी अॅग्री झालेले तरुण शेतीमध्ये बदल करण्यासाठी झपाट्याने आधुनिक ज्ञानाचा प्रसार करत आहेत. तर काही तरुण निर्यातदारही बनले आहेत. पुरंदर तालुक्यातील चार शेतकरी तरुण मिरचीचे निर्यातदार बनले आहेत. तर नीरा या गुळाच्या बाजारपेठेतील समीर शहा व सौरभ शहा हे तरुण गुळाचे निर्यातदार बनले आहेत. त्यामुळे अन्य तरुणांनाही जगाच्या बाजारपेठा खुणावू लागल्या आहेत. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण माल पिकविला पाहिजे आणि तो जगाच्या कसोट्यांवर टिकला पाहिजे.
नियमित बाजारपेठेपेक्षा चांगले दर
निकष पाहूनच निर्यातीला परवानगी मिळते हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठीच रेस्युड्यू फ्री शेतीची संकल्पना घेऊन रणजित तावरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रयोगशील शेतकरी एकत्र आले आहेत. रसायनविरहीत भाजीपाला पिकवून ग्राहकापर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्ञानेश्वर बोडके यांनी हा प्रयोग करून अभिनव फार्मर्श क्लबमार्फत अनेक शेतकऱ्यांना नियमित बाजारपेठेपेक्षा चांगले दर मिळवून दिले आहेत. यासाठी नव्या तरूणाईला मार्केटिंगचेही ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षणही घेतले पाहिजे. सरकारी पातळीवर कोणती अनुदाने मिळतात, मार्गदर्शन मिळते यासाठी धडपडले पाहिजे. याशिवाय पांडुरंग तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कृषी पर्यटनाची आधुनिक संधीही अनेक तरुणांनी प्राप्त केली आहे. शहरी माणसासाठी निवांत राहण्याची जागा, ग्रामीण कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारी जागा म्हणून कृषी पर्यटन केंद्राला मागणी वाढली आहे. या नव्या वाटेने तरुणाई जाऊ लागली आहे.
आधुनिकतेची, तंत्रज्ञानाची कास
पारंपरिक पद्धतीने शेती करून आता चालणार नाही. पाणी, औषधे, खते यामध्ये बचत करण्यासाठी मातीपरिक्षण करून घेऊनच मात्रा ठरविणे आवश्यक आहे. याशिवाय पाण्याच्या योग्य वापरासाठी आणि सतत पीक वापसा अवस्थेत ठेवून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला पाहिजे. उसासारखे पीक अधिक पाणी पिते म्हणून बदनाम केले जात आहे. त्यावर मात्रा म्हणून ठिबक सिंचनाचा अवलंब केला तर चार पटीने पाणीवापर कमी होणार आहे म्हणजेच वाचलेले पाणी अन्य पिकांना वापरता येणार आहे. बियाण्यांमध्ये सतत बदलने करणे, सातत्याने एकच एक पीक न घेता फेरपालट करणे, जमिनीचा कस टिकून राहण्यासाठी व्दिदल पिके किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे. याशिवाय झीरो बजेट शेती लगेचच स्वीकार करणे शक्य नाही. मात्र रासायनिक खतांसोबत सेंद्रिय खतांचा समतोल वापर करत जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवणेही शेतकऱ्यांच्या हातात आहे.
प्रयोगशील शेतकरीच ठरतोय मार्गदर्शक
शेतीचे आता तुकडे झाले असून राज्यातील ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक बनला आहे. त्यामुळे नुसत्या शेतीवर पूर्णतः अवलंबून राहणे उचित ठरणार नाही. त्यासोबत शेतीपूरक उद्योगाकडे वळणे शक्य आहे. नाशिकमधील पळसे येथील कष्टाळू शेतकऱ्यांनी शेतकरी नेते विष्णुपंत गायके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी गट उभारला. त्याच्या माध्यमातून आधुनिक शेतीची कास धरली. तेथील नाशिक सहकारी साखर कारखाना अडचणीत गेला. त्यानंतर या शेतकरी गटाने गूळ प्रक्रिया उद्योग उभारला. आज या शेतकरी गटाचा पूर्णपणे सेंद्रिय असलेला गूळ, काकवी याची प्रचंड मागणी आहे. कोऱ्हाळे खुर्द येथील शेतकरी तुकाराम खोमणे यांनी शेतीसोबत आफ्रीकन बोर जातीच्या शेळीचा गोठा नीमकर संस्थेच्या सहकार्याने उभारला. त्यांची वर्षाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मगरवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी डॉ. रवींद्र सावंत यांनी जर्सी व होलिस्टिन फ्रीजिअन जातीच्या गाईंचा गोठा उभारला असून आजघडीला आठशे गाई आहेत. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून धार काढणे, दुधावर प्रक्रिया करणे, गाईंचा चारा तयार करणे ही सगळी कामे यंत्राव्दारे अत्यंत अल्प मनुष्यबळात होतात.
शेतकऱ्यांचे गटामुळे एकरी ऐंशी टनाचा मंत्र
मनुष्याच्या स्पर्शाशिवाय निघालेले दूध जंतुविरहीत व रसायनविरहित असल्याने त्याला कायमस्वरूपी उत्तम दर मिळत आहे. त्यामुळे हा देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे दूध निर्माण करणारा पहिला गोठा ठरला आहे. सांगली येथील सुरेश कबाडे, आष्टा येथील संजीव माने, इंदापूर तालुक्यातील खर्चे, बारामती तालुक्यातील तानाजीराव सोरटे हे शेतकरी उसाच्या बाबतीत सातत्याने एकरी शंभर टनांच्या पुढे ऊस उत्पादन दरवर्षी घेत आहेत. आणि अन्य शेतकऱ्यांनाही आधुनिक ज्ञान देत आहेत. बारामती, खंडाळा तालुक्यात त्यांनी पन्नास-पन्नास शेतकऱ्यांचे गट करून त्यांना एकरी ऐंशी टनाचा मंत्र दिला आहे. पुरंदर तालुक्यातील दीपक जगताप हा अंजीर उत्पादक शेतकरी तमिळनाडू राज्यात जाऊन शेतकऱ्यांना अंजिराचे प्रशिक्षण देऊन आला आहे. खुद्द शरद पवार त्याच्या शेतावर जाऊन त्याच्या अंजीर शेतीचे कौतुक करून आले आहेत. बारामती तालुक्यात अंजीर उत्पादन करणारा तो पहिला तरुण असून तो पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन घेत आहे. पुरंदरचे शेतकरी मिळून अंजिराचा पल्प तयार करून उत्पन्नात वाढ करत आहेत.
हवामान बदलाशी संघर्ष
हवामान बदलामुळे दुष्काळ, नापिकी, वादळे, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट अशा संकटांना यापुढील काळात शेतीला सामोरे जावे लागणार आहे. याच्याशी दोन हात करण्यासाठी सरकारी पातळीवर ताण सहन करणाऱ्या पिकाच्या जातींचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. माळेगाव येथे केंद्रसरकारचे एक केंद्र त्यासाठी कार्यरत आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी उसाचे नवे उत्कृष्ट वाण देण्याचे काम चालविले आहे. आघारकर संशोधन केंद्र गहू, सोयाबीनच्या नव्या जाती शोधत आहे. केंद्रसरकारकडून अशा संशोधन केंद्राना अर्थसंकल्पात मोठे बळ दिले गेले पाहिजे. या संशोधन केंद्रातील रिक्त जागा भरून पूर्ण क्षमतेने संशोधन झाले पाहिजे. याशिवाय गावोगावी हवामान केंद्र उभे करण्याचा संकल्प राज्यसरकारने सोडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक हवमानाशास्त्राच्या आधारे आधीच हवामानाच्या सूचना मिळू शकतील. शेतकऱ्यांनीही पाऊस कधी पडणार, वादळ कधी येणार, अतिवृष्टी कधी होईल याचा अभ्यास करून शेतीतले निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे.
शेतामध्ये आधुनिक वाटा
आधुनिक बी-बियाणे, सेंद्रिय खते, ठिबक सिंचन प्रणाली, पाणीपुवठा करणाऱ्या पाणबुड्या अशा आधुनिक गोष्टी शेतकऱ्याकडे आवश्यक आहेत. वीजपंप चालू-बंद करण्यासाठी स्वयंचलित प्रणाली उपलब्ध आहे. ठिबक सिंचनातील ऑटोमायझेशन यशस्वी ठरलेले आहे. शंभर एकराचे भिजणे एक शेतकरी करू शकतो हेही सिद्ध झालेले आहे. भविष्यात रिमोट कंट्रोलने शेती करणे शक्य होणार आहे. याशिवाय पिकांच्या काढणीसाठी आधुनिक यंत्र बाजारात आली असून गव्हापासून भुईमुगापर्यंत सर्व प्रकारच्या शेतमालासाठी यंत्र पुरेसे ठरत आहे. त्यामुळे मनुष्यबळाची अडचण कमी झाली आहे. औषध फवारणीसाठीदेखील ड्रोनचा उपयोग शेतकरी करू शकतो त्यामुळे मनुष्यबळ वाचतेच शिवाय अधिक प्रभावी फवारणी होत आहे. यासोबत अन्नधान्ये, फळभाज्या टिकण्यासाठी सुरक्षित साठवण क्षमता, कोल्ड स्टोअरेज उभारावी लागणार आहे. त्यांच्या पॅकिंगसाठी ऑटोमेशन आणि रोबोट यंत्र काम करू शकतील अशाही शक्यता नजीक आल्या आहेत. देशभरात दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या अन्नधान्याची नासाडी होते. त्यावर हाच नामी उपाय ठरणार आहे.
सरकारकडून अपेक्षा
शेतकऱ्यांना केंद्र व राज्यसरकारकडून धोरणात्मक मदतीची अपेक्षा आहे. शेतकरी लढायला, संघर्ष करायला तयार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे काढून टाकावेत. खुल्या अर्थव्यवस्थेचा त्यालाही लाभ होऊ द्यावा अशी अपेक्षा आहे. सरकार तेवीस पिकांनाच किमान हमीभाव देते. तसा सर्वच पिकांना हमीभाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा रास्त आहे. स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव ही मागणी अनेक वर्ष शेतकरी करतो आहे त्याकडे लक्ष द्यावे. याशिवाय अत्यंत कमी व्याजदराने दीर्घ व मध्यम मुदत कर्ज मिळावे. वीज त्याला पूर्ण चोवीस तास मिळावी. हार्वेस्टरचे अनुदान पुन्हा सुरू करावे आणि ट्रॅक्टरला जीएसटीतून काढावे. इतक्या साध्या अपेक्षा सरकारी पातळीवर पूर्ण होणे राजकीय इच्छाशक्ती असेल तर अवघड नाही. तरच हा भारताचा पोशिंदा उद्या जगाचा पोशिंदा बनू शकेल.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares