Nashik News : कवडीमोल कांदा अखेर उकिरड्यावर; बाजारभावात सततच्या घसरणीमुळे उत्पादक डबघाईस – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कंधाणे (जि. नाशिक) : सध्या उन्हाळ कांदा कवडीमोल दराने विकला जात असून, आज ना उद्या भाव वाढतील, या अपेक्षेने चाळीत साठवलेला कांदा विक्रीतून भांडवली खर्चसुद्धा मिळत नसल्याने हतबल झालेला कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक डबघाईस आला आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून साठवलेला कांदा खराब होत असल्याने अखेर उकिरड्यावर फेकून दिला जात आहे. (Due to continuous decline in market price onion producers farmers in tension Nashik News)
बागलाण तालुक्याचा पश्‍चिम पट्टा कांद्याचे आगर समजले जाते. चालू वर्षी पाऊस लांबल्याने लाल पावसाळी कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाली. उन्हाळ कांद्याला उत्पादन खर्च काढून दोन पैसे हातात पडतील या हेतूने उत्पन्नाची वाढ व उत्तम प्रतीचा कांदा शेतकऱ्यांनी महागडे बी रासायनिक खते व सततच्या बदलत्या हवामानामुळे कीडनाशके, बुरशीनाशकांची फवारणी यांसाठी भरमसाट भांडवली खर्च केला.
त्यातून उत्पादनात वाढ केली. पिकवलेला कांदा जास्त दिवस टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांकडे साठवणुकीची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतवारी करून चांगला कांदा चाळीत साठवून ठेवला. परंतु नैसर्गिक आपत्ती व परराज्यातील मागणी व पुरवठा यावर अवलंबून असलेले कांद्याच्या दराचे गणित आणि नेहमी ग्राहकहिताचा विचार करणाऱ्या शासनाच्या कांदा निर्यातीबाबत चुकीच्या धोरणामुळे, तसेच ज्या राज्यातून कांद्याला अधिक मागणी होते त्या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असल्याने मागणी कमी झाली.
हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन…
हेही वाचा: Market Committee Election : बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार
परिणामी बाजारभावात चढउतार होत राहिले. आज ना उद्या दर वाढतील, या अपेक्षेने साठवलेला कांदा खरीप पेरणीसाठी खते, बी- बियाणे व दिवाळीच्या आर्थिक अडचणीत नाइलाजास्तव गरजेपुरता कांदा विक्री केला. परंतु बाजारभावात घसरण होतच राहिली. उत्पादन खर्च निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको, बाजार समितीत लिलाव बंद पाडणे यांसारखे तीव्र स्वरूपात आंदोलन केले.
तरीदेखील दिवसेंदिवस बाजारभावात घसरण होतच राहिल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले असून, इतक्या दिवसांपासून साठवलेल्या कांद्याच्या वजनात निम्म्याहून अधिक घट झाल्याने आणि पावसाळ्यातील दमट व आर्द्रतायुक्त हवामानामुळे कांदा सडल्याने व चाळीतील कोंब फुटलेला कांदा उकिरड्यावर फेकून देत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी फेकलेल्या कांद्याची दुर्गंधी येत आहे.
हेही वाचा: Nashik Political News : निवडणूक ग्रामपंचायतची पण चर्चा विधानसभेची!
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares