समष्टी समज : निरोप घेताना! – Loksatta

Written by

Loksatta

डॉ. प्रदीप पाटकर
‘समष्टी समज’च्या प्रवासात इतकी प्रेमळ माणसं ई-मेल आणि समाजमाध्यमांवर भेटली, की सृष्टीविषयीची चिंता कमी झाली. आपल्या एवढय़ा मर्यादित जगात जर इतकी सहृदय माणसं स्वत:हून समष्टीच्या प्रश्नांची दखल घेतात, तर जगभर कितीतरी चांगली माणसं असणारच! ही सारी माणसं एकत्र येतील आणि सारे प्रश्न सोडवतील हा विश्वास दृढ झाला.
आकाशातून जलधारा पृथ्वीवर उतरू लागल्या की ओहोळ तयार होतात आणि उताराकडे धावू लागतात. आजूबाजूनं असे अनेक ओहोळ लगबगीनं येऊन एकरूप होत जातात, ओहोळ विस्तारतो. झरे तयार होतात. निसर्ग मार्गदर्शक होतो आणि हळूहळू प्रवाह सशक्त होतो, कधी त्यातून अवखळ सरिता साकारते. आजूबाजूचा प्रदेश सुपीक करत, प्राणी-पक्षी-माणसांची तहान भागवत ती वाहात राहाते. काठालगतचं जीवन समृद्ध करत जाते. वृत्तपत्रातली सदरं आणि स्तंभ हे काम वाचकांबरोबर स्वत: लेखकासाठीही करत जातात. लेख आणि प्रतिक्रिया मन समृद्ध करत जातात, ऋणानुबंध विणत जातात!
समाजाचं निरीक्षण करताना मनात उद्भवणारे विचार, अनुभव, भावना यांना शब्दरूप मिळत जातं, वाचक, समीक्षक, हितचिंतक आपापलं विचारधन पत्राद्वारे, फोन करून पोहोचवतात आणि हा विचारप्रवाह समृद्ध करू लागतात. झऱ्यांसाठी निसर्ग, तसा लेखकासाठी समाज इथे मार्गदर्शक बनतो आणि सदर सादर होत जातं! ‘समष्टी समज’ हे सदर असं तुम्ही वाचकांनी, ‘लोकसत्ता’च्या संपादकांनी समृद्ध करत इथवर आणून पोहोचवलं.
वर्षांरंभी खूप काही सांगावंसं वाटत होतं. बऱ्याच अंशी जगण्यातल्या वेगवेगळय़ा विषयांना आपण स्पर्श करू शकलो असं वाटलं. अनेकदा शब्दमर्यादेपोटी परिच्छेद संपृक्त होत लिखाण क्लिष्ट झालं. लहानपणी खेळून आल्यावर घरी आईला घाईघाईत सगळं सविस्तर सांगावंसं वाटतं तसं लिहीत गेलो. संपादक मंडळाला शब्दमर्यादेबाबत अडचणीत आणलं. उत्कृष्ट चित्रं रेखाटून लेखाचा नेमका आशय आवाक्यात घेणाऱ्या चित्रकार नीलेश यांच्या जागेवर बऱ्याचदा आक्रमण केलं.
 लेखांच्या प्रारंभी समाजवास्तव, समूहाचं परस्परावलंबित्व, समूहाचं सार्वजनिक वर्तन, समाजातल्या समस्या, यावर धावता दृष्टिक्षेप टाकत आपण वेगवेगळे विषय शास्त्रीय, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तर्कनिष्ठ विचारांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केला. यातलं ज्ञान होतं श्रेष्ठ मर्मग्राही विचारवंत, तत्त्वज्ञ, संशोधक, समाजसुधारक, विश्लेषक यांचं. ते आजच्या आपल्या जगण्याशी ताडून पाहण्याचा प्रयत्न तेवढा मी केला. तुम्हा वाचकांनी वेळोवेळी त्यात मार्गदर्शक भर घातली, संदर्भ दिले, अनुल्लेख लक्षात आणून दिले, विषय सुचवले. प्रोत्साहन दिलं, पसंतीची टाळी दिली. सकाळी सकाळी सातला सदर वाचलं की आठपासून प्रतिक्रिया देणारे ई-मेल येऊ लागायचे. ‘कॅन यू बी रीअल?’ या लेखाबद्दल (२६ नोव्हेंबर) लिहिताना संवेदनशील अशा दोन वाचकांनी चक्क कविता करून पाठवल्या. अनेकांनी रिहानला ( माझा नातू) आशीर्वाद पाठवले. इतकी प्रेमळ माणसं ई-मेल आणि इतर समाजमाध्यमांवर भेटली, की सृष्टीविषयीची चिंता कमी झाली. आपल्या एवढय़ा मर्यादित जगात जर इतकी सहृदय माणसं स्वत:हून समष्टीच्या प्रश्नांची दखल घेतात, तर जगभर कितीतरी चांगली माणसं असणारच! मग चिंता का करायची? ही सारी माणसं एकत्र येतील आणि प्रश्न सोडवतील हा विश्वास दृढ झाला.
‘तिचा आक्रोश’ हा लेख (२ एप्रिल) वाचून माणसं समानुभूतीनं कळवळली, मदतीची आश्वासनं आली. सास्तूरचे कदम आजोबा, यादवराव पवारांच्या कहाण्या वाचून अनेकांनी ‘मानसमित्र’ प्रशिक्षणाविषयी पृच्छा केली, स्वत: मानसमित्र होण्याची इच्छा व्यक्त केली. मी या प्रतिसादानं विनम्र झालो. समाजातल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना हुरूप आला. गेल्या वर्षी माझे मित्र हरीश सदानी यांनी ‘लोकसत्ता’तील सदरातून (‘जोतिबांचे लेक’) अशा अनेक वैशिष्टय़पूर्ण सामाजिक कार्यकर्त्यांची आपल्याशी ओळख करून दिली होती ते आपल्याला आठवत असेलच!
मानसिक ताणतणावाविषयी लिहिलं की भरभरून प्रतिसाद येतो, हा नेहमीचा अनुभव आहे. ‘गूढ, रूढ, मूढ’ (१ व १५ ऑक्टोबर), ‘आधुनिक चिंता’ (२५ जून) या लेखांनी काहींना मार्गदर्शन मिळालं, अनेकांनी मानसोपचार घेण्याविषयी असलेले गैरसमज दूर झाल्याचं कळवलं. काहींनी मला भेटून त्यांच्या आप्तांसाठी मानसोपचार घ्यायची इच्छा व्यक्त केली. त्यांना त्यांच्या घराजवळच्या मानसोपचार तज्ज्ञांना भेटून मदत घेण्याविषयी समजावून सांगितलं. वर्तमान नेहमी काहींसाठी चांगला तर काहींसाठी क्लेशदायक असतो. सत्य-असत्य व्यक्तीसापेक्ष असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती व्यवहारात आढळतात. एकमेकांच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा वेगवेगळय़ा असतात आणि त्या काळानुसार व परिस्थितीनुसार बदलत राहतात. या सर्वात परस्परसंबंध, स्व-हित परहिताचं संतुलन साधण्याची अफाट धडपड माणसं करत असतात. त्या संघर्षांत सतत मानसिक व शारीरिक ऊर्जा खर्च होत असते. ही ऊर्जा भरून काढण्यासाठी जी उसंत हवी असते ती जगण्याच्या, टिकण्याच्या शर्यतीत मिळेनाशी होते. मग काही माणसं निराश, अलिप्त, मंद होतात, थकतात, परावलंबी होतात. काही शारीरिक-मानसिक समस्यांचे, व्याधींचे,अंधश्रद्धांचे बळी होतात. काही अशांत, संतप्त, आक्रमक होतात, त्यांचा उद्वेग त्यांच्या जवळच्या माणसांकडे व्यक्त होतो, परिस्थिती असह्य झाली की हा उद्वेग हिंसक होत जातो. हिंसेवरच्या लेखानंतर आलेले ई-मेल (विशेषत: स्त्रियांचे) त्यांनी अनुभवलेल्या, त्यांना आजूबाजूला जाणवलेल्या कौटुंबिक हिंसेबद्दल होते आणि त्यात उत्तरांचा शोध घेण्याची तळमळ आता सुरुवातीच्या तडफडीतून, उद्वेगातून हताशा-निराशेत बदललेली त्यांना जाणवत होती. हे त्यांना नकोसं होत होतं. विवाह निव्वळ विवाद, वितंडवादापुरते उरले होते आणि यात बदल होईल, आपली जवळची माणसं कधीतरी सूज्ञ होतील अशी शक्यता त्यांना वाटत नव्हती. त्यांनी माझ्या लेखातल्या आशावादाचं स्वागत केलं, पण असा शहाणा समाज हे माझं एक रोमँटिक स्वप्नरंजन असल्याचं मला सांगितलं. प्रेम, निष्ठा, सेवा, माया, अपार कष्ट, देवभक्ती, मध्यस्थांचे प्रयत्न, समुपदेशन, कायदे कुणाकुणाचा आणि कशाकशाचाच उपयोग होताना त्यांना दिसला नाही, असं त्यांनी आग्रहानं लिहिलं. त्या त्यांच्या निराशावादाचं खंडन करून, पुन्हा उभं राहणं व नव्यानं नवे प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं सांगताना मला बरीच मेहनत करावी लागली. नवऱ्यासारखाच मुलगाही आता अपमान करतो, कधी हातही उचलतो, कसलीच किंमत देत नाही हे कळून चुकलं की मग या माता शांत जीवनाची उरलीसुरलेली आशाही संपल्यानं कोशात जातात आणि निराशेच्या त्या अंधारात उरलेलं आयुष्य कंठतात. जिथे स्त्रिया सत्ताधारी असतात तिथे काही प्रमाणात पुरुषांबाबत असं घडताना दिसतं. समाजातलं हे चित्रही आता समोर येत आहे. नीती, विज्ञान आणि निर्भयता यांचा पुरस्कार करणाऱ्या महाराष्ट्र अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती), सर्वहारा जन आंदोलन, स्त्री मुक्ती आंदोलन,  MAVA ( मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्युज) यांसारख्या कार्यकर्त्यांना आणि मानसमित्रांना समजून घेताना मला जाणवतं, की अन्यायाच्या, शोषणाच्या जाळय़ातून शोषणग्रस्तांची सोडवणूक करताना त्यांना आजही अतीव संघर्ष करावा लागत आहे.
‘मैं टूटेगा नही’ (२९ ऑक्टोबर) या लेखातला resilience ही मंडळी आयुष्यभर जगली आहेत हे मी जवळून पाहिलं आहे. त्यावर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रियांनी माझ्या मनात जपलेल्या आशावादाला उमेद दिली आणि ‘तिमिरभेद’ लेखात (१२ नोव्हेंबर) तो आशावाद              (optimism) शब्दांत उतरला. आशावाद माझ्या स्वत:च्या जीवनातही शून्यापासूनच्या प्रवासात रुजत, वाढत गेला आणि त्यानंच स्वत:बरोबर मला आजवर टिकवलं! नैतिक मूल्यं आणि शोषक भांडवलशाहीवर, फसवणुकीवर आधारित बाजारवाद यात नितांत अंतर्विरोध असतो. बाजाराचं आपल्या मनावरचं अधिराज्य समजून घ्यायचा प्रयत्न म्हणजे ‘बाजाराच्या कचाटय़ात’(१० डिसेंबर) हा लेख. वस्तूंच्या खरेदीविक्रीवर आधारित बाजार ही मानवी व्यवहारातली नितांत गरजेची व्यवस्था आहे हे सर्वमान्य आहे. पण त्यात कायदे आणि नीतिमूल्यांची पायमल्ली होता कामा नये, हा आग्रह ग्राहकांनी सोडता कामा नये. प्रचार आणि सर्व-विषयव्यापी जाहिरातबाजीद्वारे मनोरंजनाची विविध साधनं, अनावश्यक प्रसाधनं, शोषक, अर्थशून्य दैववाद व कर्मकांडं, अंमली द्रव्यं, व्यसनं, पोर्नोग्राफी यांचा सतत वापर करून गुन्हेगार जगानं प्रौढ, तरुण, स्त्रिया यांना गुलाम करून आता लहान मुलांकडे ते वळले आहेत. वेळीच सावध होऊन समष्टीनं हा नव्या पिढीवरचा हल्ला एकजुटीनं परतवला पाहिजे. त्यासाठी एकत्र येऊन मदतगट स्थापणं जरुरीचं आहे. ग्राहक चळवळींना आपापलं सहकार्य देऊन त्या सशक्त करायला हव्यात.  Minimalism आणि essentialism सारख्या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. मदतगटांविषयीच्या लेखांना प्रतिसाद देणारी, काही उपयुक्त सल्ले देणारी पत्रं आपण वाचकांनी पाठवली आहेत. त्याबद्दलही इथे कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या आसपास भूक, भीती आणि भ्रमाचं एक जग तयार होताना मी पाहातो आहे. काहींचं एवढंसं, खपाटीला गेलेलं पोटही रोज दोन वेळा भरताना दिसत नाही. काहींची भूक भागता भागत नाही. लग्न- समारंभातल्या भरगच्च बुफेवर नजर टाकून आता अनेकजण नाराजच होताना जाणवतं. कौटुंबिक हिंसेइतकीच सार्वजनिक हिंसेची शक्यता मनात भयंकर भीती निर्माण करते. जगभर माणसं कुजबुजतात, पण उघड चर्चा टाळतात. भावना तर ज्वालाग्राही पदार्थ झाल्या आहेत, लगेच पेट घेतात. आपल्यासाठी संत परंपरेनं जागवलेलं, धर्मसुधारक-समाजसुधारक-क्रांतिकारकांनी, लोकशाहीतल्या संविधानानं मिळवून दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण जपलं पाहिजे. स्थित्यंतरातलं चांगलं जे, त्याचं स्वागत करत, नवयुगात काय मिळवलं, काय घालवलं, याबाबत सजग राहायला हवं. गावगाडा गेला तर आता आधारभूत होऊ शकतील अशा कुठल्या व्यवस्था आपल्या ग्राम-कृषीप्रधान महाकाय देशात तयार करता येतील यावर तज्ज्ञांच्या चर्चा घडत असतील तिथे उपस्थित राहून आपल्या भवितव्याला जाणून घेतलं पाहिजे. केवळ जे समोर दिसतं, सांगितलं जातं तेवढं पुरेसं नसतं. ते असत्य होतं किंवा अर्धसत्य होतं हे नंतर कधी कळतं, कळतंच असंही नाही. म्हणून सत्यशोध विविध मार्गानी घ्यावा लागतो. मुलं, विद्यार्थी, आदिवासी, शेतकरी, बेकार पदवीधर, स्त्रिया, नवी कुटुंबव्यवस्था, असे अनेक घटक पाय रोवून स्थिर उभं राहाण्याचा प्रयत्न करताना धडपडत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला आहे. 
 निरोप घ्यावा लागतोच कधीतरी. हा या सदरातला शेवटचा लेख. माझ्या लिहिण्यात काही त्रुटी असतील त्याबद्दल मी दिलगिरी. आयुष्य प्रत्येकाला जगावंच लागतं. ते कसं जगावं हे प्रत्येकाने आपापल्या विचार, चिंतनानं ठरवायला हवं मात्र ते आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता ‘समाज समष्टी’चा विचार त्यात यायला हवा, तरच समाज सुखी,आनंदी होणार आहे. हाच या सदराचा सांगावा आहे.
patkar.pradeep@gmail.com
मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares