Dhule Sakri : 7 फूटावर सरी, एका एकरात घेतले 106 टन ऊस उत्पादन – Pudhari

Written by

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
पारंपारिक ऊस लागवड पद्धतीत साधारणतः २.५ ते ३.५ फुट रुंदीची सरी घेवून एकरी सरासरी ४० टन उत्पन्न घेतले जाते. परंतु साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथील सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर व प्रयोगशील शेतकरी राजेंद्र शिरवाडकर यांनी चालू वर्षी ७ फूट रुंद सरी घेवून एकरी तब्बल १०६ टन ऊसाचे उत्पन्न घेतले आहे. त्यांनी फुले २६५ या वाणाची आडसाली ऊस लागवड १५ ऑगस्ट २०२१ रोजी केली होती.
सध्या मजूरांची समस्या व वाढती महागाई यामुळे शेती परवडत नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणे गरजेचे आहे. ऊसासाठी रुंद सरी पद्धत हे आधुनिक तंत्र आहे. रुंद सरी पद्धतीत उत्पादन खर्च कमी येतो. बेणे, मजुरी व खतात बचत होते. ट्रॅक्टर ने आंतरमशागत करता येते. रुंद सरीमुळे भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा व ऊसाची योग्य मशागत, देखभाल करणे सोपे होते. त्यामुळे ऊसाची भरपूर वाढ होते, फुटवा येतो व उत्पन्न वाढते. तसेच ऊस पिकात सोयाबीन, कांदा, भुईमुग इ.आंतरपिक घेऊन एकरी उत्पन्न वाढविता येते. तसेच रुंद सरीत ऊसतोड झाल्यानंतर उसाचे पाचटाचे आच्छादन करून त्याचे खत बनवता येते. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो व उत्पादनात मोठी वाढ होते.
शिरवाडकर यांनी लागवडीआधी उभी व आडवी ना़ंगरटी केली. हिरवळीचे खत, साखर कारखान्यातील पेंट वाॅश, प्रेस मडचा वापर केला. दोन डोळा टिपरी, दोन टिपरीत ५ इंच अंतर ठेवले. रासायनिक बेणे प्रक्रीया, जीवामृत तसेच रासायनिक व जैविक खताचा संतुलित वापर व ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.
या यशासाठी द्वारकाधीश साखर कारखाना, शेवरे (सटाणा) येथील चेअरमन शंकर सावंत, प्रमुख शेतकी अधिकारी विजय पगारे, ऊस विकास अधिकारी कर्पे, पिंपळनेर गटाचे सुपरवायझर एन.एस.कापडणीस, भटू गांगुर्डे, सर्जेराव गांगुर्डे, जी.एस.चौरे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य त्यांना लाभले.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares