बोलून बातमी शोधा
राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत, कोणी कोणावर घोटाळ्याचे आरोप करतंय, तर कोणी कोणाच्या गुन्ह्यांचा पाढा वाचतंय. विधानसभेतलं वातावरण तापलंय. महागाई, बेरोजगारी, रस्ते, कोरोना, सीमाप्रश्न या शब्दांनी जे भवन दणाणलं जायला हवं होतं, तिथं शिळ्या कढीला उत आणला जातोय. राज्यातली १७.३५ टक्के जनता गरीबीच्या जाळ्यात अडकली आहे, ३.५५ टक्के जनता बेरोजगारीत बुडालेली आहे. तिला सोडवण्याऐवजी आपले लोकप्रतिनिधी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय बदल्याच्या आगीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र जाळू पाहतायत.
हेही वाचा: Winter Session : सत्ताधारी-विरोधकांची ‘दिशा’ भरकटली
एवढी तीव्र भाषा का वापरावी लागली? याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. गेल्या तीन दिवसांमधली अधिवेशनाची सत्रं पाहा. विशेषतः गेल्या दोन दिवसातल्या घडामोडी. दिशा सालियन, आदित्य ठाकरे, नितेश राणे, राहुल शेवाळे, एयू, ५० खोके, भूखंडाचं श्रीखंड, वगैरे वगैरे वगैरे…. वेगळं काही सांगायची गरज नाही. कारण या सगळ्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मारा जनतेच्या कानामनावर, डोक्यावर झाला आहे ना की ही जनता बधीर होऊ लागली आहे.(Maharashtra Winter Session 2022)
हेही वाचा: Winter Session 2022 : ये AU, AU कौन हैं… सत्ताधाऱ्यांचं पोलखोल आंदोलन
हेच तर नियोजन आहे. जनतेला आधी बधीर करायचं, आपल्या विरोधात उठणारे आवाज, आपल्याला प्रश्न विचारणारे आवाज शांत करायचे आणि त्यातच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. एवढंच काम आज महाराष्ट्रातल्या नेत्यांना राहिलं आहे. हे माझ्या मनाने नाही, गेल्या दोन दिवसांतलं अधिवेशनाचं कामकाजच सांगतंय.
जनतेच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींचं भरवण्यात आलेलं हे हिवाळी अधिवेशन. नावाप्रमाणे यात काही हिवाळी नाही. विरोधकांकडून ना सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून प्रश्नांच्या माऱ्याने त्यांना गोठवलं जातंय, ना सत्ताधारी विकासाच्या मुद्द्यांवर ठाम राहून विरोधकांचा आवाज गोठवतंय. असं का? राज्यात प्रश्न कमी आहेत का? की राज्यात सगळं काही सुजलाम सुफलाम चालू आहे? 'हिवाळी' अधिवेशनामुळे लोकप्रतिनिधींचे सुन्न झालेले कान उघडणं, तुमची माझी, या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे. त्यामुळे नागपुरातून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांसारख्या निरुपयोगी गोष्टींच्या माऱ्याला महागाई, रोजगार, कोरोना, सीमाप्रश्न, शाळा, रस्ते, वाहतूक कोंडी यांच्या माऱ्याने थंडगार करण्याची वेळ आलेली आहे.
कर्नाटक सरकार तिकडे महाराष्ट्रातल्या गावांना गिळायला आ वासून बसलंय. तिकडच्या मुख्यमंत्र्यांची मुजोरी वाढतच चालली आहे. आता तर त्यांनी ठराव केला आहे म्हणे की महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. आणि इकडे आपल्या मुख्यमंत्र्यांचं काय सुरू आहे? बिल क्लिंटनने आपलं कौतुक केलं म्हणून हुरळून जात आहेत, विरोधी पक्षनेते काय करतात, तर आम्हाला सभेत बोलू दिलं नाही म्हणून रुसून बसतात आणि वारंवार रुसलेल्या जावयासारखे सभात्याग करतात.
वाढता कोरोना…तुम्हाला चांगले उपचार मिळत असतील, हवे तेवढे पैसे ओतून तुम्ही देशात परदेशात सर्वोच्च उपचार घेऊ शकता, पण इथे जनतेमध्ये ज्यांना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे, ते कुठून कोरोनावरचे उपचार घेणार? काही ठोस नियोजन केलं आहे का? विरोधी पक्षनेते, वाढत्या कोरोनाबद्दल काय उपाययोजना केल्या, याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारलात का? मागच्या दोन तीन कोरोनाच्या लाटांचा अनुभव आहे ना गाठीशी? तेव्हा तर तुम्ही सत्तेत होता. कोरोनाचं भय तुम्हाला नक्कीच माहित असणार. मग त्यावर विचारावं वाटलं नाही का? त्यावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची हिंमत झाली नाही का?
नुकत्याच समोर आलेल्या नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार, आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे. त्यावर काय केलं आहे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी? सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला गांभीर्याने घेत आहात, घेतलं आहे, मग आमच्या लेकराबाळांचं काय? त्यांचे किड्यामुंग्यांसारखे जीव जात आहेत, त्याविषयी काही धोरणं केलीत? त्याविषयी चर्चा झाली? आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप होतायत, त्या आरोपांना प्रत्युत्तर देत बसण्यापेक्षा तुम्हाला का वाटलं नाही या इतर आत्महत्यांचा आवाज आपण बनावं आणि आरोप कऱणाऱ्यांना गप्प करावं? प्रिय आमदारांनो, तुमच्या मतदारसंघात जा आणि अभ्यास करा, किती मुलं, किती शेतकरी, किती कष्टकरी कोणकोणत्या कारणांसाठी आत्महत्या करत आहेत. हे जाणून घेऊनही तुम्हाला त्या एकट्या सुशांतची आत्महत्या महत्त्वाची वाटली, तर तुम्ही खरंच गेंड्याच्या कातडीचे झाला आहात.
मराठी शाळांचा मुद्दा माहित तरी आहे का? ज्या महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा अंकुर रुजला, स्त्रीशिक्षणाची पाळंमुळं रोवली गेली, शिक्षणाचं माहेरघर ज्या महाराष्ट्रात आहे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे शिक्षणाचे महामेरू ज्या राज्यात जन्मले, वाढले, कार्यरत राहिले, त्यांच्या राज्यात मराठी शाळा बंद होऊ लागल्या आहेत. विद्यार्थी संख्या कमी, शिक्षक मिळेनात म्हणून शाळांना कुलुपं लागतायत. राज्याचं भविष्य रस्त्यावर येतंय. अर्थात याचा तुम्हाला फायदाच आहे कारण त्यामुळे भविष्यात तुम्हाला प्रश्न विचारणारे सुशिक्षित आवाज यामुळे जन्मालाच येणार नाहीत.
हे आणि असे असंख्य प्रश्न सध्या राज्याच्या समोर आ वासून उभे आहेत. राज्यातल्या जनतेला गिळायला बसलेत आणि तुम्ही तुमच्या अशा वागण्याने जनतेला या प्रश्नांच्या दरीत अगदी निर्लज्जपणे लोटत आहात. पण जनतेला एवढं मूर्ख समजू नका. तुमची पोळी जनता भाजू देणार नाही. तुमचा आरोप प्रत्यारोपांचा खेळ जनता नक्कीच हाणून पाडेल. तुम्ही सुशांत म्हणाल आम्ही आमच्या पोराबाळांची प्रेतं समोर ठेवू, तुम्ही रंगांचा वाद म्हणाल आम्ही बेरोजगारीमुळे रंग उडालेली आमची आयुष्य समोर ठेवू. तुम्ही जेव्हा तावातावाने ओरडत असाल, तेव्हा आम्ही शांतपणे पाहू आणि लोकशाहीच्या उत्सवादरम्यान, तितक्याच शांततेने तुमच्या पऱाभवाची मिरवणूकही काढू. वेळीच जागे व्हा. आधीच कमी असलेला अधिवेशनाचा कालावधी तुमच्या स्वार्थासाठी वाया घालवू नका. अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जायचे आणि खुर्ची घालवून बसायची तयारी ठेवा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news