साहित्य संमेलन: तुम्ही भूलथापाचे बळी, त्यांची झाली साखर अन् तुमची झाली मळी… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
‘तुम्ही भूलथापाचे बळी, त्यांची झाली साखर, तुमची झाली मळी’ ही कविता विनायक पवार यांनी सादर केली. ‘तुह्या दाराहून जाता लई टिपूर चांदणं, तुह्या डाळिंबी होठानं घ्यावं कप्पाळ गोंदून’ ही कविता प्रकाश घोडके यांनी सादर केली. तर ललित अधाने यांची ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करतो आपण साजरा, कुपोषणाने मारतात माणसं थोडी तरी लाज धरा’ ही कविता दाद देऊन गेली. योगिराज माने यांनी आजोबा आणि नातू यांचे अलवार नाते उलगडून दाखवणारी अतिशय सुंदर कविता सादर केली.
घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयात मराठवाडा साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. यात राजकीय व्यंगासह निवडणूक, फडातील दिवाळी, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आदी विषयांवर कविता सादर करून कवींनी उपस्थितांची दाद मिळवली. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी प्रा. दासू वैद्य होते. प्रभाकर साळेगावकर यांनी स्त्री भ्रूणहत्यासारख्या सामाजिक विषयावरील विदारकता दर्शवणारी कविता सादर केली. कवी सय्यद अल्लादिन यांनी आपल्या कवितेतून ‘देशभक्त गेले-आले देशी भक्त आणि बाटलीत फक्त त्याचा..’ या कवितेतून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. नारायण खरात यांनी कवितेतून ‘मी झाले कळीचे फूल, फुलपाखरू चंबून गेले, काही कळान होत काही, दिशा जवळ आल्या दारी या कवितेतून प्रेमाचा संदेश दिला. पूर्वीच्या काळी रतन खत्रीचा आकडा असायचा, परंतु आता शेतकरी आत्महत्याचा आकडा पाहायला मिळतो आहे.
म्हणून आता फक्त आम्ही आडनाव शेतकरी असल्याची खंत नारायण सुमंत यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. अनिरुद्ध मोरे यांनी तर महेश गोडबोले यांनी आभार मानले. या कविसंमेलनात संजीवनी तडेगावकर,जयश्री जोशी, तनुजा ढेरे, अशोक कोळी, प्रदीप पाटील, नानासाहेब कवडे, स्वप्निल चौधरी, महेश मोरे, विनायक येवले, लक्ष्मण मरगिलवार, शंकर वाडेवाले, शिवाजी आबुलगेकर,नयन राजमाने, योगिराज माने, बालाजी इंगळे, प्रभाकर साळेगावकर, सय्यद अल्लादिन, विनायक पवार, दगडू लोमटे, मुकुंद राजपंखे, अरुण पवार, प्रिया धारासूरकर, नारायण खरात, रंजन कंधारकर, ऊर्मिला चाकूरकर, इक्बाल मिन्ने, कैलाश भाले, सविता करंजकर, संदिपान पवार यांनी कविता सादर करून दाद मिळवली.
सामाजिक विषयांना हात
दुसऱ्या दिवशी निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कवींनी राजकीय व्यंगासह निवडणूक, फडातील दिवाळी, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, स्त्री भ्रूणहत्या यासह सामाजिक विषयांवरील विदारकता, देशभक्ती, व्यसनमुक्ती आदी िवविध सामाजिक विषयांवर कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.
दुसरा दिवस गाजवला : बालकुमार कथाकथनमध्ये रंगले
आला आला रे पाऊस, चला अंगणात जाऊ, पडणाऱ्या पावसात धुंद होवोनिया गाऊ..
विठ्ठल काळे । महदंबा साहित्यनगरी
“अरे बाबा, तुळशीत अंडं घातलंय कबुतरानं. हो का मग… केवढं आहे?, छोटंसंच आहे. छोटंसं म्हणजे केवढं? अरे बोराएवढं… बोराएवढं तर चिमणीचं असतं. कबुतराचं, थोडं तरी मोठं असेल ना..‘ असा बालमनातील संवाद बाल-कुमार कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सावित्री जगदाळे यांनी ऐकवला. तर याच कार्यक्रमात सहभागी असलेले बबन शिंदे यांनी आला आला रे पाऊस, चला अंगणात जाऊ. पडणाऱ्या पावसात, धुंद होवोनिया गाऊ.. रिमझिम रिमझिम पाऊस आला, सुगंध आता सुटला रे..चला मुलांनो नाचू दौडू ही कविता सादर केली.
बालकांच्या कवितांमध्ये गुंतून, गुरफटून गेलेल्या बालकवींनी ४२ व्या साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस गाजवला. दिवसभर बालकांसाठीचे सत्र अन् संमेलनातील किलबिल या ठिकाणी पाहायला मिळाली. कळमनुरीचे बबन शिंदे, साताऱ्याच्या सावित्री जगदाळे, नाशिकचे संजय वाघ, औरंगाबादच्या अंजली धानोरकर, नांदेडचे दत्ता डांगे यांच्यासह दिग्गज बालकवींनी या ठिकाणी हजेरी लावली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिलीप बिरुटे व आभार प्रा. डॉ. सुंदरराव गंडे यांनी केले.
या बालकुमार कथाकथनसाठी घनसावंगी तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध ठिकाणाहून आलेले बालकवी तसेच बालरसिकांची उपस्थिती होती. दोनदिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनात राज्यभरातील बालकवींनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या कवितांचे सादरीकरणही केले. एवढेच नव्हे तर या संमेलनाच्या निमित्ताने भरलेल्या ग्रंथ प्रदर्शनात बालकांसाठीच्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडले. यावेळी नवीन पुस्तकांचे प्रकाशनही या निमित्ताने करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares