Pune News : जुन्नर उपवन संरक्षक विभागात तब्बल दोनशे बिबट्यांचा वावर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मंचर : उपवन संरक्षक जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यात तब्बल २०० बिबट्यांचा वावर असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिबट्यांचा वाढत्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मानवावर हल्ले करणारे बिबटे जेरबंद करून त्यांची रवानगी राज्यातील एकमेव असलेल्या माणिकडोह (खामगाव ता.जुन्नर) बिबट निवारा केंद्रात केली जाते.
पण सद्यस्थितीत ३७ बिबट निवारा केंद्रात आहेत. बिबट निवारा केंद्राची क्षमता संपली आहे. त्यामुळे नव्याने जेरबंद केलेल्या बिबट्यांना कुठे ठेवायचं? हा प्रश्न उभा राहिल्याने वन खात्यातील अधिकारी व कर्मचारी चिंतेत आहेत. जुन्नर उपवन संरक्षण विभागातील चार तालुक्यात उसाच्या शेतीचे क्षेत्र मोठ्या वाढले आहे. ऊस शेतीच्या माध्यमातून मिळणारा सदाहरित निवारा, पाणी व पाळीव प्राण्याचे भक्षण यामुळे बिबट्यांसाठी ऊसशेती क्षेत्र उत्तम पोषक निवारा झालेला आहे.
मनुष्यवस्ती जवळ सहज व जास्त कष्ट न करता बिबट्याला शिकार उपलब्ध होते. त्यामुळे बिबटे वारंवार मनुष्यवस्तीकडे आपला मोर्चा वळवू लागले. यातूनच माणूस व बिबट्या असा संघर्ष सुरू झाला. या भागात सन २००१ पासून बिबट्यांची समस्या निर्माण झाली. मानवी वस्तीत घुसलेले, विहिरीत पडलेले, उपद्रवी नरभक्षक बिबट्यांसाठी सुरुवातीला बंदिस्त, तसेच पत्राशेडमध्ये १६ पिंजरे बनविण्यात आले होते. माणिकडोह निवारा केंद्र सन २००६ पासून वाईल्ड लाइफ 'एसओएस' या दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्थेकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आलेले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चंदर सवने व व्यवस्थापक महेंद्र ढोरे यांच्या नियोजनातून केंद्राचे व्यवस्थापन केले जाते.
गेल्या वीस वर्षात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ३६ व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या असून १०८ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. बारा हजार पेक्षा अधिक मृत पशुधनाची संख्या आहे. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देत असताना मानवावर हल्ले झाल्याची संख्या सर्वाधिक आहे.मनुष्यावर बिबटचे हल्ले होऊ नये तसेच मानव- बिबट संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने शेती पंपासाठीचा विदयुत पुरवठा रात्री न करता दिवसाच्या वेळी विदयुत पुरवठा चालु राहिल्यास शेतकरी रात्रीच्या वेळी शेतीस पाणी देण्यासाठी जाणार नाहीत. शेती पंपासाठी दिवसा प्रामुख्याने सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत अखंडीत विदयुत पुरवठा होण्यासाठी महावितरण कंपनीकडे पत्रव्यवहार केला आहे.अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
खामगाव (ता.जुन्नर) येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या विस्तारीकरणासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची बारा हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे. सदर विस्तारित निवारा केंद्राच्या जागेसाठी एक कोटी २६ लाख रुपये रक्कम मिळावी.अशी मागणी प्रधान मुख्य वन संरक्षक (अर्थ संकल्प नियोजन व विकास) प्रदीप कुमार यांनी महसूल व वनविभागाचे प्रधान सचिव यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी व जनजागृतीसाठी गावोगावी घ्यावयाची काळजी याबाबत भिंतीपत्रके, माहिती पत्रके, पथनाट्याद्वारे व काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. असे सातपुते यांनी सांगितले.
“जुन्नर वन उपसंरक्षण कार्यक्षेत्रात निवारा केंद्र विस्तारीकरण व कृषी पंपाना दिवसा वीज उपलब्ध व्हावी. याकामी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके यांनी विधी मंडळात आवाज उठवावा. तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आपल्या स्तरावरून पाठपुरावा करावाअशी मागणी अनेक गावाच्या सरपंचांनी केली आहे.”
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares