Navratr- शरीरशुद्धीसाठी आवर्जून करावेत उपवास | Sakal – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
-डॉ. साधना उमरीकर,
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बदनापू
भारतीय परंपरेत उपवासाला (Fasting) खूप महत्त्व आहे. आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेवर (Digestive system) रोजच ताण पडत असतो. या ताणावर उपवास हा एक सर्वोत्तम उपाय आहे….जाणून घेऊयात उपवासाचे महत्त्व…
हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना केली जाते. शारदीय  नवरात्र हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ शारदीय नवरात्र शरद ऋतूमध्ये साजरे करणे पसंत केले असावे. तसेच या काळात पावसाळा  संपत आलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात तर काही पिके तयार होऊन घरी आलेली असतात आणि त्यामुळे शेतकरी देखील खुशीत असतो. म्हणून नवरात्रीस खुशी व्यक्त करण्याचा उत्सव असेही म्हणता येईल. (Importance of Fasting in Navaratri and Festival Seasons)
नवरात्री उत्सव हा  दुर्गापूजा, नवरात्रोत्सव आणि त्याचे व्रत हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.
यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते.
हेही वाचा: महाराष्ट्राला देवी म्हणून परिचित असलेल्या अलकाताईंचा गुंडांशी सामना
उपवासाचे महत्व
भारतीय परंपरेत उपवासाला (Fasting) खूप महत्त्व आहे. आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पचनसंस्थेवर (Digestive system) रोजच ताण पडत असतो. या ताणावर उपवास हा एक सर्वोत्तम उपाय आहे. शारीरिक आणि मानसिक शुद्धीच्या दृष्टीने उपवासाला महत्त्व आहे. एरवी उपवास कधीही करता येतो. काही वेळा मात्र त्याचे तसे ठराविक दिवस ठरलेले आहेत. नवरात्रीत अनेकजण नऊ दिवस उपवास करतात.
नवरात्रीत ९ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करून उपवास व व्रत ठेवल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. मात्र उपवासाचा संबंध फक्त धर्माशी नसून तुमच्या आरोग्याशीही (Health) आहे. उपवास केल्याने माणसाच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात आणि उपवास ठेवण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल जाणून घेऊया.
 उपवास केल्याने शरीराला होणारे फायदे 
शरीराचे शुद्धीकरण
उपवास करताना जर एखाद्या व्यक्तीने अन्नपदार्थांऐवजी द्रवपदार्थाचे सेवन केले तर त्याच्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. एवढेच नाही तर अशाप्रकारे उपवास केल्याने पचनक्रिया सुधारण्यासोबतच पोटाशी संबंधित आणि त्वचेशी संबंधित समस्याही कमी होतात.
वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन कमी करण्याचा उपवास हा एक चांगला मार्ग असू शकतो. अधूनमधून उपवास केल्याने वाढणारी चरबी कमी होते आणि परिणामी वजन कमी होण्यास मदत होते. या प्रकारच्या उपवासात घन पदार्थांऐवजी पेयांचे सेवन केले जाते.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त
उपवास केल्याने कोलेस्टेरॉलचा धोकाही कमी होतो. अनेक संशोधनांनी असे सुचवले आहे की एक दिवसाचा उपवास कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो. याच्या मदतीने ट्रायग्लिसराइड म्हणजेच एक प्रकारचे फॅट आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते.
पचनसंस्थेसाठी हितकारक
एका संशोधनानुसार, ६२ टक्के लोकांना उपवासाच्या वेळी अपचनाची समस्येचा त्रास जाणवला नाही. तर२८ टक्के लोकांच्या अपचनाचा त्रासही दूर झाला. पचनाच्या विकारांवरही उपवासाने मात करता येते.
त्वचेची चमक वाढविण्यास उपयुक्त
त्वचा आणि आहाराचा जवळचा संबंध असतो. आपण जे खातो, पितो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर स्पष्टपणे दिसून येतो. तळलेले, मसालेदार अन्न त्वचेची चमक कमी करतात आणि मुरुम आणि मुरुमांसारख्या समस्या निर्माण करू शकतात. उपवासाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेची हरवलेली चमक परत येते.
उपवास करताना हे लक्षात ठेवा 
उपवासाचे फायदे मिळविण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असल्यास रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे.
प्रथमच उपवास करणार्‍या लोकांनी लहान किंवा कमी कालावधीच्या उपवासाची सुरुवात करावी.
उपवास करण्यापूर्वी योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा.
एकाच वेळी जास्त खाणे टाळावे.
उपवास सोडल्यानंतर लगेच काहीही जड खाणे टाळावे.
उपवास करताना मद्य, मांस वर्ज्य करावे.
उपवास करताना कमी खाणे अपेक्षित असून दुपारी झोप घेणे टाळावे.
उपवास करताना नित्याची कामे करण्यास हरकत नाही.
उपवास कोणी करू नये
लहान मुले, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता अथवा वृद्ध व्यक्तींनी उपवास करू नये.
आजारी व्यक्ती, मधुमेह आठवा रक्तदाब किंवा तत्सम आजार असलेल्या व्यक्तींनी उपवास करू नये.
निरोगी तरुण व्यक्तींनी उपवास करून त्याचा शरीराला फायदा करून घ्यावा.
उपवास कधी आणि कसा करावा
उपवास केव्हाही ठेवता येतो. पण आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्यास उपवास टाळावा. उपवासाच्या वेळी रिकाम्या पोटी जास्त चहा किंवा कॉफी पिणे टाळा. असे केल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. तुम्हाला आरोग्याची समस्या असल्यास किंवा कोणतेही औषध घेत असल्यास, उपवास करू नका. 
उपवास आणि पौष्टिकता 
उपवास करताना आहारात खालील गोष्टींचे सेवन केल्यास आहारात बदल तर होतोच पण आहारात विविधता येऊन आहारची पौष्टिकता देखील वाढविता येते. राजगिरा आणि भगर दोन्ही पचण्यास हलके असतात म्हणून याचे विविध प्रकारे सेवन करा.
या शिवाय शिंगाडा, केळीची पावडर, उपवास भाजणी यांच्या पिठांची थालीपीठे, पराठे किंवा पोळी बनवून चटणी अथवा भाजी सोबत खावी.
नवरात्रात लाल भोपळा, राजगिरा, काकडी, बटाटा, रताळी, भेंडी या भाज्या चालत असल्या मुळे जरूर सेवन कराव्यात.
साबुदाणा किंवा तळलेले पदार्थ पचनास जड असल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात सेवन करावेत.
दही, दुध, पनीर, श्रीखंड, पेढे व तत्सम पदार्थ जरूर सेवन करावेत.
शेंगदाणे व गुळ तसेच राजगिरा गुल यांची चिक्कीचा आहारात जरूर समावेश करावा.
साजूक तूप आठवा शेंगदाणे तेलाचा माफक प्रमाणात उपयोग करून पदार्थ बनवावेत.
उपवासाला सर्व प्रकारची फळे, सुकामेवा चालत असल्यामुळे आहारात याचा समावेश केल्यास पौष्टिकता वाढवता येते.
या काळात पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. फळांचे रस, खिरी, नारळपाणी यांचे जास्त प्रमाणात सेवन करावे. 
एकूणच आहारातील बदल सकारात्मकतेने स्वीकारून उपवास केल्यास शरीराला याचा नक्कीच फायदा होतो. 
आहारातील बदल म्हणजेच उपवास हा स्वत:मध्ये मानसिक, शारीरिक आणि आध्यत्मिक बदल करण्यासाठी असून त्यास देवी पुजेची जोड देऊन आपल्या पूर्वजांनी स्वत:ची प्रगती करण्यासाठी सांगितलेला उपाय अत्यंत वंदनीय व समर्थनीय असाच आहे.
त्यामुळे उपवास करा व तंदुरुस्त व्हा हा संदेश जाणून योग्य मार्गाने उपवास करू या.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares