आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी, या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सोमवारी भातकुली तहसीलवर धडकले होते. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करीत पिकविम्याकरिता आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेचे अमित अढावु, प्रविण मोहोड यांनी निवेदनातून दिला. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना देखील शेकडो विमाधारक शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. कृषि विभागाने पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा डाटा घेवून पडताळणी करणे गरजेचे आहे, परंतु तसे शासनाकडून करण्यात आले नाही. केेवळ विमा कंपनीला पाठीशी घालण्याचे काम शासन करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यास कंपन्यांना बाध्य करावे. ज्यांना विम्याची रक्कम कमी मिळाली, ज्यांना अपात्र ठरविण्यात आले, त्यांच्या खात्यातही विम्याची रक्कम जमा करण्यासाठी सरकारने तातडीने पीक विमा कंपन्यांना आदेशित करावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा दुपारी भातकुली तहसीलवर धडकला. यावेळी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा न झाल्यास पीक विमा कंपन्यांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला देण्यात आला आहे. या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित अढावु, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण मोहोड, अमोल राऊत ,शिवाजी देशमुख, आश्विन दुर्गे, बाळासाहेब खोरगडे, प्रदीप गौरखेडे, नितीन ओळीवकर, राजू लेंडे, विशाल मेहरे, बाळासाहेब लेंडे, मुकुंद बांबल, संदीप वानखडे, संदीप रेहपाडे, ओंकार ठाकरे, मोहन धुमाळे आदींचा सहभाग होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

Article Tags:
news