कोण होता टिपू सुलतान?, धर्मवेडा की परधर्म द्वेष्टा?; वाचा इतिहास काय सांगतो – TV9 Marathi

Written by

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत
Updated on: Jan 29, 2022 | 7:03 PM
महादेव कांबळे, मुंबईः टिपू सुलतान नावाचा वाद राज्याला आणि देशाला नवा नाही. टिपू सुलतान (Tipu Sultan) यांची जयंती किंवा नावासंदर्भात कोणत्याही गोष्टी आल्या की, आधी राजकीय (Politics) पक्ष त्यांच्या नावाचा वापर करुन पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. कर्नाटकात (Karnataka) 2006 मध्ये टिपू सुलतान यांच्या 265 व्या जयंतीचे बंगळुरुमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी दंगल घडवून आणण्यात आली आणि त्या दंगलीत तिघांचा मृत्यू झाला. टिपू सुलतान यांना त्याच्या कर्तृृृत्वाप्रमाणे मान्यता मिळाली नाही अशी खंत ज्येष्ट नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड व्यक्त करतात. मराठी साहित्यात टिपू सुलतानावर हरि नारायण आपटे यांनी मैसुरचा वाघ, गिरिश कर्नाड यांनी कन्नडमध्ये लिहिलेले टिपूचे स्वप्न हे नाटक उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केले आहे तर सरफराज अहमद यांनी प्रदीर्घ काळ संशोधन करुन टिपू सुलतान यांच्या जीवनावर सल्तनत ए-खुदादाद हा संशोधनपर ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाला विचारवंत आणि अभ्यासक राम पुनयानी यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लिहिली आहे.
टिपू सुलतानाविषयी अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. तो हिंदू विरोधी होता, हिंदू मंदिराना विरोध करायचा, मुस्लिमधार्जिनी होता आणि त्याच्या स्वातंत्र्यासेनानी असण्यावरही अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. टिपू सुलतान यांच्यावर संशोधनपर लिहिलेल्या ग्रंथात सरफराज अहमद यांनी संदर्भ देऊन अनेक गोष्टींचा त्यांनी खुलासा केला आहे.
टिपू सुलतान यांनी कर्नाटक राज्याचा कारभार चालविला त्यावेळी त्यांनी राज्य सुरळीत चालावे, सामान्य माणसांना सुखासीन जगता यावे यासाठी राज्यात अनेक बदल घडवून आणले. म्हणूनच ज्येष्ट नाटककार गिरिश कर्नाड टिपूचे स्वप्न नाटकाच्या मनोगतात म्हणतात की, बंगळुरुच्या विमानतळाला टिपूचे नाव देणे औचित्याचे होते मात्र टिपू कन्नडद्वेष्टा होता हे तुणतुणे राजकीय पक्षाने लावले.
भारतावर ब्रिटाशांनी राज्य केले त्यावेळी भारतातील ब्रिटीशांच्या वसाहतवादाचा विस्तार रोखला तो हैदर आणि टिपू या जोडीने. ब्रिटीशांना प्रचंड विरोध करुन त्यांनी वसाहतींना थारा लागू दिला नाही.
टिपू सुलतान हिंदूविरोधी होता हे राजकीय पक्ष सांगत सांगत असले तरी टिपू सुलतानचे धार्मिक धोरण ठरलेले होते. त्याच्या धार्मिक धोरणात विध्वंसाला अजिबात थारा नव्हता म्हणूनच त्यांनी शृृंगेरीच्या मठाबरोबरच अनेक मठांना सढळ हाताने दान दिले आहे.
ज्या काळी ब्रिटिशांचा इतिहास ब्रिटिशकालीन इतिहास लिहिला गेला त्यावेळी ब्रिटीशांना कडवा विरोध करुन, त्यांच्या वसाहतवादाला रोखून धरले ते टिपू सुलतानांनीच, त्यामुळेच ब्रिटीशकालीन इतिहासकारांनी टिपूची प्रतिमा धर्मांधपणाची केली. टिपू सुलतानाने राज्यकारभार चालविताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत राज्यकारभार चालवण्यास प्राधान्य दिले.
टिपू सुलतानाचा जाहिरनामाही इतिहासकारांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ज्या टिपू सुलतानवर धर्मद्वेष्टा अशी टीका केली जाते त्या टिपूच्या जाहिरनाम्यात तो म्हणतो की, धर्माच्या आधाराने परधर्मियांना अवमानीत करु नये, त्यांना कमी लेखू नये अशी कडक ताकीद आपल्या जाहिरनाम्यात ते देतात.
टिपू सुलतानावर टीका होत असली तरी त्याच्या जाहिरनाम्यातील मुद्यांकडे बघितले की, लक्षात येते राज्यकारभार चालवताना तो कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो. त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात स्पष्ट म्हटले होते की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या राज्याचे व प्रजेचे रक्षण मी करेन आणि ब्रिटिशांना येथून पिटाळून लावीन. हे त्याच्या राज्यकारभाराचे तत्व होते असे सरफराज अहमद यांनी लिहिलेल्या सल्तनत ए-खुदादाद या ग्रंथात सांगितले आहे.
टिपू सुलतानाने आपला राज्यकारभार चालवित असताना त्यांनी लोकांना सुखीसंपन्न ठेवण्याचाच प्रयत्न केला. म्हणून ज्यावेळी पेशव्यांनी टिपू सुलतानाच्या राज्यातील हिंदू मंदिरांची लूट केली त्यावेळी हिंदू मंदिरांना टिपू सुलतानानी नुकसान भरपाई दिली आहे हे इतिहासात नमूद आहे. आणि म्हणूनच कर्नाटकातील शृृृृृंगेरीच्या शंकराचार्यांचा आदर होता म्हणूनच त्यांनी त्यांच्या मठाला असंख्य देणग्या दिल्या आहेत. आपल्या राज्यात समानता नांदावी यासाठी तो नेहमीच आग्रही राहिला होता.म्हणून त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात स्तष्ट म्हणतो की, राजाने सर्वांना समानतेने सोबत घेऊन चालले पाहिजे.
आपल्या राज्यातील जनता सुखी व्हावी यासाठी टिपू सुलतानानी आठ पत्री घोषणापत्र जाहीर केले होते.त्यातमध्ये त्यांनी लिहिले होते की, राज्यकर्ता म्हणून शासकीय खजिन्यात अपहार केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच कोणत्याही लष्करी मोहिमेवर ताठ दिल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करेन आणि यामध्ये कसूर केल्यास फाशी देण्यात यावी असेही या जाहिरनाम्यात त्यांनी स्पष्ट केले आहे.
टिपू सुलतान यांना जशी राज्यकारभार चालविण्यावर पकड होती, तशीच आवड त्यांना वाचनातही होती. कारण इतिहासात अशी नोंद आहे की, टिपूच्या ग्रंथालयात 1 हजार 889 ग्रंथ होते. टिपूची ही सर्व ग्रंथसंपदा आता क्रेंब्रिज ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात सुरक्षित आहेत. टिपूला फक्त वाचनाचीच आवड नव्हती तर तो ग्रंथप्रेमीही होता म्हणून त्याच्या नावावर 44 ग्रंथनिर्मिती केली असल्याची नोंद इतिहासात आहे.

संबंधित बातम्या

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682
Copyright © 2023 TV9Marathi. All rights reserved.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares